व्हेज खीमा | Veg Kheema recipe

    व्हेज खीमा  | Veg Kheema recipe

     Aajcha bet recipes च्या या लेखामध्ये भाज्यांपासून शाकाहारी लोकांना सुद्धा खाता येईल असा खीमा घरी कसा करायचा याची रेसीपी देत आहे. हिवाळ्यामध्ये बाजारात भरपूर प्रमाणात भाज्या आणि फळे विक्रीसाठी उपलब्ध होतात. आणि म्हणूनच प्रत्येक वेळी बाजारात गेल्यावर ताजा भाजीपाला पाहून तो विकत घेण्याचा मोह आवरत नाही.बऱ्याचदा स्वस्त म्हणून सुद्धा जास्तीचा भाजीपाला आणून,निवडून तो साठवला जातो.अनेकदा दोन-तीन भाज्या एकत्र करून मिक्स व्हेज केली जाते, तर कधी व्हेज पुलाव/बिर्याणी असा बेत ठरलेला असतो. परंतु कधी कधी हे सर्व खाऊन कंटाळा येतो. अशावेळी काहीतरी नवीन खाण्याची इच्छा असेल तर नक्की व्हेज खीमा ट्राय करून पहा...

     हॉटेलमध्ये गेल्यावर नॉनव्हेज खाणाऱ्या खवय्यांसाठी अनेक चमचमीत पदार्थ उपलब्ध असतात. परंतु आमच्यासारख्या शाकाहारी लोकांना बऱ्याचदा पावभाजी, पुलाव, व्हेज कोल्हापुरी, पनीरच्या रेसिपी ऑर्डर कराव्या लागतात.अशांसाठी चमचमीत व्हेज खिमा हॉटेल किंवा रेस्टॉरंट मध्ये मेन्यू कार्ड मध्ये समाविष्ट असणारा मेन्यू आहे.काहीजणांनी तो खाल्ला सुद्धा असेल.अनेकदा फ्रिजमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या थोड्याच भाज्या शिल्लक असतात. अशावेळी काही सुगरण गृहिणी त्यापासून काहीतरी भन्नाट रेसिपी तयार करण्याचा प्रयत्न करतात.अशा माझ्या सुगरण मैत्रिणीसाठी या लेखामध्ये रेस्टॉरंट मध्ये मिळणारा झणझणीत असा व्हेज खीमा Veg Kheema recipe घरीच उपलब्ध असलेल्या शिल्लक भाज्यापासून कसा करायचा याची सोपी कृती दिलेली आहे.



व्हेज खीमा बनवण्यासाठी लागणारे साहित्य :-

२ मोठे कांदे (उभे पातळ चिरून)
२ मोठे टोमॅटो उभे चिरून
८/१० लसणाच्या पाकळ्या, आल्याचा तुकडा
७/८ काजू
१ मोठा चमचा मगज बी
खडा मसाला (तमालपत्र, २/३ हिरवी वेलची, दालचिनीचा तुकडा, १ चक्रीफुल, 
                      ३/४ लवंग, ३/४ काळी मिरी)
१ चमचा जिरे
१ वाटी मटार दाणे
२ सिमला मिरची
१ वाटी फ्लॉवर
१/२  वाटी बीन्स
१ गाजर
१०० ग्रॅम पनीर 
१ चमचा बारीक चिरलेला लसूण / किसलेले आले १चमचा
१ कांदा बारीक चिरून
१ टोमॅटो बारीक चिरून
२/३ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
१चमचा धने पूड
१चमचा जिरेपूड
१ चमचा किचन किंग मसाला
२ चमचे बेडगी मिरची पावडर
१ चमचा हळद
१/२ चमचा साखर
बारीक चिरलेली कोथिंबीर
मीठ, तेल व बटर

ही रेसीपी सुद्धा नक्की करून पहा :- मेथी मटर मलाई | Methi Matar Malai Recipe 

व्हेज खीमा तयार करण्याची कृती :-
  1. सर्वप्रथम भाजीसाठी लागणारी ग्रेव्ही तयार करून घेऊ. त्यासाठी कढईत २ चमचे तेल घालून त्यामध्ये वर दिलेले सर्व खडे मसाले घाला. चांगले परतून त्यावर उभा चिरलेला कांदा हलक्या गुलाबी रंगावर परतून घ्या. त्यात उभा चिरलेला टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत परता.त्यातच आले लसूण, काजू, मगज बी, बेडगी मिरची पावडर घालून चांगले परतून अर्धा कप पाणी घालून मिश्रण पाच मिनिटांसाठी शिजवून घ्यावे. मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात बारीक पेस्ट करून घ्यावी.
  2. तयार पेस्ट दोन चमचे तेल कढईत घालून तेल सुटेपर्यंत चांगली परतून घ्यावी.
  3. वर दिलेल्या सर्व भाज्या एक-एक करून मिक्सरवर जाडसर वाटून घ्या.किंवा चॉपर असेल तर बारीक चिरून घ्या. पनीर किसून घ्या.
  4. दुसऱ्या कढईत २ चमचे तेल आणि दोन चमचे बटर घालून त्यावर जिरे घालावे.बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेले आले लसूण घालून परतून घ्या. त्यातच बारीक चिरलेला टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत परता.
  5. धने जिरे पूड, बेडगी मिरची पावडर, हळद घालून मिश्रण व्यवस्थित मिसळून घ्यावे. त्यावर मिक्सरवर जाडसर वाटलेल्या भाज्या एक- एक करून घाला. किसलेले पनीर सुद्धा घाला.मंद आचेवर तेल सुटेपर्यंत भाज्या चांगल्या परतून घ्या.
  6. तयार मिश्रणात आवडीनुसार मीठ,साखर व किचन किंग मसाला घालून व्यवस्थितपणे परतून घ्या. शिजलेली तयार ग्रेव्ही घालून गरजेनुसार गरम पाणी घाला. मिश्रणाला चांगली उकळी येऊ द्या. उकळल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करा. तयार आहे अगदी चमचमीत असा व्हेज खिमा...😋😋 खायला घेताना आवडीनुसार वरून चीज किसून सुद्धा घालू शकता. ही भाजी पराठा, चपाती, नान आणि पावा बरोबर खाऊ शकता.

काही सुगरण टिप्स :-

  • आवडीनुसार भाज्या घालू शकता.मशरूम, सोयाबीन सुद्धा घालू शकता.
  • मगज बी आणि काजू मुळे दाटसर अशी ग्रेव्ही तयार होते. हे घरात उपलब्ध नसेल तर खसखस किंवा तिळाचा वापर सुद्धा करू शकता.
  • भाज्या तेलात चांगल्या परतून घ्या. म्हणजे त्या चांगल्या शिजल्या जातील. आणि भाजीची चव आणखीन वाढेल.
  • बेडगी मिरची पावडर घातल्याने भाजीचा रंग छान येतो.
  • किचन किंग मसाला वापरल्याने हॉटेल सारखी चव येते.
  • चीज किसून घातले तर चीजी अशी भाजी तयार होते.जी घरातील लहान मुलांना सुद्धा नक्की आवडेल.

    अशा प्रकारे तयार होणारा व्हेज खीमा नॉनव्हेज खवय्यांना सुद्धा नक्की आवडेल. या कडाक्याच्या थंडीत दुपारचे जेवण किंवा रात्रीच्या डिनर साठी नक्की ही भाजी करा आणि आपल्या घरातल्यांचे मन जिंकण्याचा प्रयत्न करा.आणि हो..वाढदिवस किंवा पार्टीसाठी सुद्धा ही नवीन रेसिपी नक्की करून पहा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी रेसिपीच्या शेवटी दिलेल्या फॉलो या ऑप्शनवर क्लिक करा 👍🏻

धन्यवाद 🙏

श्री स्वामी समर्थ



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या