व्हेज मराठा / Veg Maratha recipe

     व्हेज मराठा / Veg Maratha recipe

    Aajcha bet recipes च्या या लेखामध्ये झणझणीत आणि चमचमीत व्हेज मराठा भाजी घरच्या घरी कशी करायची याची रेसिपी दिलेली आहे.रोज- रोज घरगुती पद्धतीने बनवलेले जेवण खाऊन कंटाळा येतो आणि काहीतरी चमचमीत आणि झणझणीत खायची इच्छा होते तेव्हा डोळ्यांसमोर हॉटेल किंवा ढाब्यावर मिळणाऱ्या मेनू कार्डवर असणाऱ्या चमचमीत भाज्यांची नावे येऊ लागतात. प्रत्येक वेळी बाहेर जाऊन खाणे प्रत्येकाला शक्य होत नाही. किंवा खिशाला परवडणारे सुद्धा नसते... मग अशावेळी स्मार्ट गृहिणी अशा भाज्या घरीच करण्याचा प्रयत्न सुद्धा करतात. रेसिपी कितीही पाहून(सोशल मीडियावर 😊) केली तरी तिची चव हॉटेल सारखी होईलच असे नाही. मग घरातील सर्वजण पेपर मध्ये चुका काढतात अगदी त्याप्रमाणे मार्क देऊ लागतात... आणि मग वाटतं की, हॉटेलमध्ये पैसे देऊन खाणं बरं!!

    पण बऱ्याच माझ्या तुमच्यासारख्या मैत्रिणी हे प्रयत्न सातत्याने करतच असतात. अशीच एक हॉटेलमध्ये मिळणारी झणझणीत अशी भाजी म्हणजे व्हेज मराठा... किसलेल्या भाज्यांचे कोफ्ते बनवून भाजी सर्व्ह करताना ते तयार ग्रेव्हीत घालून भाजी खायला दिली जाते. या भाजीत वापरले जाणारे ग्रेव्हीतील मसाले हे बहुतेक आपल्या महाराष्ट्रीयन पदार्थांत जास्त प्रमाणात वापरले जाणारे असल्यामुळे या डिश चे नाव 'व्हेज मराठा' असे पडले असावे... पनीर वर्गातील भाज्या(मटर पनीर, पनीर मसाला, बटर पनीर...) नेहमीच घरी पाहुणे आले की, किंवा विशेष प्रसंगी प्रत्येक घरी बनवल्याच जातात. परंतु व्हेज कोल्हापुरी, मिक्स व्हेज, व्हेज कोफ्ता करी अशा भाज्या बऱ्याचदा हॉटेल मधून ऑर्डर केल्या जातात. घरी बनवल्या तरी त्याची चव रेस्टॉरंट सारखी होतच नाही... या लेखात मी Veg Maratha recipe घरी सोप्या पद्धतीने कशी बनवायची यासाठी काही टिप्स दिल्या आहेत. चला तर मग ही रेसिपी कशी करायची ते पाहूया...


साहित्य :-(कोफ्ते तयार करण्यासाठी लागणारे)

२ वाटी किसलेला कोबी
१/२ वाटी किसलेले गाजर
पाव वाटी बारीक चिरलेली सिमला मिरची
१ चमचा आलं-लसूण पेस्ट
१ चमचा धने पावडर
१ चमचा जिरे पावडर
छोटी वाटी बेसन पीठ
१/२ वाटी मैदा
पाव वाटी कॉर्नफ्लोर
हळद ,मीठ, तळण्यासाठी तेल

साहित्य :- (ग्रेव्ही साठी लागणारे)

२ मोठे उभे पातळ चिरलेले कांदे
पाव वाटी सुक्या खोबऱ्याचे काप किंवा किसलेले
१ मोठा टोमॅटो
७/८ लसूण पाकळ्या
आल्याचे काप
१ चमचा तीळ व खसखस
७/८ काजू
खडा मसाला (दालचिनी तुकडा, ३/४ काळी मिरी, २/३ लवंग)
२ चमचे बेडगी मिरची पावडर
१ चमचा मोहरी
१ चमचा किचन किंग मसाला
१ चमचा हळद पावडर
१ चमचा मिरची पावडर
प्रत्येकी१ चमचा धने जिरे पावडर
२/३ तमालपत्र
तडक्यासाठी (ठेचलेला लसूण, बेडगी मिरची)

ही रेसीपी सुद्धा करून पहा :- कढाई पनीर / Kadhai Paneer

कृती :-
  1.  हॉटेलमध्ये कुठल्याही भाजीसाठी लागणारी बेसिक ग्रेव्ही ही आधीच तयार करून ठेवली जाते. त्यासाठी उभे पातळ चिरलेले कांदे तेलात घालून तांबूस रंगावर परता. नंतर खोबऱ्याचे काप घालून परतावे. वरून काजू, आले, लसूण पाकळ्या, खसखस व तीळ घालून चांगले परतावे. २चमचे मिरची पावडर,चिरलेला टोमॅटो घालून व्यवस्थित परतून घ्यावे. तयार मिश्रणात अर्धा ग्लास गरम पाणी घालून दहा मिनिटे तरी सर्व साहित्य शिजवून घ्यावे. म्हणजे तयार होणारी ग्रेव्ही दाटसर बनते. थंड झाल्यावर मिक्सरवर वाटण तयार करून घ्यावे.
  2.  कोफ्ते तयार करण्यासाठी एका भांड्यात किसलेला कोबी, गाजर, सिमला मिरची, घेऊन त्यावर आले लसूण पेस्ट, हळद, धने जिरे पावडर, मिरची पावडर, मीठ घालून मिश्रण हाताने चांगले एकजीव करून घ्यावे.
  3.  तयार मिश्रणात थोडे थोडे करून बेसन पीठ, मैदा व कॉर्नफ्लोर घालून हलक्या हाताने मिसळून घ्यावे. कोफ्ते होतील इतपत पीठ सैलसर असावे. वरून पाणी घालू नये. किसलेल्या भाज्या पाणी सोडू लागतात. तेवढे पुरेसे होते.
  4. तयार मिश्रणाचे चपटे किंवा लांबट आकाराचे कोफ्ते करून घ्यावेत. कढईत गरम तेलात कोफ्ते सोडून तांबूस रंगावर तळून घ्यावेत. कोफ्ते तळताना गॅस मध्यम ते मोठ्या आचेवर असावा.
  5.  एक वाटीत हळद, मिरची पावडर, धने जिरे पावडर घेऊन ५/६ चमचे पाणी घालून पेस्ट करून घ्यावी.
  6.  ग्रेव्हीसाठी फोडणी करताना जरा जास्त तेलाचा वापर करावा. तेलात मोहरी, तमालपत्र, तयार करून ठेवलेली पेस्ट घालून परता. वरून तयार केलेले ग्रेव्हीचे वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतावे. चमचाभर किचन किंग मसाला घालावा. म्हणजे हॉटेल सारखी चव येते.
  7.  ग्लासभर गरम पाणी घालून दाटसर अशी ग्रेव्ही होईल असे पाहून भाजीलाचांगली उकळी आणावी. चवीनुसार मीठ घालावे.वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी व गॅस बंद करावा. या भाजीला वरून तडका दिला जातो. त्यासाठी फोडणीच्या डावात चमचाभर तेल घालून ठेचलेला लसूण खमंग होईपर्यंत तळून घ्यावा व बेडगी मिरची घालावी. तयार तडका भाजीवर घालून घट्ट झाकण लावावे. म्हणजे लसणाची खमंग फोडणी भाजीची चव वाढवते.
  8.  अगदी आयत्यावेळी म्हणजेच जेवणासाठी ताट वाढण्यापूर्वी तयार कोफ्ते यात घालावेत. वरून फेटलेली साय किंवा विकतची फ्रेश क्रीम घालून झणझणीत अशी व्हेज मराठा भाजी खाण्यासाठी घ्यावी. या भाजीसोबत चपाती, रोटी, किंवा बटर नान बनवू शकता.

काही सुगरण टिप्स :-

  • कोफ्ते तयार करण्यासाठी लागणाऱ्या भाज्या शक्यतो ताज्या असाव्यात. इथे तुम्ही आवडीनुसार भाज्या वापरू शकता. बटाटा किंवा पनीर सुद्धा वापरले जाते.
  • बेसनाच्या निम्मा मैदा व थोड्या प्रमाणात कॉर्नफ्लॉवर असे प्रमाण असावे. लागेल तसेच पीठ घालावे. म्हणजे तयार होणारे कोफ्ते वरून कुरकुरीत व आतून मऊ असे तयार होतात. पाणी वापरू नये.
  • कोफ्ते तळताना शक्यतो तेल कडकडीत गरम असावे.
  • ग्रेव्हीचे जिन्नस चांगले शिजवून घ्यावे. म्हणजे ग्रेव्ही दाटसर बनते. पदार्थांचा कच्चेपणा जातो.
  •  या भाजीसाठी शक्यतो तेलाचा वापर जरा जास्तच करावा. शक्यतो बेडगी मिरची पावडर वापरावी. म्हणजे भाजीचा रंग छान येतो.
  • ग्रेव्ही जास्त पातळ असू नये. दाटसरच असावी.
  • कोफ्ते घालून भाजी उकळवू नये.
  • वरून तडका अवश्य द्यावा. लसणामुळे भाजीचा खमंगपणा वाढतो.
   अशाप्रकारे घरच्या घरी ढाब्यावर किंवा हॉटेलमध्ये झणझणीत अशी व्हेज मराठा भाजी आपल्या रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणात बनवून घरच्या खवय्यांची शाबासकी मिळवू शकता. नक्की वर दिलेली रेसिपी करून पहा. तुमची काही वेगळी पद्धत असेल तर नक्की माझ्यासोबत कमेंट मध्ये शेअर करा. रेसिपी आवडली तर आपल्या मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा.
धन्यवाद 🙏

श्री स्वामी समर्थ












टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या