१००% तेलात न फुटणारे साबुदाणा वडे रेसीपी / How to make sabudana vada

  १००% तेलात न फुटणारे साबुदाणा वडे रेसीपी


  Aajcha bet recipes च्या या लेखामध्ये कुरकुरीत आणि टेस्टी असे साबुदाणा वडे कसे करायचे ते पाहूया. उपवासाच्या पदार्थांची लिस्ट केली तर सर्वप्रथम मान मिळवणारा लोकप्रिय पदार्थ म्हणजे अर्थातच साबुदाणा वडा.... बरेच जण उपवास करतात, पण फक्त जिभेचे लाड पुरवण्यासाठी सुद्धा उपवास  करणारे लोक आपल्याकडे सापडतील.. थोडक्यात काय तर उपवास असला की, उपवास करणारा आणि न करणारा सुद्धा या एका डीशने खुश होतो.
     पण हे साबुदाणा वडे अगदी परफेक्ट होण्यासाठी काही काळजी घ्यावी लागते. कधी कधी वडा करताना तेलात फुटतो, अंगावर सुद्धा उडतो. तेल खराब होते , आणि करण्याचा मूड जातो. अगदी कुरकुरीत आणि आतून मऊ असे  १००% तेलात न फुटणारे साबुदाणा वडे कसे करायचे याची सोपी रेसिपी How to make sabudana vada  मी आपल्यासाठी देत आहे.

How-to-make-sabudana-vada
साबुदाणा वडा / How to make sabudana vada

साहित्य :- (साबुदाणा वड्यासाठी)

१ वाटी साबुदाणा अंदाजे १५०ग्रॅम (भिजल्यानंतर तो साधारण २ वाट्या होईल )
२  उकडलेले बटाटे (अंदाजे १ वाटी )
१/२ वाटी शेंगदाण्याचा जाडसर कूट
४/५ हिरव्या मिरच्या  वाटून
१/२ चमचा  लिंबाचा रस
१ चमचा मिरची पावडर
चवीनुसार साखर 
मीठ व शेंगदाणा तेल/ तूप

साहित्य :- (चटणी साठी )

२ काकड्या
१ वाटी ताजे दही
३/४ हिरव्या मिरच्या वाटून
मीठ, साखर व शेंगदाण्याचा कूट आवडीनुसार

कृती :-
  1. साबुदाणा चाळून घ्या म्हणजे त्यातील  बारीक पावडर निघून जाईल. ३/४ वेळा पाण्याने स्वछ धुऊन घ्या.  साबुदाणा बुडेल इतपत पाणी घालून रात्रभर किंवा ७/८ तास तरी भिजवून ठेवावा.खिचडीसाठी साबुदाणा भिजवताना आपण अर्धे बोटाचे पेर बुडेल एवढे पाणी घालतो. पण वड्यांसाठी भिजवताना तसे करायचं नाही.
  2. एका परातीत भिजलेला साबुदाणा घेऊन तो मोकळा करून घ्या.हाताने साबुदाणा थोडा कुस्करून घ्यायचा.म्हणजे त्यातील पाणी असते त्यामुळे वडे बर्‍याचदा तेलात फुटले जातात ते होणार नाही.त्यात उकडलेले बटाटे कुस्करून घाला.साबूदाण्याच्या निम्मा म्हणजेच साधारण १ वाटी बटाटा घाला.हे दोन्ही आधी चांगलं मळून घ्या,
  3. शेंगदाण्याचा जाडसर कूट, वाटलेली मिरची, लिंबाचा रस,मीठ, मिरची पावडर घालून व्यवस्थित मिसळून घ्या.चागले एकजीव  होईपर्यंत मळून घ्यावे.
  4. मिश्रणाचे गोळे करून घ्यावेत.हाताला पाणी किंवा तेल लावून गोलाकार पातळ असा वडा थापून घ्या.वडा फार जाड करु नये.त्यामुळे ते आतून नीट तळले जात नाहीत.तेलकट होतात.आणि कधी कधी तेलात फुटतात.
  5. कढईत  तेल/ तूप गरम करून घ्या. मध्यम आचेवर वडे तळून घ्या. मोठ्या आचेवर वडे तळले तर ते आतून कच्चे राहतात.आणि कमी आचेवर तळले तर तेल जास्त शोषले जाते.म्हणून मध्यम आचेवर वडे छान टाळून घ्या.
  6. चटणी साठी दह्यात साखर, मीठ, वाटलेली मिरची घालून मिसळून घ्या.किसलेली काकडी व दाण्याचा कूट घालून व्यवस्थित मिसळून घ्यावे. किंवा किसलेले ओले खोबरे,हिरवी मिरची,मीठ,थोडी साखर,दही घालून अगदी पातळ चटणी सुद्धा यासोबत छान लागते.
  7. गरमागरम साबुदाणा वडे  चटणी सोबत  अगदी छान लागतात.
ही रेसीपी सुद्धा करून पहा :-  Ratalyachi Burfi recipe in marathi / रताळ्याची  बर्फी

  काही सुगरण टिप्स :-

  • साबुदाणा चांगल्या प्रतीचा घ्यावा.
  • भिजलेला साबुदाणा फार  कोरडा किंवा ओलसर  नसावा.
  • साबुदाणा आणि बटाट्याचे प्रमाण  योग्य असावे. बटाटा जास्त झाल्यास वडा तेलकट होतो. आणि साबुदाणा जास्त झाल्यास वडा कडक होतो.
  • मिश्रण चांगले मळून घ्यावे.म्हणजे वडे छान होतात.
  • वडा थापताना दाब देत थापावा .म्हणजे वडा तेलात फुटत नाही.
  • वडे तळताना अर्धवट तळा. आणि काढून घ्या.दुसरी बॅच तळून झाल्यावर पहिली बॅच पुन्हा २/३ मिनिटे मोठ्या गॅस वर सोनेरी रंगावर तळून घ्या.म्हणजे वडे वरून कुरकुरीत आणि  आतून मऊ होतात.
    या टिप्स वापरून जर वडे केले तर खमंग आणि कुरकुरीत वडे तयार होतील. १०० % तेलात न फुटणारे खुसखुशीत वड्यांची ही रेसिपी आवडली तर नक्की करून बघा आणि मैत्रिणींसोबत शेअर करा.

धन्यवाद 🙏
 
श्री स्वामी समर्थ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या