Patodi rassa recipe / पातोडी रस्सा

  Patodi rassa recipe / पातोडी रस्सा 

   Aajcha bet recipes "ओळख विदर्भातील पदार्थांची" या लेखमालेत आज आपण विदर्भातील पारंपारिक पद्धतीने तयार होणारी पातोडी रस्सा भाजी कशी बनवायची याची सोपी रेसीपी  पाहणार आहोत.

    ही भाजी आपल्याकडे काही भागात पाटवडी रस्सा म्हणून सुद्धा ओळखली जाते.बेसनपीठा- पासून वड्या करून उकळत्या रश्श्यामध्ये त्या सोडल्या जातात.विदर्भामध्ये बेसनाला 'चुन' म्हटले जाते. म्हणून ही भाजी चुनवड्याची भाजी म्हणून सुद्धा ओळखली जाते.घरात भाजीपाला शिल्लक नसेल तेव्हा आयत्यावेळी भाजी करण्यासाठी उत्तम पर्याय म्हणून सुद्धा पातोडी रस्सा बनवू शकतो. पारंपारिक आणि चविष्ट अशी ही भाजी केली तर जेवण जरा जास्तच जाईल.घरगुती उपलब्ध साहित्यामध्ये ही चमचमीत भाजी बनवू शकतो.शाकाहारी खवय्यांसाठी ही भाजी म्हणजे सर्वोत्तम पर्याय आहे.ही भाजी महाराष्ट्रातील बऱ्याच ग्रामीण भागात बनवतात.फक्त करण्याची पद्धत थोडीफार वेगळी असते.चला तर मग वऱ्हाडी पद्धतीने पातोडी रस्सा Patodi rassa recipe या लेखामध्ये पाहूया.



Patodi-rassa-recipe
Patodi rassa recipe 

पातोडी रस्सा भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य :-

१/२ वाटी बेसन पीठ
१ मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून
सुक्या खोबऱ्याचे काप
७/८ लसूण पाकळ्या
१ चमचा खसखस
१ चमचा मोहरी
१ चमचा जिरे
पाव चमचा हिंग
१/२ चमचा हळद
१ चमचा लवंगी मिरची पावडर
१ चमचा बेडगी मिरची पावडर
१ चमचा धने पूड
१ चमचा काळा मसाला
बारीक चिरलेली कोथिंबीर
लसुण व मिरचीचे वाटण
गरम पाणी
मीठ व तेल

ही रेसीपी सुद्धा नक्की करून पहा :-   Kaccha Chivda / कच्चा चिवडा

पातोडी रस्सा भाजी बनवण्याची कृती :-
  1. सर्वप्रथम बेसनाच्या वड्या बनवून घेऊ. त्यासाठी परातीत अर्धी वाटी बेसन घ्यावे.त्यात एक चमचा तेल, हळद,मिरची पावडर,थोडे मीठ आणि लसूण मिरचीचे वाटण घालून पीठ व्यवस्थित कालवून घ्या.थोडे थोडे पाणी घालून घट्टसर गोळा मळून घ्या.तेलाचा हात लावून गोळा मऊ करून घ्या.दहा मिनिटांसाठी झाकून ठेवा.दहा मिनिटानंतर हा गोळा पुन्हा एकदा छान मळून घ्या.पोळपाटावर तेलाचा हात लावून हा गोळा पोळीप्रमाणे लाटून घ्या.पोळीचा आकार जास्त पातळ नाही किंवा जास्त जाड सुद्धा नसावा.सुरीने हव्या त्या आकारात किंवा शंकरपाळीसारख्या आकारात वड्या कापून घ्या.
  2. पातोडीचा रस्सा करण्यासाठी वाटण तयार करून घेऊ.त्यासाठी कढईत थोडे तेल घालून चिरलेला कांदा लालसर रंगावर परतून घ्या. त्यातच लसणाच्या पाकळ्या घालून परतून घ्या. कांदा ताटात काढून त्याच कढईत खोबऱ्याचे काप तांबूस होईपर्यंत भाजून घ्यावे.खसखस सुद्धा हलकीशी भाजून घ्या.भाजलेले सर्व जिन्नस थंड करून मिक्सरच्या भांड्यात थोडे पाणी घालून बारीक वाटून घ्या.तयार आहे रस्सा करण्यासाठी वाटण. 
  3. आता भाजीला फोडणी करून घेऊ. एका पातेल्यात तेल घालून तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी, जिरे, हिंग व थोडी कोथिंबीर घालून फोडणी करून घ्या.त्यात तयार वाटण घालून तेल सुटे पर्यंत मिश्रण चांगले परतून घ्या.
  4. आता सर्व सुके मसाले घालूया.हळद,मिरची पावडर, धने पूड, बेडगी मिरची पावडर,काळा मसाला घालून मिनिटभर परतून घ्यावे.काळा मसाला घातल्याने भाजीची चव छान लागते. आता गरम पाणी घालावे.वड्या शिजण्यासाठी म्हणून थोडे जास्तच पाणी घाला.गरम पाण्याने भाजीला रंग छान येतो.चवीनुसार मीठ घालावे.
  5. रस्सा उकळल्यानंतर त्यात करून घेतलेल्या वड्या अलगद सोडाव्या.मिश्रण चांगले उकळले की,भाजी दहा मिनिटे तरी झाकण ठेवून शिजवून घ्यावी. वड्या शिजल्या की वर तरंगू लागतात. म्हणजे भाजी शिजली असे समजावे. शिजल्यानंतर गॅस बंद करा.बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम पातोडी रस्सा भाकरी किंवा पोळी सोबत खाण्यासाठी  वाढा. 

काही सुगरण टिप्स :-

  • वडीसाठी पीठ भिजवताना घट्टसर भिजवावे.
  • बेसनाच्या वड्या रश्शात सोडण्यापूर्वी रस्सा चांगला उकळून घ्या.वड्या चांगल्या शिजवून घ्या. म्हणजे भाजीची चव छान लागते.


    अशी झणझणीत वऱ्हाडी स्टाईल पातोडी रस्सा भाजी नक्की ट्राय करा आणि आवडली तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. 🙏 

अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या आजचा बेत या रेसिपी ब्लॉगला नक्की फॉलो करा.यासाठी रेसिपीच्या शेवटी दिलेल्या Follow या ऑप्शन वर क्लिक करा. 👍🏻

धन्यवाद 🙏🙏

श्री स्वामी समर्थ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या