व्हेज मंचुरियन / Veg Manchurian recipe


    Aajcha bet recipes च्या आजच्या लेखामध्ये चायनीज सेंटरमध्ये मिळते तसे व्हेज मंचुरियन घरी कसे करायचे ते पाहूया.आज-काल चायनीज पदार्थांची क्रेझ खूप वाढली आहे. चायनीज पदार्थ रेस्टॉरंट मध्ये 'स्टार्टर' म्हणून दिले जातात. शिवाय रस्त्यावर चायनीज स्टॉलवर व्हेज- नॉनव्हेज अनेक चायनीज प्रकार मिळतात. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा चायनीज पदार्थ म्हणजे कोणता असेल तर तो व्हेज मंच्युरियन... याचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे व्हेज मंचुरियन ड्राय आणि व्हेज मंचुरियन ग्रेवी...
    रोज रोज हॉटेलमध्ये जाऊन चायनीज खाणं प्रत्येकाला परवडत नाही. आणि ते आरोग्याच्या दृष्टीने घातकही असते. कारण त्यामध्ये वापरले जाणारे कृत्रिम रंग आणि अजिनोमोटो सारखा पदार्थ घातक ठरू शकतो. अगदी चायनीज सेंटर मध्ये मिळणारे  व्हेज मंच्युरियन Veg Manchurian recipe in marathi  मी आपल्यासाठी देत आहे.



Veg-Manchurian-recipe
व्हेज मंचुरियन / Veg Manchurian recipe 

साहित्य :-(मंच्युरियन बॉल साठी)

२ वाट्या बारीक चिरलेला/किसलेला कोबी
१ वाटी चिरलेले/किसलेले गाजर
पाव वाटी सिमला मिरची बारीक चिरून
पाव वाटी कांदापात चिरलेली 
१ चमचा बारीक चिरलेला लसूण
१ चमचा किसलेले आले
२ चमचा डार्क सोया सॉस
१ चमचा रेड चिली सॉस
१/२ चमचा काळी मिरीपूड
२/३ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
१/२ वाटी कॉर्नफ्लॉवर
१/४ वाटी मैदा किंवा तांदळाचे पीठ
मीठ व साखर चवीनुसार
तळण्यासाठी तेल

साहित्य :- (मंच्युरियन ग्रेव्हीसाठी)

१ चमचा बारीक चिरलेला लसूण व आलं
२ चमचे पातीचा कांदा बारीक चिरून
प्रत्येकी १-१ चमचा बारीक चिरलेला कोबी, गाजर, सिमला मिरची
१ चमचा लाल मिरची पावडर
१ चमचा डार्क सोया सॉस
१ चमचा टोमॅटो सॉस
१ चमचा विनेगर
२ चमचे कॉर्नफ्लोअर
२ वाट्या पाणी
मीठ व साखर चवीनुसार
तेल

ही रेसीपी सुद्धा नक्की करून पहा :- पास्ता / How to make white sauce pasta

कृती :-
  1. सर्व भाज्या स्वच्छ धुऊन घ्या. कोबी, गाजर, सिमला मिरची किसून किंवा बारीक चिरून घ्यावेत. एका भांड्यात सर्व घेऊन त्यात कांद्याची पात, बारीक केलेला लसूण ,आलं , हिरवी मिरची, मीठ व साखर घालून मिश्रण चांगले एकजीव करून घ्या.
  2. सोया सॉस, रेड चिली सॉस, काळीमिरीपूड घाला. वरून लागेल तसे मैदा व कॉर्नफ्लॉवर घाला. मिश्रणाचा गोळा होईल इतपतच मैदा व कॉर्नफ्लॉवर घालावे. पाण्याचा वापर अजिबात करू नये. भाज्यांना पाणी सुटते. या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे (मंच्युरियन बॉल) करून एका ताटात ठेवावे.
  3. कढईत तेल चांगले गरम करून त्यात गोळे हलक्या सोनेरी रंगावर तळून घ्यावेत. कारण पुन्हा एकदा गोळे तळायचे आहेत. असं केल्याने गोळे वरून क्रिस्पी होतात.
  4.  ग्रेव्हीसाठी एका कढईत चमचाभर तेल घालून त्यात बारीक केलेला लसूण, आलं, बारीक चिरलेला कांदा, कोबी, गाजर, सिमला मिरची घालून मोठ्या गॅसवर परतून घ्या. भाज्या जास्त शिजवू नये. लगेचच सोया सॉस, टोमॅटो सॉस, विनेगर, मिरची पावडर व एक- दोन चमचे पाणी घालून मिश्रण परता. म्हणजे मसाले जळणार नाही.२ कप पाण्यात २ चमचे कॉर्नफ्लॉवर घालून ते पाणी कढईत घालून ग्रेव्हीला उकळी आणा. वरून मीठ व साखर घाला. खायला देण्यापूर्वी अगदी आयत्या वेळेस मंचुरियन बॉल घालून मिनिटभर ग्रेव्ही उकळून गॅस बंद करा. म्हणजे मंचुरियन बॉल मऊ पडणार नाहीत.

साहित्य :- (व्हेज मंचुरियन ड्राय साठी)

तयार मंचुरियन बॉल्स
प्रत्येकी २-२ चमचे किसलेल्या भाज्या (कोबी, गाजर, सिमला मिरची) पातीचा कांदा
१ चमचा बारीक चिरलेले आलं व लसूण
१ चमचा (प्रत्येकी)सोया सॉस, रेड चिली सॉस, टोमॅटो सॉस
२ चमचे कॉर्नफ्लॉवर पाव कप पाण्यात एकत्र करून स्लरी करून घ्या.
मीठ व साखर चवीनुसार
तेल 

कृती :-
  1. एका कढईत१ चमचा तेल घालून मोठ्या गॅसवर लसूण, आलं परतून घ्या.
  2. सर्व भाज्या, कांदा, व सॉस घालून चांगले परता. लगेच कॉर्नफ्लोर ची स्लरी घालून चांगले परतून घ्या. मिश्रण दाट होऊ लागले की, मंचुरियन बॉल घालून मिनिटभर परतावे. जास्त परतू नये. लगेच गॅस बंद करा.खाण्यासाठी तयार आहेत व्हेज मंचुरियन ड्राय...

काही सुगरण टिप्स :-

  • भाज्या बारीक चिरून किंवा किसून घ्याव्यात. म्हणजे मंचुरियन बॉल्स कुरकुरीत, छान तयार होतात.
  • पाण्याचा वापर अजिबात करू नये. नाहीतर बॉल्स मऊ पडतात. व जास्त तेल शोषू लागतात.
  • तेल चांगले तापल्यावरच बॉल्स तळावेत. सतत ढवळत सर्व बाजूंनी बॉल्स तळून घ्या.सुरुवातीला हलक्या रंगावर तळून पुन्हा एकदा तांबूस रंगावर तळून घ्यावे. म्हणजे वरून क्रिस्पी बॉल्स तयार होतात.
  • बॉल्स करताना फार दाबून करू नये. म्हणजे आतपर्यंत ते तळले जातात.
  • कॉर्नफ्लॉवरचा वापर नक्की करा. त्यामुळे मिश्रणाला एकजीवपणा येतो. मैद्याचा वापर करायचा नसेल तर तांदळाचे पीठ सुद्धा वापरू शकता.
  • तळलेले बॉल्स झाकून ठेवू नये. नाहीतर ते मऊ पडतात.
  • रेस्टॉरंट सारखी स्मोकी चव हवी असल्यास तयार ग्रेव्हीमध्ये एक छोटी वाटी ठेवा. त्यात कोळसा गॅस वर गरम करून वाटीत ठेवा. त्यावर दोन-तीन थेंब तेल किंवा तूप घालून लगेच झाकण ठेवा.

अशाप्रकारे आंबट गोड चवीच्या ग्रेव्हीतील व्हेज मंचूरियन आणि क्रिस्पी असे व्हेज मंचुरियन ड्राय ची रेसिपी नक्की ट्राय करा. आणि आपल्या मैत्रिणी सोबत शेअर करा.
धन्यवाद 🙏

श्री स्वामी समर्थ