Chana recipe | चना रेसिपी

 Chana recipe |  चना रेसिपी

Aajcha bet recipes च्या"ओळख विदर्भातील पदार्थांची" या लेखमालेत आज मी नागपूरच्या हॉटेल किंवा स्टॉलवर पोहे,समोसा आणि आलू बोंड्या सोबत खाण्यासाठी जी झणझणीत चना तर्री बनवली जाते त्याची रेसिपी देत आहे.

    नागपूरची प्रसिद्ध अशी ही डिश आजकाल सगळीकडे खायला मिळते.नेहमीचाच काळा चना वापरून केलेली ही झणझणीत तर्री समोसा,आलू बोंडा, पोहे सोबत अप्रतिम लागते.सकाळच्या वेळी नाष्ट्यासाठी काहीतरी चमचमीत खायचे असेल तर नक्की अशी चना तर्री आणि सोबत पोहे,आलुबोंडा(बटाटा वडा) करून पोटभरीचा नाष्ट्याचा प्रकार करू शकता.चना हा प्रोटीनचा उत्तम स्त्रोत मानला जातो.म्हणूनच असा पौष्टिक नाश्ता अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच नक्की आवडेल.अगदी विदर्भामध्ये हॉटेलमध्ये किंवा स्टॉलवर मिळतो तशा चवीचा चना रस्सा Chana recipe घरगुती साहित्य वापरून सोप्या पद्धतीने घरच्या घरी कसा बनवायचा याची सोपी कृती या लेखामध्ये मी दिलेली आहे.



Chana-recipe
 Chana recipe

चना तर्री/ रस्सा बनवण्यासाठी लागणारे साहित्य :-

१ वाटी हरभरे/काळे चणे (रात्रभर भिजवून शिजवून घेतलेले)
१ चमचा जिरे
१ चमचा मोहरी
तमालपत्र
१ चमचा आले-लसूण पेस्ट
१ मोठा कांदा बारीक चिरून
२ चमचे बेसन पीठ
२ चमचे धनेपूड
१/२ चमचा हळद
१ चमचा गरम मसाला/काळा मसाला
१ चमचा मिरची पावडर
१ चमचा बेडगी मिरची पावडर
१ टोमॅटो
कढीपत्ता आणि कोथिंबीर
दगडफूल, चक्रीफुल, दालचिनी, मिरपूड
मीठ व तेल
गरम पाणी गरजेनुसार

चना तर्री/ रस्सा बनवण्याची कृती :-

  1. सर्वप्रथम हरभरा स्वच्छ धुऊन रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा.दुसऱ्या दिवशी स्वच्छ धुऊन कुकरमध्ये शिजवून घ्या.
  2. एका वाटीत थोडे पाणी घेऊन त्यात थोडे दगडफूल,चक्रीफुल चा तुकडा,लहान तुकडा दालचिनी आणि थोडी मिरपूड घालून भिजत ठेवा.काही वेळानंतर त्याची पाण्यासकट मिक्सरच्या भांड्यात पेस्ट करून घ्या.हे मसाल्याचे पाणी गाळून घ्या.चना रस्सा उकळल्यावर शेवटी याचा वापर करायचा आहे.
  3. चना रस्सा बनवण्यासाठी एका कढईत नेहमीपेक्षा जरा जास्तच तेल घालून त्यात मोहरी, जिरे, तमालपत्र, कढीपत्ता घालून फोडणी करावी.
  4. या फोडणीत बारीक चिरलेला कांदा घालून तांबूस रंगावर परतून घ्यावा.कांदा भाजला की, त्यात आले-लसूण पेस्ट घालावी.मिनिटभर परतून त्यात दोन चमचे बेसन पीठ घालून व्यवस्थित परतून घ्यावे.पिठामुळे रस्सा छान मिळून येतो. आणि चव सुद्धा छान लागते.पीठ हलक्या गुलाबी रंगावर परतून झाल्यावर त्यात दोन चमचे धने पूड घालावी.धने पूड मुळे चव छान येते.हळद,मिरची पावडर, बेडगी मिरची पावडर,काळा मसाला घालून मिश्रण छान परतून घ्या.
  5. या मिश्रणात बारीक चिरलेला टोमॅटो घालून टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्यावा.मीठ व शिजवलेला हरभरा/चना घालून एकजीव होईपर्यंत परतून घ्या.रस्सा बनवण्यासाठी लागणारे गरम पाणी घालून घ्या.मध्यम गॅसवर रस्सा चांगला उकळून घ्यावा.शेवटी तयार केलेले मसाल्याचे पाणी घालून पुन्हा एकदा उकळी आणा.या मसाल्याच्या पाण्यामुळे हॉटेलमध्ये मिळणाऱ्या चवीचा रस्सा तयार होतो. रंग वाढवण्यासाठी हॉटेलमध्ये चुना आणि कात सुद्धा वापरला जातो.बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करावा. झणझणीत असा चना रस्सा खाण्यासाठी तयार आहे.

हे ही वाचा :- आलूबोंडा रेसिपी


   विदर्भामध्ये ही चन्याची तर्री पोहे, समोसा,पालकवडा, आलूबोंडा सोबत खाण्यासाठी दिली जाते.घरगुती छोट्या समारंभासाठी,पार्टीसाठी किंवा वाढदिवसासाठी ही डिश म्हणजे उत्तम पर्याय आहे.विदर्भातील हा पारंपारिक प्रकार तुम्हाला आवडला का हे मला कमेंट करून नक्की सांगा.नागपूरची प्रसिद्ध अशी ही डिश नक्की करून पहा.आणि आवडल्यास आपल्या मैत्रिणी सोबत शेअर करा.या रेसिपी ब्लॉगवर वर या आधी आलू बोंडा रेसिपी शेअर केली आहे. ती सुद्धा नक्की आवर्जून वाचा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या आजचा बेत या रेसिपी ब्लॉगला फॉलो करा. त्यासाठी रेसिपीच्या शेवटी दिलेल्या Follow या ऑप्शन वर क्लिक करा.🙏👍🏻

धन्यवाद 🙏🙏


श्री स्वामी समर्थ 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या