जवसाची चटणी / Flaxseed chutney / Javas chutney recipe

 जवसाची  चटणी / Flaxseed chutney | Javas chutney

     Aajcha bet recipes च्या या लेखामध्ये पारंपरिक पद्धतीने जवसाची चटणी कशी करायची ते पाहूया.दिवसेंदिवस थंडी वाढू लागली आहे.अशावेळी जेवताना गरमागरम आणि चमचमीत पदार्थ खायची इच्छा प्रत्येकाला होतेच होते. चव वाढवणारे आणि पौष्टिक पदार्थ आहारामध्ये घेताना वजन वाढणार नाही याकडे सुद्धा विशेष लक्ष दिले जाते. जेवणाचे ताट वाढताना डावी बाजू सुद्धा महत्त्वाची असते. म्हणजेच तोंडी लावण्यासाठी असणारे पदार्थ. या दिवसात लोणच्या ऐवजी चटण्यांचा वापर विशेष केला जातो. जसे की, शेंगदाणा चटणी, खोबरे किंवा तिळाची चटणी, कारळ्याची चटणी, आणि हल्ली सुपर फूड म्हणून ओळखली जाणारी जवसाची  चटणी..

    जवस हे एक तेलवर्गीय बी असून याचा आहारात समावेश केल्यास अनेक फायदे होतात. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात कच्चे तेल घालून जवसाची चटणी, सोबत गरमागरम भाकरी असा पारंपारिक बेत असल्यास जेवण जरा जास्तच जाईल. चला तर मग जवसाची चटणी Javas chutney recipe पारंपारिक पद्धतीने कशी करायची याची सोपी कृती या लेखामध्ये दिली आहे. शिवाय आहारात जवस खाल्ल्यामुळे शरीराला होणारे फायदे कोणते आहेत याची सुद्धा परिपूर्ण माहिती इथे दिली आहे. म्हणून लेख शेवटपर्यंत वाचा.



जवसाच्या चटणीसाठी लागणारे साहित्य :-

१२५ ग्रॅम जवस
१०/१५ लसणाच्या पाकळ्या
२ चमचे लाल मिरची पावडर
चवीनुसार मीठ

जवसाची चटणी कशी करायची?

कृती :-
  1. सर्वप्रथम एका लोखंडी कढईत मंद आचेवर जवस चांगले खरपूस भाजून घ्यावे. करपू न देता चांगले परतून घ्यावेत. जवस कच्चे राहिल्यास चटणी खाताना चिकट लागते. नंतर एका परातीत काढून थंड करून घ्या.
  2. मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्यावेत. त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या, मीठ व मिरची पावडर घालून पुन्हा एकदा चांगले बारीक वाटून घ्यावे.
  3. मिक्सर ऐवजी लोखंडी खलबत्ता असल्यास ही चटणी त्यामध्ये चांगली कुटून घ्यावी.चटणीची चव छान लागते. कुटल्या मुळे जवसाचे तेल सुटून खमंग अशी जवसाची चटणी तयार होते.
  4. खमंग अशी चटणी कच्चे तेल घालून गरमागरम ज्वारीच्या भाकरी सोबत छान लागते.


जवसाची चटणी खाण्याचे  फायदे :-

  1. जवस खाणे हे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यामध्ये ओमेगा ३ फॅटी ऍसिड चे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे हार्ट अटॅक येण्याचा धोका कमी होतो. रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते. रक्त पातळ होते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो.
  2. जवस मध्ये लिग्नान्स अँटिऑक्सिडंट भरपूर असल्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत होते. स्त्रियांचे ब्रेस्ट कॅन्सर पासून व पुरुषांचे प्रोस्टेट कॅन्सर पासून रक्षण होते.
  3. लोह भरपूर प्रमाणात असल्यामुळे ॲनिमिया दूर करण्यास उपयुक्त ठरते.
  4. ॲटीऑक्सीडेंट बॉडीला डिटॉक्स करतात. त्यामुळे लिव्हरचे आजार होत नाहीत.
  5. रोज आहारात घेतल्यास हाडे व सांधे मजबूत होतात.
  6. फायबर्स भरपूर असते. त्यामुळे वजन आटोक्यात राहते.
  7. शाकाहारी लोकांना आवश्यक असणारे ओमेगा ३ फॅटी ॲसिड जवस मध्ये असते. म्हणून शाकाहारी लोकांचे सुपर फूड म्हणून आहारात घ्यावे.
ही रेसीपी सुद्धा नक्की करून पहा :- हुलग्याचे शेंगोळे/ Shengole recipe 

    अशा रीतीने आरोग्याला पोषक असे सर्व घटक जवसामध्ये असतात. म्हणून रोजच्या जेवणात दोन-तीन चमचे चटणी खायला काही हरकत नाही. अगदी सोप्या पद्धतीने होणारी ही चटणी करून नक्की पहा.आणि कमेंट मध्ये तुमची काही नवीन पद्धत असेल तर नक्की शेअर करा.
धन्यवाद. 🙏

श्री स्वामी समर्थ



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या