सोयाबीन बिर्याणी / Soyabean biryani recipe

 सोयाबीन बिर्याणी / Soyabean biryani recipe

     आजचा बेत रेसिपीज Aajcha bet recipes च्या या लेखामध्ये शाकाहारी लोकांना सुद्धा खाता येईल अशी सोयाबीन बिर्याणीची रेसीपी देत आहे. तुम्हाला सोयाबीन आवडतात का? आवडत असेल तर तुम्ही सोयाबीनची भाजी बऱ्याचदा खाल्ली असेल. सोयाबीनला प्रथिनांचा स्त्रोत मानला जातो. घरातील लहान मुले, मधुमेही रुग्ण, हृदयरोगी पेशंट आणि ज्यांना वजन
कमी करायचं असेल अशी मंडळी यांच्यासाठी तर सोयाबीन हा महत्त्वाचा घटक आहे. पण रोज रोज त्याच चवीची भाजी खाऊन कंटाळा येतो. अशावेळी घरातील गृहिणी आपलं पाक कौशल्य पणाला लावून पदार्थ बनवतात.
     बिर्याणी म्हटलं तर तोंडाला पाणी सुटतं... पण पण ती करताना कधी फसते किंवा भात परफेक्ट शिजवता येत नाही... अशा सर्वांसाठी अगदी सोप्या पद्धतीने बिर्याणीची रेसिपी देत आहे.
    सणासुदीचे दिवस सुरू आहेत .त्यामुळे बऱ्याच घरात मांसाहार केला जात नाही. म्हणूनच नॉनव्हेजलाही टक्कर देणारी वेगळ्या चवीची सोयाबीन बिर्याणी  Soyabean Biryani ची रेसिपी खाली देत आहे.....

Soyabean-biryani-recipe
 सोयाबीन बिर्याणी / Soyabean biryani recipe 


बिर्याणी साठी लागणारे साहित्य-  (४ व्यक्तींसाठी)

५०० ग्रॅम - बासमती तांदूळ 
१५० ग्रॅम - सोयाबीन चंक्स (छोटे)   
२५० ग्रॅम - कांदे 
१०० ग्रॅम - तेल
१५० ग्रॅम - टोमॅटो
२ मोठे चमचे - तीळ, खसखस, काजू पेस्ट
१५० ग्रॅम - दही  (ताजे, फार आंबट असू नये)
१ छोटा चमचा - हळद
२ मोठे चमचे - शाही बिर्याणी मसाला 
१ मोठा चमचा - आलं, लसुण पेस्ट
अर्धी वाटी - पुदिना
कोथिंबीर
खडे मसाले-(तमालपत्र, लवंग, मिरी, दालचिनी, हिरवी वेलची)
१ चमचा - जिरे
३/४ - हिरव्या मिरच्या 
पाव वाटी - केशर घातलेले दूध
५/६ मोठे चमचे - साजूक तूप
मीठ व पाणी

सोया चंक्स ची ही रेसीपी सुद्धा पहा : Soya nuggets recipe 

बिर्याणीची पूर्वतयारी :-
  1. बिर्याणी साठी लागणारा तांदूळ स्वच्छ धुऊन अर्धा तास भिजत ठेवावा.
  2. सोया चंक्स उकळत्या पाण्यात घालून गॅस बंद करून १५ मिनिटे झाकून ठेवावे. नंतर स्वच्छ धुऊन जास्तीचे   पाणी पिळून घ्यावे.
  3. कढईत तेल गरम करा. त्यात २०० ग्रॅम कांदा उभा पातळ चिरून तांबूस रंगावर तळून घ्या. तळताना थोडी साखर घाला म्हणजे कांदा लवकर तांबूस होतो.
  4. एका भांड्यात दही, हळद, आले लसूण पेस्ट, तीळ खसखस काजू पेस्ट, मीठ, बारीक चिरलेला पुदिना,   कोथिंबीर, मिरची पावडर, १ मोठा चमचा बिर्याणी मसाला हे सर्व साहित्य घ्या. त्यात भिजलेले सोया चंक्स घालून व्यवस्थित एकत्र करा. वरून तळलेला कांदा  घाला. कांदा तळलेले तेल दोन-तीन चमचे  घाला.अर्ध्या तासासाठी  बाजूला ठेवा. 
सोयाबीन बिर्याणी कशी बनवायची ? 
  1. मोठ्या पातेल्यात तांदळाच्या चार पट पाणी घेऊन उकळत ठेवा. त्यात २ तमालपत्र, ४/५ लवंग, मिरी, दालचिनीचा तुकडा, २/३ हिरवी वेलची, पुदिन्याची पाने घाला. पाणी उकळले की, भिजत ठेवलेला तांदूळ    निथळून घाला. सतत हलवत मोठ्या गॅसवर तांदूळ 80 टक्के शिजवून घ्या.
  2. बिर्याणी करण्यासाठी लागणाऱ्या पातेल्यात उरलेले तेल घाला.१ चमचा जिरे, तमालपत्र,  लवंग मिरी, उभा    चिरलेला कांदा, घालून परता. बारीक चिरलेले टोमॅटो घाला. टोमॅटो मऊ झाल्यावर हळद, मिरची पावडर घाला.  मॅरीनेट केलेले मिश्रण घाला. चांगले परतून घ्या. थोडे पाणी घालून ५ मिनिटे मंद गॅसवर  शिजवा.
  3. निम्मी भाजी काढून घ्या. ते पातेले गरम  तव्यावर ठेवा. भाताचा एक थर भाजीवरघाला. वरून केशर घातलेले थोडे दूध,  तळलेला कांदा, थोडा पुदिना, कोथिंबीर  घाला.१/२ चमचे तूप घाला. थोडा बिर्याणी  मसाला वरून भुरभुरा. उरलेली भाजी घाला. त्यावर पुन्हा एकदा उरलेला भात घाला. वरून पुन्हा केशर घातलेले दूध, तळलेला कांदा, पुदिना, कोथिंबीर घाला. एक-दोन चमचे तूप घाला. आता झाकण घट्ट लावा. किंवा त्यावर वजन ठेवा.५/७ मिनिटे चांगला दम द्या. गॅस बंद करा. बिर्याणीला स्मोक देण्यासाठी एका वाटीत गरम केलेला कोळसा  ठेवा. त्यावर तूप घालून ती वाटी लगेच  पातेल्यात ठेवून झाका. 

काही सुगरण टिप्स -

  • बिर्याणीसाठी तांदूळ निवडताना तो लांब जाण्याचा व जुना वापरावा. (बासमती किंवाकोलम तांदूळ)
  • तांदूळ 80 टक्के तरी शिजवून घ्यावा. तांदूळ 80 टक्के शिजला हे ओळखण्यासाठी भाताचे शीत दोन बोटात दाबून पहावे. दोन-तीन तुकडे   भात शिजला असे समजावे. 
  • कांदा तळताना तेल कडकडीत गरम असावे. व कांदा तळेपर्यंत गॅस मोठा असावा. म्हणजे  कांदा मऊ पडणार नाही.
  • बिर्याणीचे थर लावताना दूध व तुपाचा वापर अवश्य करावा. तूप वापरल्याने भात मोकळा  होतो व दुधाचा वापर केल्यास त्याचा ओलावा कायम राहतो. होणारी बिर्याणी ही फार कोरडी होत नाही. व घशात अडकत नाही.
  • बिर्याणीचे पातेले गरम तव्यावर ठेवावे. पातेल्यावर घट्ट बसणारे झाकण लावावे. म्हणजे बिर्याणीला दम चांगला बसतो.
  • बिर्याणीला शेवटी स्मोक नक्की द्या... म्हणजे अगदी हॉटेल सारखी चव बिर्याणीला येते.

    अशाप्रकारे चमचमीत , शाकाहारी लोकांना सुद्धा खाता येईल अशी सोयाबीन दम बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे....रेसिपी नक्की करून बघा आणि आवडली तर मैत्रिणींसोबत शेअर करा. 

धन्यवाद🙏 

||श्री स्वामी समर्थ||


* वरील बिर्याणी साठी वापरलेल्या मसाल्याची रेसिपीची लिंक सोबत जोडली आहे.

 बिर्याणी मसाला


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या