दामट्याचे लाडू रेसिपी / Damtyache ladoo recipe in marathi

दामट्याचे लाडू  रेसिपी / Damtyache ladoo recipe in marathi

 'आजचा बेत रेसिपीज'  Aajcha bet recipes च्या आजच्या लेखामध्ये मोतीचूर लाडू नाही पण मोतीचूर लाडू पेक्षाही जास्त सोपे, कमी साहित्य वापरून होणारी चविष्ट अशी  पारंपारिक दामट्याचे लाडू रेसीपी Damtyache ladoo recipe in marathi  सोप्या पद्धतीने पाक बिघडू न देता कशी करायची  याची कृती  देत आहे.

   दामट्याचे लाडू म्हणजे बेसन पिठाच्या पुऱ्यांपासून बनवले जाणारे लाडू.प्रामुख्याने नगर भागात हे लाडू बनवले जातात.लहानपणापासून आईने केलेले दामट्याचे लाडू मला खूप आवडतात.म्हणूनच मी सुद्धा प्रत्येक वर्षी दिवाळीला हे लाडू बनवते. घरातील प्रत्येकाला खूप आवडतात. पाकाचे गणित उत्तम जमले तर चविष्ट असे लाडू बनतात. यासाठी शक्यतो  रवाळ असे डाळीचे पीठ दळून आणावे. किंवा रेडीमेड मध्ये मिळणारे हिरा बेसन आवर्जून विकत आणावे. पारंपारिक पद्धतीने बेसन पुरीचे लाडू म्हणजेच दामट्याचे लाडू रेसीपी /  Damtyache ladoo recipe in marathi पाहूया.

दामट्याचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

१ किलो बेसन पीठ /४ वाट्या पीठ (साधारण १ मोठी वाटी म्हणजे २५० ग्रॅम )
१ किलो साखर /४ वाट्या
२ वाट्या पाणी (साखर बुडेल इतपत)
वेलची जायफळ पूड
मनुके
खायचा पिवळा रंग (ऐच्छिक)
तूप किंवा तेल

ही रेसीपी सुद्धा नक्की करून पहा :  Rava besan ladoo recipe

दामट्याचे लाडू बनवण्याची कृती :-

  1. परातीत बेसन पीठ चाळून घ्या. त्यात चवीनुसार थोडे मीठ घाला. कारण कोणत्याही गोडाच्या पदार्थात मीठ घातल्यास तो चविष्ट बनतो. दोन चमचे साधं तेलाचे मोहन घालावं. यामुळे पुऱ्या चिकट किंवा वातड होणार नाहीत.
  2.  थोडं थोडं पाणी घालून बेसन पीठ घट्टसर मळून घ्यावे. बेसन पीठ चिकट असल्यामुळे मळायला त्रास होऊ शकतो. म्हणून हाताला व परातीला थोडे तेल लावून घ्यावे. म्हणजे पीठ चिकटणार नाही. तसेच बेसन पीठ हे रवाळ असेल तर पीठ मळणे सोपे होईल. दहा मिनिटांसाठी पीठ तसेच ठेवा. नंतर लगेचच पुऱ्या बनवायला घ्या.
  3.  तयार पिठाच्या पुऱ्या बनवण्यासाठी छोटे छोटे गोळे बनवून घ्या. या पुऱ्या एकीकडे लाटल्या आणि एकीकडे तळल्या तरी चालतात. पोळपाटाला तेलाचा हात लावून ना जास्त पातळ ना जास्त जाड अशा पुऱ्या लाटून घ्याव्यात. पुऱ्या जाड झाल्या तर, आतून तळल्या जाणार नाहीत. कच्च्या राहतील. आणि पातळ लाटल्या तर कडक होतील. आणि मिक्सरला दळल्या जाणार नाहीत. यासाठी मध्यम जाडीच्या पुऱ्या लाटून घ्या. पुऱ्या लाटताना पीठ न वापरता शक्यतो तेलाचा हात लावावा.
  4.  तेल किंवा तुपाचा वापर करून मध्यम आचेवर खमंग अशा पुऱ्या तळून घ्याव्यात. या पुऱ्या तेल शोषत नाहीत. हलक्या गुलाबी रंगावर पुऱ्या तळून घ्याव्यात. खुसखुशीत अशा पुऱ्या होतात.
  5.  पुऱ्या कोमट असताना शक्य होईल तेवढ्या बारीक चुरून घ्याव्यात. नंतर मिक्सरच्या मोठ्या भांड्यात रवाळ अशा दळून घ्या. जास्त बारीक करू नये. मोठ्या चाळणी चा वापर करून एकसारखे असे मिश्रण तयार करून घ्यावे. जाडसर भाग पुन्हा मिक्सरला फिरवून घ्या.
  6. पाक बनवण्यासाठी एका पातेल्यात साखर व पाणी घालून घ्या. पाकासाठी साखरेच्या निम्मे असं पाण्याचं प्रमाण असावं. म्हणजेच साखर बुडेल एवढे पाणी घालावे. मोठ्या आचेवर साखर विरघळून घ्या. नंतर मंद आचेवर पाक करून घ्या. एक तार तुटेपर्यंत होईल असा पाक करून घ्या.
  7.  दळलेले पुऱ्यांचे मिश्रण एका मोठ्या परातीत घेऊन. त्यावर लागेल तसा पाक घालून घ्या. व्यवस्थित ढवळून मिश्रण बाजूला ठेवा. कोमट झाल्यानंतर मिश्रणात वेलची पूड, मनुके आणि दोन-तीन चमचे साजूक तूप घालून व्यवस्थित ढवळून लाडू बनवून घ्या.
  8.  लाडूचे मिश्रण जास्त पातळ झाले असेल तर किंवा पाक कच्चा राहिला असल्यास काही तासांसाठी तसेच ठेवा. नंतर तरीसुद्धा जर मिश्रण पातळ वाटल्यास मिनीटभरासाठी पुन्हा गॅसवर ठेवून परतून घ्या. याउलट मिश्रण जास्त कोरडे किंवा पाक जास्त घट्ट झाले असल्यास मिश्रण मिक्सरला लावून पुन्हा फिरवून घ्या. असं केल्याने ओलावा निर्माण होतो. किंवा एखाद दोन चमचा कोमट दूध घालून सुद्धा लाडू वळू शकता. एकसारखे असे दाणेदार दामट्याचे लाडू तयार होतात. या मिश्रणाचे साधारण मध्यम आकाराचे 40 लाडू तयार होतात. अगदी बुंदी सारख्या चवीचे रसरशीत असे हे दामट्याचे लाडू घरातील सर्वांना खाऊ घाला. आणि कसे झाले ते मला कमेंट मध्ये नक्की कळवा.

    गावाकडे पूर्वी दामट्याचे लाडू बनवताना मिक्सरचा वापर न करता हातानेच गरमागरम पुऱ्या कुस्करून लाडू बनवले जायचे. परंतु आता मिक्सर मुळे हे सुद्धा सोपे झाले आहे. म्हणूनच कोणताही जास्तीचा पसारा न करता सोप्या पद्धतीने  चविष्ट असे लाडू बनवून पहा. रेसिपी आवडली तर नक्कीच आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा. अशाच पारंपारिक रेसिपी पाहण्यासाठी माझ्या आजचा बेत रेसिपीज या ब्लॉगला फॉलो करा. त्यासाठी शेवटी दिलेल्या Follow या ऑप्शन वर क्लिक करा.


धन्यवाद..

श्री स्वामी समर्थ 🙏 






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या