Aloo bonda recipe | आलू बोंडा

 Aloo bonda recipe | आलू बोंडा 

   Aajcha bet recipes च्या "ओळख विदर्भातील पदार्थांची" या लेखमालेत आज आपण विदर्भातील गावात असणाऱ्या बाजारामध्ये मिळणारा आलू बोंडा घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसा करायचा याची कृती पाहणार आहोत.
    आलु बोंडा म्हणजे बटाटे वडा.. विदर्भामध्ये हा वडा चण्याचा तर्रीदार रस्सा व फोडणीच्या ताकासोबत खाल्ला जातो.चवीला अप्रतिम असणारा हा प्रकार विदर्भामध्ये प्रसिद्ध आहे.या वड्यामध्ये भरपूर मसाल्यांचा वापर केल्यामुळे आलूबोंडा व बटाटे वडा यात चवीत थोडा फरक आहे.बटाटेवडा खायला आवडत नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही.पण नेहमीच हा वडा चटणी किंवा पावा सोबत खाल्ला जातो. विदर्भातील आलू बोंडा हा रस्सा व ताका सोबत खाल्ला जातो.नवीन काहीतरी ट्राय करायचं असेल तर ही रेसिपी नक्की करून पहा.चला तर मग आजच्या या लेखामध्ये विदर्भातील प्रसिद्ध असा आलू बोंडा Aloo bonda recipe घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसा करायचा याची सोपी कृती पाहूया.

Aloo-bonda-recipe
 Aloo bonda recipe 

आलू बोंडा करण्यासाठी लागणारे साहित्य :-

७/८ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे 
१ चमचा मोहरी
१/२ चमचा जिरे
१ चमचा आले-लसूण पेस्ट
१/२ चमचा बडीशेप
१/२ भरडून घेतलेले धने
पाव चमचा ओवा
१/२ चमचा कसुरी मेथी
१ चमचा हिरवीमिरची पेस्ट
कढीपत्ता व कोथिंबीर
१ कांदा बारीक चिरून
१ चमचा धने पूड
१/२ गरम मसाला
१ चमचा मिरची पावडर
१/२ चमचाआमचूर पावडर/ चाट मसाला
१/२ चमचा काळा मसाला
१/२ चमचा हळद
हिरव्या मिरच्या (तळण्यासाठी)
३ चमचे बेसन पीठ
मीठ व तेल

आलू बोंड्याच्या आवरणासाठी साहित्य:-

२ वाटी बेसन पीठ
२ चमचे तांदळाचे पीठ
१ चमचा ओवा
मीठ व पाणी

फोडणीचे ताक करण्याची कृती :-

 १ चमचा तेल फोडणी साठी घेऊन त्यात मोहरी, जिरे, बारीक चिरलेली हिरवी मिरची,कढीपत्ता,आले लसूण पेस्ट, हळद, जिरेपूड,धने पूड घालून फोडणी तयार करा.गॅस बंद करून त्यात ताक घाला.मीठ व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून फोडणीचे ताक तयार करून घ्या.

आलू बोंडा बनवण्याची कृती :-

  1. आलू बोंड्यासाठी सारण तयार करण्यासाठी एका पॅनमध्ये तेल घाला.तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी,जिरे,आले लसूण पेस्ट,बडीशेप, कुटलेले धने,ओवा,कसुरी मेथी घालून परतून घ्या.
  2. त्यात हिरव्या मिरचीची पेस्ट, कढीपत्ता आणि चिरलेला कांदा घालून तांबूस होईपर्यंत परता.
  3. धने पूड,गरम मसाला,आमचूर पावडर/चाट मसाला,काळा मसाला,हळद,मिरची पावडर घालून चांगले परतून घ्यावे.
  4. आता या मिश्रणात तीन चमचे बेसन पीठ घालून परता.आलू बोंड्याचे सारण करताना बेसन पिठाचा वापर केला जातो.व बटाटे वड्याचे  सारण करताना बेसन पीठ वापरत नाही.हा फरक आहे.हे सारण तीन-चार मिनिटांसाठी परतून घ्या.
  5. या मिश्रणात उकडून थंड केलेले बटाटे कुस्करून घाला.बटाटे वडा, आलू बोंडा किंवा समोसे  करताना सारणासाठी वापरायचे बटाटे नेहमी अगोदर उकडून थंड केलेले असावेत. त्यामुळे सारण चिवट होत नाही.मीठ घालून पाच मिनिटे परतून घ्या.वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सारण थंड करून घ्या.
  6. आता आपण आलू बोंड्याच्या आवरणासाठी पीठ भिजवून घेऊ.त्यासाठी बेसन पीठात तांदळाचे पीठ, मीठ,ओवा व किंचित बेकिंग सोडा घालून थोडे थोडे पाणी घालून भज्याच्या पिठा- प्रमाणे घट्टसर पीठ भिजवून घ्या.आलू बोंड्याचे वरचे आवरण जाड असते व बटाटा वड्याचे आवरण पातळ असते. म्हणून पीठ फार पातळ करू नये.दाटसरच ठेवावे.
  7. थंड झालेल्या सारणाचे मध्यम आकाराचे गोल किंवा चपटे वडे करून घ्या. कढईत तेल गरम करायला ठेवा. तेल चांगले तापले की,आलू बोंडे पिठात बुडवून हाताने किंवा चमच्याच्या सहाय्याने तेलात अलगद सोडा.मध्यम आचेवर वडे चांगले तांबूस रंगावर तळून घ्यावेत.सर्व वडे तळून झाल्यावर खाण्यासाठी हिरव्या मिरच्या मधे कट मारून तळून घ्या.
  8. आलू बोंडा खाण्यासाठी देताना वडा हाताने फोडून घ्यावा.त्यात चण्याचा रस्सा व एक दोन चमचे फोडणीचे ताक घालून तळलेल्या मिरची सोबत खाण्यासाठी वाढा.चण्याचा रस्सा बनवण्याची कृती आधीच्या लेखामध्ये दिलेली आहे

हे ही वाचा : chana recipe

    अशाप्रकारे स्वादिष्ट असा आलू बोंडा नाष्टा किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी परफेक्ट अशी डिश आहे. विदर्भातील खासियत असलेला हा पदार्थ बनवून खायला घातला तर घरातील सर्वच मंडळी खुश नक्की होतील.रेसिपी आवडली तर नक्कीच बनवून पहा.आणि आपल्या मैत्रिणीं सोबत शेअर करा.अशाच विदर्भातील आणखी पारंपारिक रेसिपी पाहण्यासाठी माझ्या आजचा बेत या रेसिपी ब्लॉगला नक्की फॉलो करा. त्यासाठी शेवटी दिलेल्या Follow या ऑप्शन वर क्लिक करा. 👍🏻🙏

धन्यवाद 🙏

श्री स्वामी समर्थ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या