मेतकूट / Metkut recipe

मेतकूट रेसिपी Metkut  recipe 

   Aajcha bet recipes च्या या लेखामध्ये पारंपरिक पद्धतीने मेतकूट कसे बनवायचे याची रेसीपी दिली आहे.  गरमागरम मऊ, गुरगुट्या (जास्त पाणी घालून केलेला) इंद्रायणी किंवा आंबेमोहोर तांदळाचा भात, वरून साजूक तुपाची धार आणि त्यावर मेतकूट... असा पारंपरिक पद्धतीचा बेत ऐकून प्रत्येकाला लहानपणी खाल्लेला, काऊ चिऊच्या गोष्टी सांगत आजीने प्रेमाने भरवलेला मेतकूट भात आठवला ना!! कोणा कोणाला आपल्या आजीची आठवण झाली? मला नक्की सांगा 👍🏻... मेतकूट म्हणजे तांदूळ, डाळी, व विशिष्ट प्रकारचे खडे मसाले खमंग असे भाजून पारंपारिक पद्धतीने तयार केली जाणारी कोरडी चटणी... अर्थात एक तोंडी लावण्याचा प्रकार. 

    मराठी भाषेत अनेक शब्दांचे दोन अर्थ आहेत. मेतकूट जमणे म्हणजे अतिशय घट्ट अशी मैत्री असणे. हे तुम्हाला माहीतच असेल. गंमत म्हणजे खायचे मेतकूट आणि मैत्री संदर्भात वापरले जाणारे मेतकूट याचा एकमेकांशी काहीही संबंध नाही बरं का!! 😂😂

    हा एक साठवणीच्या पदार्थांचा प्रकार आहे. पूर्वीच्या काळी न्याहारीला एकदा गरमागरम मेतकूट भात खाल्ला, म्हणजे दुपारपर्यंत पोट भरलेले राहायचे. तसेच काही मुलांना वरण भात खायला आवडत नसेल तर हा एक पौष्टिक असा ऑप्शन आहे. घरात कोणी आजारी असेल आणि त्याच्या तोंडाला चव नसेल तर पातळ मुगाच्या खिचडी सोबत सुद्धा मेतकूट छान लागते.लहान बाळाच्या पेजे मध्ये सुद्धा चिमूटभर मेतकूट पावडर घालू शकतो.घरी जर जेवणात एखादी नावडती भाजी असेल तेव्हा चपातीला थोडे तेल किंवा तूप लावून त्यावर एक-दोन चमचे मेतकूट पावडर, बारीक चिरलेला कांदा,कोथिंबीर, मिरची पावडर घालून फ्रँकी सुद्धा बनवू शकतो. विस्मरणात जाऊ पाहणारे असे हे मेतकूट हल्ली विकत सुद्धा मिळते.परंतु घरीच जर बनवले तर त्याची चव आजीची आठवण नक्की करून देईल. पारंपारिक आणि पौष्टिक असे अगदी लहान बाळापासून वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच आवडणारे Metkut  recipe सोपी कृती या लेखामध्ये दिली आहे.


Metkut-recipe
मेतकूट / Metkut recipe 

मेतकूट बनवण्यासाठी लागणारे साहित्य :-

१ वाटी हरभरा डाळ/ पंढरपुरी डाळं
अर्धी वाटी उडीद डाळ
पाव वाटी मुग डाळ
पाव वाटी तांदूळ
पाव वाटी गहू
१/२ चमचा हळद
१/२ चमचा मिरची पावडर
१/२ चमचा सुंठ पावडर
१/२ चमचा मोहरी
१ चमचा जिरे
२ चमचा धणे
५/६ लवंग
५/६ काळी मिरी
१ चमचा मेथी
२/३ हिरवी वेलची 
१ छोटा चमचा खडा हिंग पावडर
मीठ

मेतकूट बनवण्याची कृती :-
  1. सर्वप्रथम डाळी व तांदूळ ओल्या कपड्याने पुसून घ्याव्यात.
  2. सर्वप्रथम लोखंडी कढईत मंद आचेवर चणा डाळ हलकेसे खरपूस अशी भाजून घ्यावी. भाजून झाल्यावर परातीत थंड करायला ठेवा.त्यानंतर लागोपाठ उडीद डाळ, मुगडाळ, आणि तांदूळ मंद आचेवर सतत परतत थोडा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यावेत.गहू सुद्धा थोडे फुले पर्यंत भाजून घ्यावेत.
  3. या सर्व गरम जिन्नसांवर हळद, सुंठ पावडर, हिंग पावडर,मिरची पावडर घालून घ्यावे.
  4. गरम कढईतच एखाद मिनिटांसाठी धणे,जिरे, मोहरी,मेथी,लवंग,काळी मिरी,वेलची हलकेसे परतून गरम करून घ्यावे.जास्त भाजू नये.सर्व मसाले डाळींच्या मिश्रणावर घालावे.चमचाभर मीठ घालावे.मिश्रण संपूर्ण थंड करून घ्यावे.
  5. आता मिक्सरच्या चटणीच्या भांड्यात मिश्रणाची बारीक पावडर करून घ्यावी. व पिठाच्या चाळणीने चाळून घ्यावे.चाळून राहिलेली भरड पुन्हा एकदा मिक्सरला वाटून घ्यावी.
  6. धुवून स्वच्छ कोरड्या केलेल्या काचेच्या बरणीत मेतकूट पावडर भरून ठेवावी.त्यावर एखादा हिंगाचा खडा ठेवावा. म्हणजे मेतकूट जास्त दिवस टिकते.त्याला जाळी लागत नाही.
हे ही वाचा .... जवसाची चटणी 

काही सुगरण टिप्स :-
  • सर्व धान्य व डाळी वेगवेगळे मंद आचेवर खरपूस भाजून घ्या. भाजताना करपणार नाही याची काळजी घ्यावी.
  • एखाद दुसरी डाळ नसेल तरी चवीत काही फरक पडत नाही. प्रमाण आपल्या आवडीनुसार सुद्धा घेऊ शकता.
  • सुंठ पावडर व हिंग वापरल्याने खमंग असे मेतकूट तयार होते.
  • हरभऱा डाळी ऐवजी पंढरपुरी डाळं सुद्धा वापरू शकता.
  • हवा बंद काचेच्या बरणीत ठेवल्यामुळे अगदी वर्षभर सुद्धा मेतकूट छान टिकते.

मेतकूट खाण्याचे काही आरोग्यदायी फायदे :-

  1. मेतकूट हा प्रोटीनचा उत्तम स्त्रोत आहे.लो- कॅलरी असा पदार्थ आहे.शाकाहारी व्यक्तींसाठी प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी उत्तम सुपर फूड आहे.
  2. यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट असल्यामुळे शरीरावरील सूज कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.ग्लुटेन फ्री असल्याने डाएट करणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय आहे.
  3. मॅग्नेशियम आणि लोहाचे प्रमाण जास्त असते.
  4. सर्व जिन्नस भाजल्यामुळे पचायला हलके असते. त्यामुळे पचनाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी आहारात याचा समावेश अवश्य करावा.
  5. आजारी व्यक्तींची गेलेली तोंडाची चव पुन्हा येण्यासाठी भातासोबत किंवा पेजेसोबत देऊ शकता.

    मेतकूट गुरगुट्या भातासोबतच खिचडी भात, पोहे, उपमा, सँडविच, भडंग सोबत सुद्धा छान लागते. मेतकूटामध्ये दही, कांदा, कोथिंबीर घालून पोळी किंवा भाकरी सोबत सुद्धा खाऊ शकता. लहान मुलांना डब्यात देण्यासाठी पोळीला तेल किंवा तूप लावून त्यावर मेतकूट, तिखट घालून फ्रॅंकी सुद्धा बनवू शकता.थोडक्यात काय तर कोणत्याही पदार्थाबरोबर मेतकूटाचे अगदी छानच  मेतकूट जमते...😂😂

    चला तर मग तुमचं ज्यांच्याशी मेतकूट जमतं अशा आपल्या मैत्रिणींसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा. आणि हो! न विसरता पारंपारिक पद्धतीने केलेला गरमागरम तूप,मेतकूट भात नक्की खा.थंडीत मस्त लागतो.अशाच नवीन पारंपारिक रेसिपी पाहण्यासाठी माझ्या आजचा बेत या रेसिपी ब्लॉगला फॉलो करण्यासाठी रेसिपीच्या शेवटी दिलेल्या फॉलो या ऑप्शनवर क्लिक करा.
धन्यवाद 🙏

श्री स्वामी समर्थ 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या