उकडपेंडी रेसिपी | Jowar Ukadpendi Recipe in Marathi | पारंपरिक विदर्भ नाश्ता


   विदर्भातील पारंपरिक आणि पौष्टिक नाश्ता म्हणून ओळखली जाणारी उकडपेंडी ही ज्वारीच्या पिठापासून बनवली जाणारी एक सोपी, चवदार आणि पचायला हलकी रेसिपी आहे.“ओळख विदर्भातील पदार्थांची” या लेखमालेत आज आपण ज्वारीची उकडपेंडी कशी बनवायची ते सविस्तर पाहणार आहोत.

विदर्भात ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असल्याने ज्वारीची भाकरी, कण्या आणि उकडपेंडी यांचा रोजच्या आहारात मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. कमी साहित्यात तयार होणारी ही रेसिपी नाश्ता, दुपारचे जेवण किंवा हलके रात्रीचे जेवण म्हणून उत्तम ठरते.भाजी-भाकरीचा कंटाळा आला असेल तर One Pot Meal म्हणून उकडपेंडी हा उत्तम पर्याय आहे.आजकाल आहारतज्ञ देखील गव्हापेक्षा ज्वारीचा आहार घेण्याचा सल्ला देतात, कारण ज्वारी ग्लुटेन-फ्री, फायबरयुक्त आणि पचायला हलकी असते. त्यामुळेच पूर्वीच्या काळातील लोक साधा पारंपरिक आहार घेऊनही काटक व निरोगी राहत असत.

चला तर मग, विस्मरणात चाललेली ही विदर्भाची पारंपरिक उकडपेंडी रेसिपी सविस्तर पाहूया. 


उकडपेंडी रेसिपी / पारंपरिक विदर्भाची ज्वारी उकडपेंडी
पारंपारिक विदर्भाची ज्वारी उकडपेंडी - पौष्टिक आणि पचायला हलकी रेसिपी 

उकडपेंडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य :-

  • १ वाटी ज्वारीचे पीठ
  • १ मध्यम आकाराचा कांदा (बारीक चिरलेला)
  • १ टोमॅटो (बारीक चिरलेला)
  • १/२ चमचा मोहरी
  • १/२ चमजा जिरे
  • १/२ चमचा धणेपूड
  • १/२ चमचा हळद
  • १ चमचा मिरची पावडर
  • २ चमचे दही 
  • २/३ हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या )
  • कढीपत्ता व कोथिंबीर
  • पाव चमचा हिंग
  • चवीनुसार साखर, मीठ
  • ३ मोठे चमचे तेल ( शेंगदाणा तेल असल्यास उत्तम)
  • आवश्यकतेनुसार गरम पाणी

उकडपेंडी बनवण्याची कृती :- ( step-by-step )

Step 1

एका जाड बुडाच्या लोखंडी कढईत तेल गरम करा. त्यामध्ये मोहरी, जिरे, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि हिंग घालून छान फोडणी करा.

Step 2

फोडणीवर बारीक चिरलेला कांदा घालून मध्यम आचेवर मऊ होईपर्यंत परतून घ्या. कांदा शिजल्यानंतर त्यात ज्वारीचे पीठ घालून मंद आचेवर सतत परतत १०–१२ मिनिटे खमंग भाजून घ्या.

Step 3

पीठ व्यवस्थित भाजल्यावर त्यात हळद, तिखट आणि धणेपूड घालून पुन्हा चांगले परतून घ्या.

Step 4

आता बारीक चिरलेला टोमॅटो घालून मिश्रण हलके होईपर्यंत परता. त्यानंतर दोन चमचे दही घालून सर्व मिश्रण एकजीव करा.
आवश्यकतेनुसार गरम पाणी हळूहळू घालून सतत परतत राहा. चवीनुसार मीठ व साखर घाला.

👉 ज्वारीचे पीठ पाणी पटकन शोषते, त्यामुळे आवडीनुसार सैलसर किंवा मोकळी उकडपेंडी तयार करा. मिश्रण कढईला चिकटत असल्यास कडेने थोडे तेल घालू शकता.

Step 5

उकडपेंडी व्यवस्थित शिजल्यानंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. गॅस बंद करून झाकण ठेवा.
सर्व्ह करताना वरून कच्चा कांदा व कोथिंबीर घालून गरमागरम उकडपेंडी वाढा

काही सुगरण टिप्स :-

  • ज्वारीचे पीठ नसेल तर गव्हाचे किंवा तांदळाचे पीठ वापरू शकता.
  • निम्मे गव्हाचे व निम्मे ज्वारीचे पीठ वापरल्यास चव छान लागते.
  • पीठ चांगले भाजणे फार महत्त्वाचे आहे, त्यामुळे उकडपेंडी चिकट होत नाही.
  • आंबटपणासाठी टोमॅटो, दही किंवा ताक वापरू शकता.
  • शक्यतो गरम पाणीच वापरा.
  • शेंगदाणा तेल वापरल्यास पारंपरिक चव टिकून राहते.
  • वाढताना वरून थोडे कच्चे तेल घातल्यास चव आणखी खुलते. 

हेही वाचा :- रोडगे/पानगे रेसिपी

ज्वारी खाण्याचे आरोग्यदायी फायदे :-

  • ज्वारी फायबरयुक्त असल्यामुळे पचन सुधारते व बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
  • कॅल्शियम, मॅग्नेशियम व आयर्न मुबलक असल्याने हाडे व रक्तपेशी मजबूत होतात.
  • बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.
  • प्रोटीनचे प्रमाण अधिक असल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.
  • ग्लुटेन-फ्री असल्यामुळे डाएट करणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय आहे. 

नेहमी विचारले जाणारे प्रश्न ( FAQ )

१) उकडपेंडी किती वेळ ताजी राहते ?

- उकडपेंडी गरम असतानाच खाणे उत्तम. थंड झाल्यावर चव कमी होते.

२) उकडपेंडी  करण्यासाठी ज्वारीचे पीठ उपलब्ध नसल्यास कोणते पीठ वापरू शकतो ?

- उकडपेंडी  करण्यासाठी  ज्वारी चे पीठ नसेल तर गहू किंवा तांदळाचे पीठ सुद्धा वापरू शकता.

३) उकडपेंडी करण्यासाठी दही नसेल तर काय वापरू शकतो ?

- उकडपेंडी  करताना दही नसेल तर टोमॅटो किंवा ताकाचा वापर करू शकता. ताक वापरणार असाल तर पाण्याचा वापर जपून करावा.


अशाप्रकारे पोटभरीचा नाश्ता, दुपारचे जेवण किंवा रात्रीच्या जेवणात उकडपेंडी हा विदर्भातील पारंपारिक पदार्थ करून पहा आणि आवडल्यास नक्की कमेंट करा.अशाच पारंपारिक रेसिपी पाहण्यासाठी "आजचा बेत" या माझ्या रेसिपी ब्लॉगला नक्की फॉलो करा. यासाठी रेसिपीच्या शेवटी दिलेल्या फॉलो या ऑप्शनवर वर क्लिक करा.👍🏻🙏 

तुमच्यापैकी कोणी विदर्भातील असेल तर तुम्हाला विदर्भातील कोणता पदार्थ  आवडतो हे मला कमेंट करून नक्की सांगा.

धन्यवाद 🙏

श्री स्वामी समर्थ







    

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या