Hulgyache Shengole recipe in marathi /हुलग्याचे शेंगोळे रेसिपी

 

     Aajcha bet recipes च्या या लेखामध्ये जुना पारंपरिक पद्धतीने शेंगोळे shengole कसे करायचे याची रेसीपी देत आहे."ऑल टाइम फेवरेट" असा एखादा तरी पदार्थ प्रत्येकासाठी असतोच. तसाच एक पारंपारिक पदार्थ  म्हणजे हुलग्याचे शेंगोळे... जो अगदी लहानपणापासून मला खायला खूप आवडतो.

     हुलगा किंवा त्याला काहीजण कुळीथ असेही म्हणतात. जो एक कडधान्याचा प्रकार आहे. अतिशय पौष्टिक असे हे कडधान्य असून त्यापासून उसळ, पिठले,सूप म्हणजेच माडगं आणि शेंगोळे असे अनेक पारंपारिक पदार्थ प्रत्येक भागात आवडीने केले जातात. पूर्वी पावसाळा किंवा थंडीत सर्दी, खोकला अशा कारणाने कुणी आजारी असेल तर त्याला घरीच गरमागरम हुलग्याचं माडगं देऊन बरं केलं जायचं. त्यामुळे तोंडाला चव यायची. पचायला हलके असल्यामुळे रात्रीच्या जेवणात शेंगोळे हा उत्तम पर्याय आहे. सध्या याचा उल्लेख पारंपरिक आहारातील पौष्टिक कडधान्य म्हणून केला जातो.संतुलित आहारात याचा समावेश केल्यास पचनास हलके पदार्थ तयार होतात,म्हणून वजन कमी करण्या साठी सुद्धा हुलग्याचा समावेश रोजच्या आहारात नक्की करावा.

      Shengole recipe  पारंपारिक असून ती करायला मी माझ्या आजी आणि आईकडून शिकले. प्रत्येक भागात याची पद्धत वेगळी आहे. आज मी माझ्या आजोळी जी पद्धत वापरतात ती सांगणार आहे.



साहित्य :-

२ वाट्या हुलग्याचे पीठ
१०/१२ लसूण पाकळ्या
१ चमचा जिरे
५/६ लाल सुक्या मिरच्या किंवा मिरची पावडर
१ चमचा मीठ
४/५ चमचे शेंगदाण्याचा कूट
तेल व पाणी

वाटण :- मिक्सरमध्ये/दगडी पाट्यावर मिरच्या, लसूण, जिरे, शेंगदाण्याचा कूट व मीठ थोडं पाणी घालून वाटून घ्या.

हे रेसीपी सुदधा नक्की करून पहा :- Masvadi recipe

                                                                    chana rassa

कृती :- 

  1. सर्वप्रथम  बाजारातून हुलगे आणून, निवडून गिरणीतून बारीक पीठ दळून आणावे.
  1. २ वाट्या पीठ परातीत चाळून घ्या. त्यात तयार वाटण घालून पिठाला चोळून घ्या. थोडं थोडं पाणी घालून पीठ चांगलं मळून घ्या. तेलाचा हात लावून पिठाचा चपातीच्या पिठापेक्षा थोडा घट्ट गोळा करा.५ मिनिटे झाकून ठेवा.
  1. मोठ्या पातेल्यात शेंगोळे शिजण्यासाठी लागेल एवढे पाणी गॅसवर उकळायला ठेवा. गॅस बारीक करा.
  1. पोळपाटाला तेल लावून पिठाचा लिंबाएवढा गोळा घेऊन तळहाताच्या कडेला दाब देत जाड शेवेप्रमाणे शेंगोळे वळून घ्या. शक्य तेवढे बारीक वळून घ्या. ३/४ गोळे घेऊन त्याला वाटीसारखा सुद्धा आकार द्या. त्याला दिवसे असे म्हणतात.
  1. अशाप्रकारे पिठाचे शेंगोळे करून घ्या. त्यातील एक गोळा थोड्या पाण्यात कालवून बाजूला ठेवा.
  1. आता गॅसवरील पाण्याला उकळी आली असेल, त्यात दोन चमचे तेल व चवीनुसार मीठ घाला. एक-एक करून शेंगोळे उकळत्या पाण्यात घाला. 
  1. आता गॅस पाण्याला चांगली उकळी येईपर्यंत मोठा करा व नंतर मध्यम आचेवर सतत ढवळत शेंगोळे अर्धा तास तरी शिजवून घ्या. शेंगोळे चांगले शिजले गेले पाहिजे.
  1. आता पाण्यात कालवलेले पीठ सुद्धा ढवळून उकळत्या शेंगोळ्यांमध्ये घाला. पुन्हा १० मिनिटांसाठी रस्सा शिजवून घ्या. रस्सा घट्ट झाल्यास आवडीनुसार पाणी वाढवू शकता. तयार आहे गरमागरम हुलग्याचे शेंगोळे. हे तुम्ही भात, भाकरी किंवा चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकता. ‌


काही सुगरण टिप्स :-

  1. शक्यतो लाल रंगाचे गावरान हुलगे घ्यावेत. त्याची चव फार छान लागते. व रंगही छान येतो.
  2. यात लसणाचा वापर भरपूर करावा.
  3. शेंगोळे शिजायला वेळ लागतो. अगदी घाई करू नये. नाहीतर ते कच्चे राहतात. व त्यामुळे पोट बिघडू शकते. अगदी मंद आचेवर ते शिजवावे. चुलीवर केले तर अतिउत्तम...
  4. याचा रस्सा शक्यतो पातळ असावा छान लागतो. शिळे झाल्यास चव अधिक वाढते.

हुलग्याचे शेंगोळे खाण्याचे फायदे :-

  • हुलगा हे पारंपरिक कडधान्य आहे.तसेच तंतुमय घटकांनी समृद्ध आहे.
  • पावसाळ्यात आणि थंड हवामानात  गरमागरम शेंगोळे खाणे अधिक फायदेशीर आहे.
  • सर्दी किंवा ताप आल्यावर जिभेची चव जाते. अशावेळी हा पदार्थ म्हणजे उत्तम औषध आहे॰
  • पारंपरिक आहार म्हणून योग्य पदार्थ आहे.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

१) हुलगा म्हणजे काय ?

-हुलगा हे एक पारंपरिक कडधान्य आहे.याला काही भागात कुळीथ असेही म्हणतात.

२) शेंगोळे किती वेळ शिजवावे ?

-मंद आचेवर किमान ३०/४० मिनिटे तरी शिजवणे आवश्यक आहे.

 ३) शेंगोळे कशासोबत खाता येतात ?

- भात,भाकरी किंवा चपातीसोबत शेंगोळे छान लागतात.नुसते खाल्ले तरी छान लागतात. 


अशाप्रकारे ही गावरान चवीची पारंपारिक रेसिपी  Shengole तुम्ही नक्की ट्राय करा व आवडल्यास मैत्रिणींसोबत शेअर करा.

धन्यवाद 🙏

श्री स्वामी समर्थ






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या