Aajcha bet recipes च्या या लेखामध्ये पारंपारिक पद्धतीने जिलेबी कशी करायची याची रेसीपी दिली आहे. लग्न समारंभात जेवणाच्या ताटात ज्याला मानाचे स्थान आहे असा एकमेव पारंपारिक गोड पदार्थ म्हणजे कुरकुरीत आणि रसरशीत जिलेबी. तिचं नाव ऐकून तोंडाला पाणी सुटले नाही अशी एकही व्यक्ती सापडणार नाही.अगदी खेड्यापाड्यापासून मोठ मोठ्या शहरात असणाऱ्या कोणत्याही मिठाईच्या दुकानात गेलो तरी हमखास मिळणारा असा हा लोकप्रिय मिठाईचा प्रकार आहे. मूळ भारतीय पदार्थ नसला तरी अगदी प्रत्येकाच्या मनात घर केलेला हा पदार्थ लग्न समारंभ असो की कुठलही सेलिब्रेशन ज्याच्याशिवाय पूर्णच होत नाही.
भारताच्या प्रत्येक भागात जिलेबी वेगवेगळ्या पदार्थासोबत खाल्ली जाते. गुजरात मध्ये फाफड्या सोबत खाल्ली जाते, तर उत्तर प्रदेशात रबडी सोबत सुद्धा खातात. महाराष्ट्रीयन लग्नामध्ये जोडीला ताकाचा मठ्ठा वाढला जातो. तर काही भागात दह्यासोबत खाल्ली जाते. आजकाल जिलेबीचे अनेक प्रकार बनवले जातात. डॉलर जिलेबी, मावा जिलेबी, पनीर जिलेबी... तसेच साखरे ऐवजी गुळाचा पाक वापरून सुद्धा जिलेबी बनवली जाते. आपल्याकडे 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट हे राष्ट्रीय सण जिलेबी खाऊन साजरा करण्याची पद्धत सुद्धा आहे. म्हणूनच 26 जानेवारी च्या पूर्वसंध्येला जिलेबी Jalebi Recipe in Marathi याची सोपी कृती मी या लेखामध्ये दिली आहे.
जिलेबी बनवण्यासाठी लागणारे साहित्य :-
- जिलेबी बनवण्यासाठी सर्वप्रथम मैदा चाळून घ्या. थोडं थोडं पाणी घालून सैलसर भिजवून घ्या. मिश्रण हाताने व्यवस्थित फेटून घ्या. १०/१२ तासांसाठी हे मिश्रण घट्ट झाकण लावून फरमेंट करून घ्या.शक्यतो रात्री ठेवावे.
- उडीद डाळ सुद्धा रात्रभर भिजत ठेवा. सकाळी उडीद डाळ थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्यावी.
- रात्रभर ठेवलेले मैद्याचे मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे. त्यात वाटलेली उडीदडाळ व चिमूटभर मीठ घालून मिश्रण हाताने चांगले मिसळून घ्यावे. उडीद डाळ आवडत नसेल तर नाही घातली तरी चालते. फक्त मैदा वापरून सुद्धा जिलेबी करता येते. मिश्रण हाताने चांगले फेटून घ्या. म्हणजे ते अगदी हलके होते. भज्या इतपत पातळसर मिश्रण असावे. फेटताना एका दिशेनेच फेटावे.फेटल्यामुळे मिश्रणाला बुडबुडे येऊ लागतात.म्हणजे जिलेबी साठी लागणारे परफेक्ट बॅटर तयार आहे असे समजावे.
- एकीकडे जिलेबी साठी पाक तयार करायला ठेवा. त्यासाठी एका पातेल्यात साखर बुडेल इतपत पाणी घालून गॅसवर पाक करायला ठेवा.
- साखर विरघळल्यानंतर ५/६ मिनिटे झाल्यावर त्यात थोडा लिंबाचा रस घालावा. म्हणजे पाकात जिलेबी घातल्यावर त्यावर साखर जमा होत नाही. आवडीनुसार कोणताही खायचा रंग आणि वेलची पूड घालावी.एकतारी पाक झाल्यानंतर पातेले बाजूला ठेवावे.
- जिलेबी करण्यासाठी जाड बुडाचा पसरट फ्राय पॅन घ्या. त्यामध्ये तेल किंवा तूप घालून चांगले तापवून घ्या.पायपिंग बॅग मध्ये फेटलेले जिलेबीचे मिश्रण भरून घ्यावे.त्याला छोटासा कट मारून घ्या. गरम तेलात गोलाकार आकारात जिलेबी घालून घ्या. तेल चांगले तापलेले असल्यावर जिलेबी तळून पटकन वर येते. दोन्ही बाजूंनी व्यवस्थित जिलेब्या तळून घ्या. एक बॅच झाली की, ती लगेच कोमट असलेल्या पाकात बुडवून ठेवा. तोपर्यंत दुसरी बॅच तेलात घालून घ्या. पाकात मुरलेली जिलेबी एका चाळणीत निथळायला ठेवा.म्हणजे जास्तीचा पाक बाजूला होईल.अशाप्रकारे सर्व जिलेब्या करून घ्या.
काही सुगरण टिप्स :-
- जिलेबी चे पीठ चांगले फरमेंट झालेले असावे. कारण आपण इथे सोड्याचा अजिबात वापर केलेला नाही. हे पीठ चांगले फेटून मगच जिलेबी करावी.
- जिलेबी तळताना तेल चांगले गरमच असावे.
- पाक हा एक तारी असावा.
- काहीजण खायचा रंग जिलेबी च्या मिश्रणात सुद्धा वापरतात.
- कोणताही गोडाचा पदार्थ करताना चिमूटभर मीठ सुद्धा घालावे म्हणजे त्या पदार्थाची गोडी आणखीन वाढते.
- जिलेबी पाकात टाकताना पाक हा कोमट असावा. आणि जिलेबी गरम असावी. थंड पाकात जिलेबी टाकू नये.नाहीतर तो पाक व्यवस्थित शोषला जात नाही.
- जिलेबी जास्त कुरकुरीत हवी असेल तर तळताना ती व्यवस्थित तळून घ्यावी. काहींना मऊ जिलेबी आवडते. अशावेळी जास्त वेळ तळू नये.
- मोठ्या प्रमाणात जिलेब्या करत असाल तेव्हा - जिलेबी पाकात घालताना ती गरम असते. त्यामुळे तो पाक नंतर घट्ट होऊ लागतो. त्याची साखर होऊ लागते. अशावेळी थोडे पाणी गरम करून पाकात घाला. म्हणजे पुन्हा पातळ सर असा पाक तयार होईल.

0 टिप्पण्या