Suralichi vadi / सुरळीची वडी / खांडवी

    Suralichi vadi / सुरळीची वडी / खांडवी


     Aajcha bet recipes च्या आजच्या लेखामध्ये सुरळीची वडी अगदी झटपट कशी करायची ते पाहूया. सुरळीची वडी ही एक पारंपारिक महाराष्ट्रीयन डिश आहे. गुजरात मध्ये तिला खांडवी khandvi असे म्हणून ओळखले जाते.साईड डिश म्हणून हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. चवीला अप्रतिम असणारी ही सुरळीची वडी बनवणे ही सुद्धा एक कला आहे. ती बनवायला जरा किचकट असते. मिश्रण थंड झाले तर ते पुन्हा एकदा शिजवावे लागते. शिवाय करायला खूप सारी भांडी लागतात.अगदी कमी वेळात आणि पसारा न घालता अगदी मऊ लुसलुशीत अशी   Suralichi vadi  कशी करायची याची इनोव्हेटिव्ह रेसिपी मी आज सांगणार आहे.

Suralichi-vadi
  Suralichi vadi / सुरळीची वडी / खांडवी

साहित्य :-

१ वाटी बेसन पीठ
२ वाट्या ताक
पाव चमचा हळद
चिमूटभर  हिंग
आलं मिरचीची पेस्ट
१ चमचा मैदा 
पाव वाटी खोवलेला नारळ
कोथिंबीर
मीठ व साखर

फोडणीचे साहित्य :-

१ चमचा मोहरी
१ चमचा जिरे
२/३ मिरच्यांचे तुकडे
१ चमचा पांढरे तीळ
हिंग व कढीपत्ता
तेल 

ही रेसीपी सुद्धा नक्की करून पहा :- बेसन ढोकळा / How to Make dhokla

कृती :-
  1. मिक्सरच्या मोठ्या भांड्यात बेसन, मैदा, ताक, मीठ, साखर, आलं मिरचीची पेस्ट,हिंग व हळद घालून मिश्रण फिरवून घ्या.
  2. मिश्रण व्यवस्थित गाळून घ्या. म्हणजे मिरचीची भरड त्यात राहणार नाही. अगदी छान बॅटर तयार होईल.
  3. एका मोठ्या कढईत पाणी गरम करण्यासाठी ठेवा. त्यावर  बसेल अशा मापाचे ताट घेऊन त्याला तेल लावून घ्या. तयार मिश्रण ताटावर घालून सालपापड्याप्रमाणे फिरवून घ्या. फार पातळ किंवा फार जाड थर नसावा.
  4. ते ताट कढईवर ठेवून वरून दुसरे झाकण ठेवा.३ मिनिटे तरी वाफवून घ्या. वरचे झाकण काढून ते ताट पुन्हा पलटून कढईवर ठेवा. व पुन्हा दोन मिनिटांसाठी वाफवून घ्या.
  5. कढई वरचे ताट काढून आता बाजूला ठेवा. पुन्हा दुसऱ्या ताटाला तेल लावून पुन्हा तशीच कृती करा. मिश्रण पूर्ण थंड झाल्यावर दोन इंचावर सुरीने कट देऊन घ्या. वरून खोवलेला नारळ, कोथिंबीर पसरवून घ्या. व अलगद कडा उचलून रोल करून घ्या.
  6. सर्व मिश्रणाच्या सुरळीच्या वड्या करून घ्या.
  7. वरून घालण्यासाठी खमंग फोडणी तयार करून घ्या. त्यासाठी फोडणीच्या डावात एक चमचा तेल गरम करा. त्यात मोहरी, जिरे, बारीक कापलेली हिरवी मिरची, तीळ, हिंग, कढीपत्ता घालून खमंग अशी फोडणी तयार करा. व ती थंड करून घ्या. ही फोडणी सुरळीच्या वड्यांवर घालून घ्या. पुन्हा वरून खोवलेला नारळ व कोथिंबीर घालून वड्या सर्व्ह करा. 

काही सुगरण टिप्स :-

  • तयार मिश्रण गाळून घ्या. म्हणजे अगदी मऊसूत अशा वड्या तयार होतात.
  • मैद्याचा वापर नक्की करा. म्हणजे वडीला छान चकाकी येते.
  • ताटाला छान वाफ लागली गेली पाहिजे. म्हणजे वड्या शिजल्या जातात. व त्या काढताना तुटत नाही.
  • ताटातील मिश्रण थंड झाल्यावरच रोल करायला घ्या. म्हणजे तो अगदी व्यवस्थित सुटून येईल.
  • फोडणी गार करूनच घाला.

    अगदी लहानांपासून ते मोठ्यापर्यंत आवडणारी ही डिश तुम्ही नक्की बनवून पहा व आवडली तर मैत्रिणींसोबत शेअर करा.

धन्यवाद 🙏

श्री स्वामी समर्थ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या