रवा उपमा रेसिपी / Rava Upama Recipe in Marathi / झटपट घरगुती नाश्ता
Aajcha bet recipes च्या या लेखामध्ये अगदी नाष्टा सेंटरमध्ये मिळणारे उपीट किंवा उपमा रेसिपी कशी करायची याची रेसिपी दिलेली आहे.सकाळच्या गडबडीच्या वेळी अगदी पटकन तयार होणारा पौष्टिक नाष्टा म्हणजे उपमा. दक्षिण भारतात प्रसिद्ध असणारा हा उपमा महाराष्ट्रात 'उपीट' म्हणून ओळखला जातो. उपीट मध्ये हळद घातली जाते, तर उपमा सफेद रंगाचा असतो. व त्यात आवडीनुसार भाज्या घातल्या जातात. काहीजण याला 'सांजा' असेही म्हणतात. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा हा उपमा प्रत्येकाच्या घरात बनणारा नाश्त्याचा पदार्थ आहे. रवा उपमा हा पोटभरीचा आणि कमी वेळेत होणारा पदार्थ आहे.
काहींना हा उपमा अगदी मऊसूत आवडतो तर काही जणांना तो मोकळा फडफडीत असा खायला आवडतो. नाष्टा सेंटर मध्ये मिळणारा उपमा चवीला अप्रतिम असतो. तशाच चवीचा उपमा घरी करण्यासाठी काही टिप्स मी या रेसिपीमध्ये How to make upit देणार आहे.
१ वाटी बारीक किंवा मध्यम जाडीचा रवा
१ मध्यम आकारात चिरलेला कांदा
१ चमचा हरभरा डाळ
१ चमचा उडीद डाळ
१ चमचा मोहरी
१ चमचा जिरे
१/२ चमचा साखर
४/५ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
किसलेले आले
७/८ कढीपत्त्याची पाने
शेंगदाणे
आवडीनुसार भाज्या (गाजर, वाटाणा)
कोथिंबीर
मीठ, तेल/तूप व पाणी ३ वाट्या
ही रेसीपी सुद्धा नक्की करून पहा :- Instant dosa recipe
कृती :-
- एका कढईत २ चमचे तेल/ तूप गरम करून त्यात रवा घालून मंद आचेवर भाजून घ्यावा.चार ते पाच मिनिटं रवा हलका तांबूस होईपर्यंत भाजावा. एका भांड्यात रव्याच्या तिप्पट म्हणजेच ३ वाट्या पाणी उकळायला ठेवा.
- रवा बाजूला काढून त्याच कढईत २ चमचे तेल घालून तेल गरम झाल्यावर मोहरी, हरभरा डाळ, उडीद डाळ, घालून हलका रंग बदलेपर्यंत परता. जिरे, कढीपत्ता, शेंगदाणे, मिरच्या घालून व्यवस्थित परता.
- चिरलेला कांदा घालून कांदा मऊ होईपर्यंत परता. बारीक चिरलेले गाजर, हिरवा वाटाणा घालून मंद आचेवर परता.
- किसलेले आले व कोथिंबीर घालून पुन्हा एकदा परता. त्यात गरम केलेले पाणी घाला. व मिश्रणाला चांगली उकळी येऊ द्या. म्हणजे सर्व भाज्यांचे व मसाल्याचे फ्लेवर त्यात उतरतील.
- भाजलेला रवा हळूहळू घालून मिश्रण सतत ढवळत राहावे. म्हणजे गुठळी होणार नाही. वरून साखर घालावी. म्हणजे उपम्याला छान चकाकी येते. सर्व व्यवस्थित मिसळून वरून झाकण ठेवावे.३/४ मिनिटे उपमा वाफवून घ्या.
- गरमागरम उपमा बारीक शेव सोबत नाश्त्यासाठी खायला घ्यावा.
काही सुगरण टिप्स :-
- मऊसूत उपमा हवा असल्यास बारीक रवा घ्या. मोकळा फडफडीत असा उपमा आवडत असेल तर मध्यम किंवा जाड रवा वापरावा.
- रवा चांगला भाजावा. पण करपवू नये. पांढरट रंगाचा रवा असावा. जास्त तांबूस सुद्धा रवा करू नये. त्यामुळे उपम्याची चव बिघडते.
- कांदा जास्त बारीक चिरू नये. तो मध्यम असावा. म्हणजे तो दाताखाली छान लागतो.
- भाज्या न घालता व हळद घालून साधे उपीट सुद्धा छान लागते.
- पाण्याचे प्रमाण योग्य घेतल्यास अगदी छान व मऊसूत उपमा तयार होतो.
- आल्याचा वापर नक्की करा. त्यामुळे चव छान लागते.
- इथं फक्त पाण्याऐवजी निम्मे दूध व निम्मे पाणी असं प्रमाण सुद्धा वापरू शकता. त्यामुळे उपम्याचा रंग सफेद राहतो. व उपमा मऊ व चवदार होतो.
या पद्धतीने जर उपमा केला तर तो कधीच बिघडणार नाही. ही रेसिपी आवडली तर नक्कीच ट्राय करा. आणि आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा.
धन्यवाद 🙏
श्री स्वामी समर्थ

0 टिप्पण्या