अनारसे / Anarse recipe 2024
Aajcha bet recipes च्या या लेखामध्ये कुरकुरीत आणि जाळीदार अनारसे कसे करायचे ते पाहूया. दिवाळी फराळातील अत्यंत महत्त्वाचा आणि प्रत्येकाच्या आवडीचा पदार्थ म्हणजेच'अनारसे'!!
कुरकुरीत आणि जाळीदार अनारसे बनवण्याची तयारी अगदी दिवाळीच्या काही दिवस अगोदरच केली जाते. कारण दिसायला जरी सोपा आणि झटपट होणारा पदार्थ असला तरी त्याची पूर्वतयारी काही दिवस आधीच केली तर तयार होणारा अनारसा हा खमंग,खुसखुशीत आणि जाळीदार होतो. अनारशासाठी पीठ तयार करणे म्हणजेच अत्यंत किचकट आणि वेळ खाऊ प्रक्रिया आहे. म्हणून बरेच जण विकतचे पीठ देखील आणतात.पण घरी बनवलेल्या पिठापासून जे अनारसे बनतात त्याची सर त्याला नसते. अगदी पारंपारिक पद्धतीने तयार केलेले पीठ अगदी सहा महिने सुद्धा छान टिकते.
इथं मी तांदूळ भिजवण्यापासून ते अनारसे करेपर्यंतची रेसिपी दिली आहे. दिवाळीतील पदार्थांमध्ये सर्वात जास्त मला आवडणारा पदार्थ म्हणजे कुरकुरीत आणि जाळीदार अनारसे हाच आहे. म्हणूनच बऱ्याचदा केलेल्या विविध प्रयोगातून साधलेली अत्यंत सोपी रेसिपी मी आज सांगणार आहे. कारण माझ्याकडून सुद्धा बऱ्याचदा अनारसे करताना ते फसले आहेत. पण तरीसुद्धा मी अनेकदा युट्युबवर रेसिपी पाहून, पुस्तकातून वाचून परफेक्ट अनारसे करायला शिकले. अगदी छोटी जरी चूक झाली, तरी सर्व मेहनत वाया जाते. म्हणूनच अत्यंत सोप्या पद्धतीने आतून मऊ लुसलुशीत आणि जाळीदार अनारसे Anarse recipe in marathi इथे देत आहे.
| अनारसे / Anarse recipe 2024 |
साहित्य :-
- सर्वप्रथम कोणताही जुना तांदूळ/कणी घ्या. स्वच्छ धुऊन एका पातेल्यात तीन दिवस भिजत घाला. प्रत्येक दिवशी सकाळी व संध्याकाळी स्वच्छ धुऊन त्याचे पाणी बदलून पुन्हा झाकून ठेवा. म्हणजे तांदळाचा वास येणार नाही.
- चौथ्या दिवशी पुन्हा तांदूळ स्वच्छ धुऊन त्याचे पाणी निथळून काढा. एका चाळणीत थोडा वेळ ठेवून पूर्ण पाणी निथळल्यावर स्वच्छ सुती कपड्यावर तांदूळ फॅन खाली अर्धा तास सुकवत ठेवा. तांदूळ पूर्ण कडक वाळवू नयेत. थोडे ओलसर असतानाच मिक्सरच्या छोट्या भांड्यात फिरवून बारीक पीठ करून घ्यावे.मैद्याच्या चाळणीने दोन-तीन वेळा चाळून घ्या. उरलेली भरड पुन्हा वाटून घ्या. सर्व पीठ व्यवस्थित चाळून घ्या.
- तयार पीठ एका परातीत घेऊन वाटीने मोजा. त्यातील थोडे पीठ बाजूला ठेवा. म्हणजे जर पीठ पातळ झाले, तर वापरता येईल. आता जेवढे पीठ आहे त्याच्या निम्मा म्हणजेच एक वाटी पीठ घेतले तर अर्धी वाटी किसलेला गूळ लागेल. पिठात गुळ घालून व्यवस्थित एकजीव करून घ्या. त्यासाठी मिक्सरचा वापर केला तरी चालेल. पूर्वी उखळात कुठून पीठ केले जायचे.
- तयार पिठाचा लाडू बनवून एका स्टीलच्या डब्यात सहा- सात दिवस पीठ झाकून ठेवावे. म्हणजे पीठ चांगले मुरते व अनारसे जाळीदार बनतात.
- अनारसे करण्यासाठी लागेल तेवढे तयार केलेले पीठ परातीत घेऊन छान मळून घ्या. लोण्यासारखे पीठ तयार होते. थोडेसे साजूक तूप घालावे.
- कढईत तेल किंवा साजूक तूप गरम करायला ठेवा. छोटासा गोळा तेलात घाला. तो पटकन वर आला ती गॅस मध्यम करावा. तयार पिठाचा छोटासा गोळा घेऊन खसखस व साखरेच्या मिश्रणावर बोटाच्या सहाय्याने फिरवत अलगद थापावा.
- अनारशाची खसखशीवर थापलेली बाजू वर येईल अशा पद्धतीने तो तेलात सोडावा. बाजूने तेल उडवत तो गुलाबी रंगावर तळावा. अलगद बाजूला काढून एका भांड्यात कच्चे पोहे घेऊन त्यावर निथळत ठेवावा. नाहीतर जाळीवर ठेवून तेल निथळून घ्यावे.
- एकावेळी एक अनारसा तेलात सोडावा. अशाप्रकारे सर्व अनारसे तळून घ्या. तयार पीठ अगदी सहा महिन्यापर्यंत छान राहते. म्हणून लागेल तसे अनारसे करू शकतो.
काही सुगरण टिप्स :-
- अनारशासाठी तांदूळ शक्यतो जुना वापरावा. नवीन असल्यास अनारसे चिकट होतात.
- सुगंधित तांदूळ वापरले तर त्याची चव छान लागते. यासाठी आंबेमोहोर किंवा बासमती तांदूळ सुद्धा वापरू शकतो.
- तांदूळ जास्त सुकवू नये. नाहीतर तयार होणारे पीठ भुसभुशीत होते. गुळामध्ये मिळून येत नाही.
- गुळ मऊ वापरावा. शक्यतो पिवळा गुळ असल्यास अनारशाचा रंग छान येतो. सेंद्रिय गुळ वापरला तरी तो पौष्टिक असतो. रंग मात्र थोडा डार्क होतो. चिवट व ओलसर गुळ किंवा चिक्कीचा गुळ वापरू नये. गुळ मिसळताना योग्य प्रमाणात घ्यावा. नाहीतर अनारसे कडक होतात.
- खसखशी बरोबर थोडी साखर घ्यावी. म्हणजे अनारशाला जाळी छान येते.
- अनारसे एकाच बाजूने तळावे. सर्व तेल चाळणीवर ठेवून निथळून घ्यावे. किंवा कच्च्या पोह्यांवर टाकले तर पोह्यांमध्ये तेल शोषले जाते. व त्या पोह्यांचा वापर फोडणीचे पोहे बनवण्यासाठी सुद्धा करू शकतो.
- पीठ जर व्यवस्थित मुरले नाही तर अनारसे करताना तेलात विरघळतात.
- पीठ मळताना जर गोळा होत नसेल तर फक्त दुधाचा हात लावून मळावे. दूध किंवा पाणी वापरू नये.
0 टिप्पण्या