Corn chivada recipe / मक्याचा चिवडा

  Corn Chivada recipe / मक्याचा चिवडा

    Aajcha bet recipes च्या या लेखामध्ये खमंग आणि कुरकुरीत मक्याचा चिवडा घरगुती मसाला वापरून कसा करायचा याची रेसिपी दिलेली आहे.दिवाळीच्या फराळाचे ताट ज्याच्याशिवाय पूर्णच होत नाही. असा खमंग आणि कुरकुरीत पदार्थ म्हणजे चटकदार चिवडा... भारतीय खाद्य संस्कृती ही अनेकविध पदार्थांनी परिपूर्ण आहे. आपल्याकडे दिवाळीमध्ये अनेक प्रकारचे चिवड्याचे प्रकार केले जातात. भाजके पोहे, पातळ पोहे,जाड पोहे, मक्याचे पोहे यापासून चविष्ट असा चिवडा बनवून घरातील गृहिणी वाहवा मिळवतात. दिवाळीत घरात येणारी मित्रमंडळी, पाहुणे आम्हाला फक्त चिवडा खायला द्या.. असे आग्रहाने सांगतात.

     आज-काल फराळाचे पदार्थ करायला नोकरदार महिलांना वेळ नसतो. म्हणून फराळाचे पदार्थ बाहेरून मागवले जातात. असं असलं तरी चिवडा मात्र घरी करण्याकडेच त्यांचा कल अधिक असतो. अशावेळी स्वादिष्ट असा चिवडा करून सर्वांची तारीफ मात्र त्या मिळवतात. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा चिवडा बनवणे सोपे जरी असले तरी करताना काही चुका झाल्या तर तो बिघडलाच म्हणून समजा... इथं मी मक्याचा कमी तेलकट असा चिवडा Corn Chivada recipe घरगुती मसाला वापरून कसा बनवावा याची रेसिपी खाली देत आहे


Corn-chivada-recipe
Corn chivada recipe / मक्याचा चिवडा

साहित्य :- (चिवडा करण्यासाठी)

५०० ग्रॅम मक्याचे पोहे

१०० ग्रॅम शेंगदाणे

१२५ ग्रॅम भाजके डाळे

१०० ग्रॅम खोबऱ्याचे काप

५० ग्रॅम काजू

५० ग्रॅम मनुके

१०/१२ हिरव्या मिरच्या

कढीपत्ता

२ लसणाच्या कांड्या

३ चमचे पिठीसाखर

घरगुती चिवडा मसाला

तेल

साहित्य :- (चिवडा मसाल्यासाठी )

४ चमचे धणे

२ चमचे जिरे

३ चमचे बडीशेप

२ चमचे आमचूर पावडर/पाव चमचा सायट्रिक ॲसिड

१०/१२ लवंग

१०/१५ काळी मिरी

३ इंच दालचिनी तुकडे

५/६ तमालपत्र

३ चमचे मिरची पावडर

पाव चमचा हिंग

१/२ हळद, २ चमचे काळ मीठ व साधं मीठ

ही रेसीपी सुद्धा नक्की करून पहा :- शंकरपाळी / Shankarpali recipe in marathi

कृती :- (चिवडा मसाला बनवण्याची)

एका गरम कढईत काळी मिरी,लवंग, दालचिनी, तमालपत्र चांगले भाजून घ्या. धणे, जिरे, बडीशेप घालून हलकेसे परतून गॅस बंद करा. त्यावर आमचूर पावडर, मिरची पावडर, हळद, मीठ, हिंग घालून मसाला परतून घ्या. थंड झाल्यावर सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालून मसाला वाटून घ्या. तयार आहे चविष्ट असा घरगुती चिवडा मसाला... 

कृती :-

  1. बाजारातून चांगल्या प्रतीचे मक्याचे पोहे आणावेत. एका कढईत तेल चांगले कडकडीत गरम करावे. मक्याचे पोहे थोडे थोडे घालून कुरकुरीत असे तळून घ्या.
  2.  पोहे जसजसे तळून होतील तस तसे त्यावर पिठीसाखर व तयार चिवडा मसाला थोडा थोडा घालून पोह्यांना सर्व बाजूंनी लावून घ्या.
  3. त्या पाठोपाठ तेलात शेंगदाणे, भाजके डाळे, खोबऱ्याचे काप, काजू, मनुके तांबूस रंगावर तळून घ्या. प्रत्येक पदार्थ तळून झाला की, त्यावर थोडा थोडा चिवडा मसाला घालून व्यवस्थित मिसळून घ्या.
  4. सर्वात शेवटी बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, लसूण,कढीपत्ता कुरकुरीत असे तळून घ्या.
  5. तळलेले सर्व साहित्य मक्याच्या पोह्यांवर घालून चमच्याच्या मदतीने चिवडा व्यवस्थित परतून घ्या.
  6. चिवडा थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा.

काही सुगरण टिप्स :-

  • मक्याचे पोहे कडकडीत तेलात तळा. म्हणजे पोहे आकसणार नाही. कुरकुरीत होतील. पोह्यांवर लगेच मसाला व पिठीसाखर घाला. म्हणजे पिठीसाखर मुळे मसाला चिवड्याला व्यवस्थित लागला जाईल.
  •  मिरच्या, कढीपत्ता, लसूण कुरकुरीत होईपर्यंत तळा. नीट तळले नाही तर चिवडा मऊ पडू शकतो.
  •  हा चिवडा कमी तेलकट असतो. कारण याला पुन्हा फोडणीत घालून परतावे लागत नाही.
  •  या चिवड्यामध्ये जास्तीचे मीठ घालावे लागत नाही कारण चिवडा मसाल्यामध्ये मीठ आधीच घातले आहे. त्यामुळे चिवड्याला व्यवस्थित मीठ लागले जाते.
  • चिवडा संपूर्णपणे थंड झाल्यावरच हवाबंद डब्यात भरावा. म्हणजे तो मऊ पडणार नाही.

    अशाप्रकारे तयार केलेला चिवडा फक्त दिवाळीत नाही तर संपूर्ण वर्षभर केव्हाही करता येईल. ही रेसिपी आवडली तर नक्कीच ट्राय करा व मैत्रिणींसोबत शेअर करा. काही सूचना असतील तर कमेंट करून सांगा.

धन्यवाद 🙏 

श्री स्वामी समर्थ    

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या