रवा बेसन लाडू / Rava besan ladoo recipe
Aajcha bet recipes च्या या लेखामध्ये रवाळ असे रवा बेसन लाडू कसे करायचे याची रेसिपी दिलेली आहे.लाडू म्हटलं की, प्रत्येकाच्या जिभेला पाणी सुटतं... फराळाच्या ताटातील सर्व पदार्थांमध्ये लाडूला विशेष स्थान असतं. मग तो कोणत्याही प्रकारचा असो. रवा लाडू, बेसन लाडू, बुंदीचे लाडू, शेव लाडू असे नानाविध प्रकारचे लाडू बनवण्याची परंपरा आपल्याकडे आहे.
उत्कृष्ट चवीचे लाडू बनवणे हे वाटतं तेवढं सोपं काम नाही. थोडी जरी चूक झाली तरी लाडू बिघडतात. कधी पाक करताना चुकतो, किंवा रवा किंवा बेसन योग्य प्रमाणात न भाजल्यामुळे लाडू घशाला चिकटतात, कोरडे वाटतात. म्हणूनच बहुतेक रवा बेसन लाडू हा लाडूचा प्रकार तयार झाला असेल...!! रवा व बेसनाचे कॉम्बिनेशन होऊन अप्रतिम चवीचे लाडू होतात. याचीच सोपी रेसिपी मी आपल्यासाठी देत आहे..
![]() |
| रवा बेसन लाडू / Rava besan ladoo recipe |
साहित्य :-
२५० ग्रॅम बारीक रवा
२५० ग्रॅम बेसन पीठ
५०० ग्रॅम पिठीसाखर
साजूक तूप
वेलची जायफळ पूड
आवडीनुसार सुकामेवा
हे रेसीपी सुद्धा नक्की करून पहा :- Corn chivada recipe / मक्याचा चिवडा
कृती :-
- सर्वप्रथम लाडू साठी लागणारे बेसन व रवा बारीक चाळणीने चाळून घ्या.
- एका पसरट मोठ्या कढईत साजूक तूप घालून रवा मंद आचेवर भाजून घ्या. हलका तांबूस रंग आल्यावर रवा परातीत काढून घ्या.
- त्याच कढईत पुन्हा साजूक तूप घालून बेसन मंद आचेवर भाजून घ्या. लागेल तसे तूप घालून बेसन तांबूस रंगावर भाजून घ्यावे. मिश्रण तूप सोडू लागले, की भाजलेला रवा घालून पुन्हा मंद आचेवर मिश्रण भाजून घ्यावे.
- रवा व बेसन भाजून झाले की, त्यावर दोन चमचे दूध घालून मिक्स करावे. मिश्रण फसफसू लागते. रवाळ असे मिश्रण तयार होते. चांगले परतून त्यामध्ये वेलची जायफळ पूड घाला. व गॅस बंद करा.
- मिश्रण कोमट झाले की,पिठीसाखर घालून व्यवस्थित मिसळून एकजीव करा. आवडीनुसार सुकामेवा घालून मिश्रणाचे मध्यम आकारात लाडू वळा.
काही सुगरण टिप्स :-
- लाडूसाठी बेसन पीठ घेताना शक्यतो डाळ हलकेसे भाजून गिरणीतून दळून आणलेले बेसन पीठ वापरावे. त्यामुळे पीठ भाजण्यासाठी लागणारा वेळ कमी लागतो.
- रवा बारीक वापरावा. लाडू खाताना कचकच लागत नाही.
- पिठीसाखर घालताना मिश्रण कोमट असावे. नाहीतर लाडू काळपट होतात.
- दुधाचा वापर केल्याने लाडू रवाळ होतात.
- बेसन व रवा भाजताना शक्यतो मंद आचेवर तांबूस रंग येईपर्यंत भाजावे.त्यामुळे लाडू घशाला चिकटत नाही.
- लाडू वळताना नीट वळले जात नसतील तर तूप गरम करून घालावे. व पुन्हा मिश्रण व्यवस्थित एकजीव करून लाडू वळावेत.
या सर्व टिप्स वापरून जर लाडू केले तर लाडू रवाळ आणि तोंडात टाकतात विरघळणारे असे होतील.ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा.
धन्यवाद 🙏
श्री स्वामी समर्थ

0 टिप्पण्या