डब्यासाठी टेस्टी व चमचमीत गवारची भाजी / Gavarchi bhaji recipe

  डब्यासाठी  टेस्टी व चमचमीत गवारची भाजी / Gavarchi bhaji recipe

    आजचा बेत रेसिपीस च्या आजच्या लेखामध्ये महाराष्ट्रीयन पद्धतीची चमचमीत अशी गवारची भाजी / Gavarchi bhaji recipe मोजक्या साहित्यात कशी बनवायची ते पाहूया.

    बाराही महिने बाजारात उपलब्ध असणारी शेंगवर्गीय भाजी म्हणजे गवार. अनेकांना गवारीची भाजी खूप आवडते. परंतु बरेच जण त्याच्या उग्र वासामुळे खायला नाक मुरडतात. परंतु डब्यासाठी अगदी झटपट होणारी ही भाजी असते. म्हणून सकाळच्या घाईगडबडीत ही भाजी करणे मला तरी खूप आवडतं. कधी सुकी तर कधी रस्सा भाजी अशा दोन्हीही प्रकारे बनवली तरी छानच होते. महाराष्ट्रात विविध भागात वेगवेगळ्या प्रकारे भाजी करण्याची पद्धत आहे. ग्रामीण भागात गावरान गवार उपलब्ध होते. जी चवीला खूप छान लागते. परंतु शहरात आकाराने थोडी लांबट अशी गवार मिळते. परंतु घेताना कोवळी अशी गवार घेतली, आणि भाजी करताना जरा पद्धत बदलली तरी ती सुद्धा भाजी अतिशय चविष्ट होते. प्रत्येकाची भाजी करण्याची पद्धत थोडी वेगळी असते. मी ज्या पद्धतीने भाजी करते. त्या पद्धतीने करून पहा. नक्कीच तुम्हाला आवडेल. चला तर मग चविष्ट गवारची भाजी /Gavarchi bhaji recipe वेगळ्या पद्धतीने कशी करायची ते पाहूया.


Gavarchi-bhaji-recipe
 डब्यासाठी  टेस्टी व चमचमीत गवारची भाजी / Gavarchi bhaji recipe

गवारची भाजी करण्यासाठी लागणारे साहित्य :-

२५० ग्रॅम गवार

२ चमचे सुकं खोबरं

२ हिरव्या मिरच्या

७/८ लसूण पाकळ्या

१/२ चमचा जिरे

कोथिंबीर, कढीपत्ता

१ मध्यम आकाराचा कांदा 

१ टोमॅटो

१ चमचा धने जिरे पूड, हिंग

१/२ चमचा हळद

१ चमचा मिरची पावडर

२ चमचे शेंगदाणा कूट 

मीठ आणि तेल

गरजेनुसार गरम पाणी

ही रेसिपी सुदधा नक्की करून पहा :- मासवडी रस्सा / Masvadi recipe

गवार भाजी कशी करायची?

  1.  गावरान गवार जी काटेरी असते किंवा रेगुलर मिळणारी साधी कोवळी अशी गवार बाजारातून विकत आणावी. स्वच्छ धुऊन देठ व टोकाचा भाग मोडून छोटे छोटे तुकडे करून घ्यावे. साधी कोवळी गवार असेल तर त्याला शिरा नसतात. परंतु गावरान किंवा जून गवारीला शिरा असतात. त्या व्यवस्थित काढून घ्याव्यात. नाहीतर खाताना दाताखाली येतात.४ लोकांसाठी रस्सा भाजी बनवायची असेल तर पाव किलो गवार पुरेशी होते. (थोडा वेळ मिठाच्या पाण्यात ठेवावी. म्हणजे वर फवारलेली केमिकल्स निघून जातात.)
  2.  भाजीसाठी हिरवं वाटण करून घेऊ. त्यासाठी लसूण,मिरची, सुकं खोबरं, जिरे, कोथिंबीर पाणी न घालता मिक्सरच्या भांड्यात किंवा खलबत्यात जाडसर वाटून घ्यावे.
  3. एका जाड बुडाच्या कढईत थोडं तेल घालून गवार घालून परतून घ्यावी. त्यात थोडे मीठ घालावे. म्हणजे भाजी खाताना पाणचट किंवा तुरट लागत नाही. मध्यम आचेवर थोडा रंग बदलेपर्यंत खमंग अशी गवार भाजून घ्या. एका ताटात काढून घ्या.
  4. कढईत पुन्हा तेल घालून गरम तेलात कांदा, कढीपत्ता घालून गुलाबी रंगावर कांदा परतून घ्या. नंतर त्यात वाटण घालून कच्चेपणा जाईपर्यंत छान परतून घ्या.
  5.  हळद,हिंग, धने जिरे पूड, मिरची पावडर, घरगुती कोणताही मसाला किंवा गोडा मसाला घालून छान परतून घ्या.कोरड वाटत असेल तर थोडं पाणी घालून मसाले तेल सुटेपर्यंत छान परतून घ्या.
  6.  बारीक चिरलेला टोमॅटो घाला. पुन्हा एकदा ढवळून थोडा वेळ झाकून एक वाफ काढा. म्हणजे सर्व मसाले छान शिजले जातील. नंतर परतून घेतलेली गवार घाला.मसाल्यांमध्ये गवार पुन्हा एकदा छान परतून घ्या. इथं यासोबत बटाटा वापरला तरी चालेल. काहींना गवार बटाटा भाजी आवडते.
  7. गरजेनुसार गरम पाणी घालून गवार शिजेपर्यंत भाजी शिजवून घ्या. सुकी भाजी बनवायची असेल तर  शिजण्याइतपत गरम पाणी घाला. म्हणजे डब्यासाठी लपथपीत अशी भाजी तयार होईल. भाजी शिजल्यानंतर आवडीनुसार शेंगदाण्याचा कूट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करा. चमचमीत भाजी खाण्यासाठी तयार आहे,

गवार भाजी खाण्याचे फायदे ;-

  • गवारीच्या भाजीमध्ये फायबर असते. तसेच या भाजीमध्ये  अ, ब, क, के  ही जीवनसत्त्वं मोठ्या  प्रमाणात असतात.आयर्न,कॅल्शियम, व पोटॅशियम हे उपयुक्त घटक आढळतात,
  •  ही भाजी आपल्या शरीरातील  रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
  •  गवारीच्या भाजीमध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे हाडांची त्ताकत वाढते.
  •  गवारीच्या  भाजीमध्ये हायपोग्लायसेमिक व हायपोलिपीडेमिक हे गुणधर्म असतात.जे हृदयरोग्यांसाठी गुणकारी आहे.

    गवारीची तयार रस्सा भाजी  Gavarchi bhaji recipe ही गरमागरम भात, चपाती किंवा भाकरी सोबत छान लागते. दुपारच्या जेवणात, रात्रीच्या जेवणासाठी किंवा डब्यासाठी अशी चमचमीत भाजी बनवली तर नक्कीच सगळ्यांना आवडेल. रेसिपी आवडली तर नक्कीच बनवून पहा. आणि मैत्रिणींसोबत शेअर करा. तुम्ही ही भाजी कशा पद्धतीने करता हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा. अशाच साध्या सोप्या महाराष्ट्रीयन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या आजचा बेत रेसिपीज या ब्लॉगला फॉलो करा 🙏👍🏻 

धन्यवाद 🙏

श्री स्वामी समर्थ 🙏😊

















    











    





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या