महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात केल्या जाणाऱ्या पारंपारिक आणि झणझणीत पदार्थांपैकी एक खास पदार्थ म्हणजे मासवडी रस्सा. नाव ऐकून हा पदार्थ मांसाहारी वाटतो, पण प्रत्यक्षात हा शुद्ध शाकाहारी आणि अतिशय चवदार असा गावरान भाजीचा प्रकार आहे.घरी पाहुणे आले की, गरमागरम भाकरी, कच्चा कांदा आणि झणझणीत मासवडी रस्सा असा बेत हमखास केला जातो. पुणे, नगर आणि आसपासच्या भागात ही डिश विशेष लोकप्रिय असून आजकाल अनेक हॉटेलमध्येही मिळते. चुलीवर किंवा गावरान पद्धतीने केलेला मासवडी रस्सा तर अगदी अप्रतिम लागतो.
आजच्या लेखामध्ये मी तुम्हाला माझ्या आजीच्या पारंपरिक पद्धतीने मासवडी रस्सा कसा करायचा ते सविस्तर सांगणार आहे.
![]() |
| गावरान पद्धतीने तयार केलेला झणझणीत मासवडी रस्सा |
मासवडीसाठी लागणारे साहित्य -
सारणासाठी साहित्य-
- १ मोठा कांदा
- अर्धी वाटी पांढरे तीळ
- पाव वाटी सुके खोबरे
- १०/१५ लसूण पाकळ्या (गावरान लसूण असल्यास उत्तम)
- १ चमचा धणे
- खडा मसाला (२/३ लवंग, ५/६ काळी मिरी, दालचिनीचा तुकडा)
- १ चमचा बडीशेप
- कांदा लसूण मसाला
- मीठ
- कोथिंबीर
ही रेसीपी सुदधा नक्की करून पहा :- जवसाची चटणी
आवरणासाठी साहित्य -
- दीड वाटी बेसन पीठ
- १ चमचा हळद
- चिमूटभर हिंग
- १ चमचा मिरची पावडर किंवा (हिरवी मिरची, लसूण व जिरे वाटून)
- मीठ
- तेल
- पाणी आवश्यकतेनुसार
रस्सा करण्यासाठी साहित्य -
- २ कांदे (उभे चिरलेले)
- पाव वाटी सुके खोबरे
- २ चमचे तीळ
- ६/७ लसूण पाकळ्या
- आलं
- खडा मसाला (२/३ लवंग, मिरी,१ चक्रीफुल, दालचिनी बडीशेप,१ चमचा धणे)
- कोथिंबीर
- कढीपत्ता
- मीठ
- गरम मसाला
- घरगुती मसाला
- मिरची पावडर
- हळद
- तेल व पाणी
मासवडी रस्सा बनवण्याची कृती :- (Step-by-Step)
Step 1: सारण तयार करणे
कढई गरम करून त्यात सुके खोबरे भाजून घ्या व बाजूला काढा. त्यानंतर पांढरे तीळ, धणे, बडीशेप व खडा मसाला वेगवेगळे भाजून घ्या.
Step 2
त्याच कढईत थोडे तेल घालून एक मोठा कांदा बारीक चिरून तांबूस होईपर्यंत परता व बाजूला ठेवा.
Step 3
मिक्सरमध्ये भाजलेले तीळ, धणे, बडीशेप, खडा मसाला, लसूण, कोथिंबीर हे पाणी न घालता वाटा. त्यात भाजलेले खोबरे, कांदा-लसूण मसाला, भाजलेला कांदा व मीठ घालून कोरडे सारण तयार करा.
Step 4: बेसनाचे आवरण
कढईत २ चमचे तेल गरम करून त्यात हळद, हिंग व मिरची पावडर घाला. लगेच पाणी घालून उकळी आणा. उकळी आल्यावर बेसन घालून गुठळ्या न होऊ देता सतत ढवळा. मिश्रण घट्ट झाले की झाकण ठेवून थोडी वाफ द्या.
Step 5: मासवडी बनवणे
ओल्या पाटावर ओला सुती कपडा पसरवा. त्यावर थोडे खोबरे व कोथिंबीर घालून गरम बेसनाचा गोळा ठेवा व थापून घ्या. मधोमध सारण ठेवून कपड्याच्या साहाय्याने रोल करून माशाचा आकार द्या.
Step 6
अशाच प्रकारे सर्व मासवड्या तयार करून थंड झाल्यावर वड्या कापा.
Step 7: रस्सा तयार करणे
कढईत तेल घालून उभे चिरलेले कांदे खरपूस परता. त्यात खोबरे, तीळ व खडा मसाला परतून मिक्सरमध्ये लसूण, आलं व कोथिंबीरसोबत वाटून घ्या.
Step 8
कढईत फोडणी करून मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिंग, हळद, मसाले घाला. त्यावर वाटण घालून तेल सुटेपर्यंत परता. गरम पाणी घालून उकळी आणा. शेवटी गरम मसाला व कोथिंबीर घालून गॅस बंद करा.
मासवडी रस्सा सर्व्ह करण्याची पद्धत-
तयार झणझणीत मासवडी रस्सा गरमागरम भाकरी, पोळी किंवा भातासोबत सर्व्ह करा. कच्चा कांदा व लिंबू असल्यास चव आणखी खुलते.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
१) मासवडी रस्सा म्हणजे काय?
- मासवडी रस्सा हा महाराष्ट्रातील पारंपरिक शाकाहारी गावरान पदार्थ आहे. नाव मांसाहारी वाटले तरी हा बेसन व मसाल्यांपासून बनवलेला खास प्रकार आहे.
२) मासवडी रस्सा कोणत्या भागात प्रसिद्ध आहे?
-मासवडी रस्सा प्रामुख्याने पुणे, नगर, विदर्भ व ग्रामीण महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे.
३) मासवडी रस्सा भाकरीशिवाय कशासोबत खाऊ शकतो?
-मासवडी रस्सा गरमागरम भाकरीसोबत उत्तम लागतो. तसेच पोळी किंवा साध्या भातासोबतही छान लागतो.
४) मासवडी आधी करून ठेवता येते का ?
- होय, मासवडीच्या वड्या आधी तयार करून फ्रिजमध्ये १ दिवस ठेवता येतात आणि नंतर रस्स्यात घालता येतात.
५) मासवडी रस्सा कसा अधिक चवदार होतो?
-चुलीवर किंवा कढईत मंद आचेवर रस्सा शिजवल्यास आणि घरगुती मसाला वापरल्यास मासवडी रस्सा अधिक चवदार लागतो.
अशा प्रकारे गावरान पद्धतीने बनवलेला मासवडी रस्सा नक्की करून पहा.रेसिपी आवडल्यास कमेंट करा आणि इतरांशी शेअर करा 🙏
अशाच पारंपरिक रेसिपींसाठी “आजचा बेत” ब्लॉग फॉलो करा.
धन्यवाद 🙏
श्री स्वामी समर्थ

0 टिप्पण्या