खरवस रेसिपी मराठी / घरच्या घरी पारंपारिक खरवस कसा बनवायचा ? / Kharvas Recipe

     

                                                                                                                                                                       Aajcha bet recipes च्या या लेखामध्ये आपण घरच्या घरी पारंपारिक पद्धतीने पौष्टिक खरवस कसा बनवायचा ते सविस्तर पाहणार आहोत. खरवस हे नाव ऐकलं की,तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही.गाय किंवा म्हैस यांच्या चीकाच्या घट्ट दुधापासून तयार होणारा हा मऊसूत,चविष्ट आणि प्रोटीनयुक्त गोड पदार्थ आहे.
गाय-म्हैस व्याल्यानंतर पहिल्या ३/४ दिवसांचे दूध म्हणजे चीक.त्यापासून खरवसाच्या सुंदर वड्या तयार केल्या जातात.जस आईच पहिलं दूध बाळासाठी अमृतासमान असतं,तसच हे दूध वासराच्या वाढीसाठी अत्यंत पोषक  असतं.उष्ण व पौष्टिक असल्यामुळे हिवाळ्यात खाण्यासाठी खरवस अतिशय उत्तम पारंपारिक पदार्थ आहे,
आजकाल शुद्ध चीक मिळण कठीण झालं असलं तरी योग्य प्रमाण व पद्धत माहीत असेल तर घरीही उत्तम खरवस तयार करता येतो.
या लेखामध्ये खरवस रेसिपी मराठी मध्ये साहित्य,कृती,आणि आरोग्यदायी फायदे सविस्तर दिले आहेत. 

घरच्या घरी पारंपारिक खरवस रेसिपी मराठी
घरच्या घरी पारंपारिक खरवस रेसिपी मराठी 


खरवस बनवण्यासाठी लागणारे साहित्य :-

५०० मिली. खरवसाचे दूध/ चीक (पहिल्या दिवशीचा)
५०० मिली. म्हशीचे कच्चे दूध 
३०० ग्रॅम गूळ
वेलची पूड/सुंठ -जायफळ पूड 

ही रेसीपी सुद्धा नक्की करून पहा :-  Shrikhand Recipe in marathi 

खरवस बनवण्याची कृती :-

  1. खरवस बनवण्यासाठी इथं मी म्हशीचा चीक वापरला आहे.तो चीक म्हैस व्याल्यानंतर पहिल्या दिवशी जो चीक काढला जातो तो आहे. म्हणून तो जरा घट्टच असतो.
  2. या चिकाच्या दुधात म्हशीचेच कच्चे दूध घालावे. इथं मी जेवढा चीक आहे तेवढेच कच्चे दूध वापरले आहे. चिकाच्या घट्टपणावर दूध वापरले जाते. दुसऱ्या दिवसाचा चीक असल्यास निम्मे दूध वापरावे. आणि तिसऱ्या दिवसाचा असल्यास निम्म्याहून कमी दूध घालून खरवस बनवला जातो. बाजारातून विकत आणताना तसं डेअरीवाल्यांना विचारावे.
  3. दोन्ही दूध एकत्र करून त्यामध्ये किसून घेतलेला गुळ विरघळून घ्यावा. व हे दूध गाळून घ्यावे. म्हणजे गुळातील कचरा बाजूला होईल.
  4. आवडीनुसार या मिश्रणात वेलची जायफळ पूड घालून व्यवस्थित एकजीव करावे.
  5. खरवस बनवण्यासाठी कुकरचा वापर करत असाल तर २ भांड्यामध्ये  समप्रमाणात मिश्रण ओतून घ्यावे. कुकरच्या झाकणाला शिट्टी न   लावता तळाशी पाणी घालून त्यामध्ये पहिला डबा व्यवस्थित ठेवा. त्यावर झाकण ठेवून दुसरा डबा ठेवावा. त्यावर सुद्धा झाकण लावून कुकरचे झाकण लावून मध्यम आचेवर अर्ध्या तासासाठी खरवस वाफवून घ्यावा.
  6. खरवस जर पातेल्यात शिजवणार असाल तर एका पसरट भांड्यात दूध घालून ते भांडे पातेल्यात तळाशी पाणी घालून त्यावर स्टॅन्ड ठेवून स्टॅंडवर ते भांडे ठेवावे. आणि वरून झाकण लावून पातेले घट्ट झाकणाने बंद करून खरवस अर्ध्या तासासाठी वाफवून घ्यावा.
  7. खरवस थंड झाला की, त्याच्या वड्या पाडून कोमट असतानाच खायला घ्यावा. किंवा खरवसाचे भांडे फ्रिजमध्ये ठेवून पाच-सहा तासानंतर थंड करून खाल्ला तरी छान लागतो.

    अशाप्रकारे उत्कृष्ट चवीचा खरवस खाण्यासाठी तयार आहे. हल्ली बाजारात सुद्धा रस्त्यावर खरवसाच्या वड्या मिळतात. परंतु तो पनीर सारखा पांढरा शुभ्र दिसतो. कधी कधी चायनाग्रास पासून हा खरवस बनवला जातो. म्हणून घरच्या घरी पारंपारिक पद्धतीने खरवस बनवल्यास लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच नक्की आवडेल. तुमच्या घरी खरवस कसा बनवला जातो. हे मला कमेंट करून नक्की सांगा.


काही सुगरण टिप्स :-

  • खरवस बनवताना गाईचा चीक असल्यास गाईचे दूध वापरावे. आणि म्हशीचा चीक असल्यास म्हशीचेच दूध वापरावे.
  • चिकाच्या घट्टपणावर साध्या दुधाचे प्रमाण ठरवावे. (पहिला दिवस-५०० मिली चिक-५०० मिली साधे दूध, दुसरा दिवस ५०० मिली चीक-२५० मिली साधे दूध, तिसरा दिवस ५०० मिली चीक- १२५ मिली साधे दूध)
  • शक्यतो गुळाचाच वापर करावा. खरवसाची चव अप्रतिम लागते.
  • खरवस हा उष्ण असल्याने शक्यतो थंडीत खाणे उत्तम. परंतु उष्ण असल्यामुळे गरोदर महिलांनी खाणे टाळावे.
  • वेलची किंवा सुंठ पूड वापरल्याने चव छान लागते. हा खरवस फ्रिजमध्ये ठेवल्यास आठ दिवस सुद्धा टिकतो.
  • दूधाचे प्रमाण जास्त झाल्यास वड्या विस्कळीत होतात. आणि कमी झाले तर रबरा सारख्या चिवट होतात. म्हणून साधे दूध वापरताना चिकाचा घट्टपणा लक्षात घ्यावा.

खरवस खाण्याचे आरोग्यदायी फायदे :-

  1. खरवसामध्ये लोह भरपूर प्रमाणात असते. ते हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते.
  2. कॅल्शियम, मॅग्नेशियम, विटामिन आणि डी असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
  3. खरवसामध्ये प्रोटीन अधिक प्रमाणात असतात. म्हणून मुलांचा शारीरिक विकास होण्यासाठी खरवस हा पौष्टिक आहार आहे.
  4. खरवसामध्ये कॅरोटीन नेहमीच्या दुधापेक्षा जास्त असल्यामुळे विटामिन ए भरपूर असते.
  5. खरवस हा उष्ण असल्यामुळे थंडीमध्ये खाणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते. परंतु गरोदर महिलांनी तो न खाणे चांगले.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ) 

१) खरवस म्हणजे काय ?

- खरवस म्हणजे गाय किंवा म्हैस यांच्या घट्ट दुधापासून बनवलेला पारंपारिक गोड पदार्थ.

२) खरवस हिवाळ्यात का खातात ?

- गूळ वापरुन बनवलेला खरवस उष्ण आणि प्रोटीनयुक्त असल्यामुळे हिवाळ्यातील  थंडीमध्ये खाणे आरोग्याला फायदेशीर ठरते.

३) खरवस किती दिवस टिकतो ?

- खरवस फ्रिजमध्ये ठेवल्यास ७/८ दिवस सहज टिकतो.पण तो शक्यतो जितका ताजा तेवढा अधिक स्वादिष्ट लागतो.
 
    अशाप्रकारे प्रोटीन युक्त असा खरवस घरच्या घरी नक्की करून पहा आणि ही रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करा.
धन्यवाद 🙏

श्री स्वामी समर्थ 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या