मेथी मटर मलाई | Methi Matar Malai Recipe in Marathi
Aajcha bet recipes च्या या लेखामध्ये ढाब्यावर मिळते तशी मेथी मटर मलाई घरी कशी करायची याची रेसीपी दिली आहे. रोज रोज त्याच त्याच चवीच्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर वेगळ्या चवीची पंजाबी डिश ट्राय करू शकता... ती म्हणजे मेथी मटर मलाई!! हिरवीगार मेथी, गोडसर चवीचा मटार आणि फ्रेश क्रीम किंवा दुधाची साय या सर्व पदार्थांचे उत्कृष्ट कॉम्बिनेशन म्हणजे ही पंजाबी स्टाईल भाजी होय.
हिवाळ्याच्या दिवसात बाजारात उपलब्ध असलेल्या हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या यांचा आहारात समावेश केल्यास आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते. कडाक्याची थंडी असते, भूकही नेहमीपेक्षा जरा जास्तच लागते. म्हणूनच या दिवसात काहीतरी खमंग, चटपटीत आणि हेल्दी सुद्धा खाण्याकडे खवय्यांचा ओढा असतो. म्हणूनच नेहमीच्या चवीची डाळ घालून केलेली मेथी किंवा वाटाणा बटाट्याची भाजी खायची इच्छा नसेल तर ही वेगळ्या चवीची पंजाबी स्टाईल भाजी Methi Matar Malai Recipe कशी करायची याची सोपी कृती मी आपल्यासाठी देत आहे. आजकाल लग्नाच्या पंक्तीत किंवा ढाब्यामध्ये मिळणारी ही भाजी अगदी कमी साहित्यात घरच्या घरी सुद्धा करता येते. यासाठी संपूर्ण लेख वाचा व शेवटी या पौष्टिक अशा भाज्या आहारात घेतल्यामुळे शरीराला होणारे फायदे कोणते? याची सुद्धा थोडक्यात माहिती दिली आहे.
मेथी मटार मलाई साठी लागणारे साहित्य :-
१ मेथीची जुडी निवडून,स्वच्छ धुऊन व बारीक चिरून
१ वाटी ताजा हिरवा मटार
१/२ वाटी दुधाची साय/ विकतची फ्रेश क्रीम
१ मोठा कांदा उभा चिरून
१ मोठा टोमॅटो
बारीक चिरलेली कोथिंबीर
आले लसूण
५/६ काजू
१ चमचा हळद, मीठ चवीनुसार
१ चमचा मिरची पावडर
१ चमचा धने जिरे पावडर
१ चमचा गरम मसाला/ किचन किंग मसाला
१ तमालपत्र, दालचिनीचा तुकडा
तेल व तूप
मेथी मटर मलाई तयार करण्याची कृती :-
- बाजारातून कोवळ्या पानांची मेथीची भाजी आणावी. निवडून, स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्यावी.
- ताजा मटार घेऊन किंचित मीठ घालून गरम पाण्यात पाच मिनिटे तरी उकळून घ्यावा.
- एका लोखंडी कढईत तूप घालून त्यावर चिरून घेतलेली मेथी चांगली परतून घ्यावी. थोडेसे मीठ घालावे. म्हणजे तिचा कच्चेपणा कमी होतो व मेथी कडसर लागत नाही. मेथीचे संपूर्ण पाणी आटू द्यावे. शिजवताना झाकण ठेवू नये. ही मेथी ताटात काढून घ्या.
- त्याच कढईत तेल घालून उभा चिरलेला कांदा घालून तांबूस रंगावर परतून घ्यावा. त्यामध्ये आल्याचे काप, लसूण पाकळ्या व काजूचे तुकडे घालून मिनिटभर परतून घ्यावे. या मिश्रणात उभा चिरलेला टोमॅटो घालून व्यवस्थित परतून घ्यावे. थोडे पाणी घालून सर्व मिश्रण ५ मिनिटे तरी शिजवून घ्यावे.
- तयार मिश्रण थंड करून मिक्सरमध्ये स्मूथ अशी पेस्ट करून घ्यावी.
- भाजी तयार करण्यासाठी कढईत तेल घालून त्यामध्ये तमालपत्र, दालचिनीचा तुकडा घालावा. त्यावर वाटलेली पेस्ट घालून मिनिटभर परतावे. हळद, मिरची पावडर, धने-जिरे पावडर घालून मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यावा. मसाला जळू नये म्हणून दोन-तीन चमचे पाणी घाला. वाटण छान शिजले की, तेल सुटू लागते.
- या मिश्रणात वाफवलेला वाटाणा, परतलेली मेथी घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यावे. गरजेनुसार गरम पाणी घालून मिश्रणाला छान उकळी आणावी. इथे तुम्ही मटार उकळलेले पाणी सुद्धा घालू शकता. गॅसची आच मंद करून फेटलेली दुधाची साय किंवा विकतची फ्रेश क्रीम घालून मिश्रण ढवळून घ्या. वरून गरम मसाला पावडर किंवा किचन किंग मसाला घालून मिनिटभर भाजी उकळून घ्यावी. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करावा. तयार मेथी मटर मलाई भाजी गरमागरम चपाती किंवा पराठ्यासोबत खायला घ्यावी.
काही सुगरण टिप्स :-
- मेथीची भाजी कोवळी असावी. शक्यतो निवडताना भाजीचे देठ फार घेऊ नयेत.
- ताजा मटार वापरत असाल तर पाण्यात उकळून घ्यावा. फ्रोजन मटार असेल तर भाजी करतेवेळी तसाच वापरला तरी चालेल.
- गोडसर चव नको असेल तर काजू ऐवजी खसखस किंवा तीळ सुद्धा वाटणात वापरू शकता. काजू,साय वापरल्यामुळे क्रीमी टेक्चर भाजीला येते.
- ही भाजी चवीला जरा गोडसर असते. म्हणून आवडीनुसार गरम मसाला किंवा लाल तिखट वापरू शकता.
- मेथीची भाजी तुपात परतल्यामुळे तिची चव अप्रतिम लागते. तसेच मेथीचा कडवटपणा कमी होतो.
हे हि वाचा : Kadhai Paneer
नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ) :-
1) मेथी जास्त कडू असेल तर काय करावे ?
- मीठ लावून पिळून काढल्याने कडूपणा कमी होतो.
2) क्रीम नसेल तर काय वापरू शकतो ?
- साय किंवा थोडे दही वापरू शकता.
मेथी मटार मलाई भाजी खाण्याचे आरोग्यदायी फायदे :-
- सीजनल भाज्यांचा वापर असल्यामुळे ही एक उत्तम हेल्दी आणि चविष्ट भाजी ठरू शकते. काही जणांना मेथीची भाजी खाणे आवडत नाही. परंतु मेथी खाणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असते.
- मेथीची भाजी आहारात घेतल्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांना मेथी खाणे फायदेशीर ठरते. त्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून पोट साफ राहते.
- डायबेटिक रुग्णांसाठी मेथी व मटार खाणे उपयुक्त ठरते. कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.
- त्वचेच्या समस्या दूर होतात.
- मेथीच्या भाजीत कांदा परतून खाल्ल्याने ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. गॅलॉक्टोमेनिन या घटकामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
- या भाज्यांमध्ये फायबर्स, मिनरल्स, विटामिन, आयर्न भरपूर प्रमाणात असते.
- अँटिऑक्सिडंट आणि विटामिन के असल्याने कॅन्सरच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करते. भाजीच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
- रोज मुठभर वाटाण्याचा वापर आहारात असेल तर भूक लागत नाही. व त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
अशाप्रकारे थंडीमध्ये खाण्यासाठी भन्नाट चवीची अशी पंजाबी डिश जेवणात केली तर चार घास जरा जास्तच जेवण जाईल.आणि घरातील सर्व मंडळी खुश नक्की होतील.कमी वेळात हॉटेल सारखी भाजी हवी असेल तर ही रेसिपी नक्की करून पहा.आणि कमेंट करून मला नक्की सांगा. आवडल्यास आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या आजचा बेत या रेसिपी ब्लॉगला फॉलो करा. 👍🏻🙏 त्यासाठी शेवटी फॉलो या ऑप्शनवर क्लिक करा.
धन्यवाद 🙏
श्री स्वामी समर्थ

0 टिप्पण्या