Sambar vadi recipe in marathi | कोथिंबीर वडी
Aajcha bet च्या"ओळख विदर्भातील पदार्थांची" या लेखमालेत आज मी खमंग, खुसखुशीत अशी विदर्भाची खासियत असलेली सांबार वडी/पुडाची वडी म्हणजेच कोथिंबीर वडी कशी करायची याची कृती सांगणार आहे.
विदर्भात कोथिंबीरीला सांबार असे म्हणतात. आणि या कोथिंबीरीपासून बनवलेल्या वडीला सांबर वडी असे म्हणतात.नागपूर,अमरावती कडे बऱ्याचशा हॉटेलमध्ये मिळणारा हा पदार्थ अनेक खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवणारा आहे. कोथिंबिरी शिवाय कुठलाही पदार्थ अपूर्णच असतो.हिरवीगार अशी कोथिंबीर पदार्थांची शोभा तर वाढवतेच पण औषधी गुणधर्मांनी युक्त अशी असते.कोथिंबीर वडी बहुतेक सर्वांनाच आवडते.असाच एक भरपूर कोथिंबीर वापरून केलेला पदार्थ म्हणजेच विदर्भ स्पेशल सांबर वडी होय.अगदी विदर्भात मिळते तशी खमंग, खुसखुशीत अशी सांबारवडी Sambar vadi recipe सोप्या आणि पारंपारिक पद्धतीने कशी करायची याची सोपी कृती या लेखामध्ये दिली आहे.
![]() |
| खमंग आणि कुरकुरीत सांबार वडी रेसिपी |
सांबार वडी/पुडाची वडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य :-
आवरणासाठी (कव्हरसाठी) -
१ वाटी बेसन पीठ
१/२ वाटी मैदा
१ चमचा लाल तिखट/मिरची पावडर
१/२ चमचा हळद
१/२ चमचा ओवा
२ चमचे तेल (कडकडीत गरम केलेले)
मीठ चवीनुसार
पाणी गरजेनुसार
टीप - पारंपारिक विदर्भी पद्धतीत बेसनाचे प्रमाण जास्त असते
.
सारणासाठी -
२ वाट्या बारीक चिरलेली कोथिंबीर
१ चमचा जिरे
१ चमचा लसूण पेस्ट
१ चमचा बडीशेप
पाव चमचा हिंग
२ चमचे खसखस
३ चमचे सुके खोबरे किसून
१ चमचा धने पूड
१ चमचा जिरे पूड
१/२ चमचा आमचूर पावडर
१/२ चमचा साखर
पाव कप भाजलेल्या दाण्याचा जाडसर कूट
मीठ व तेल
सांबार वडी/पुडाची वडी बनवण्याची कृती :-
आवरणाचे पीठ भिजवणे -
सर्वप्रथम सांबारवडीचे आवरण/कव्हर करण्यासाठी लागणारे पीठ भिजवून घेऊ. त्यासाठी एक कप बेसन पीठ व अर्धा कप मैदा परातीत घ्या.वरचे आवरण समोशा सारखे कुरकुरीत हवे असल्यास एक कप मैदा व अर्धा कप बेसन सुद्धा वापरू शकता.परंतु पारंपारिक पद्धतीने सांबार वडी बनवताना बेसनाचे प्रमाण अधिक असते.या पिठांमध्ये चवीनुसार मीठ, मिरची पावडर, हळद,ओवा हातावर चोळून घाला.२ चमचे तेल कडकडीत गरम करून मिश्रणात घाला.चमच्याच्या सहाय्याने सर्व मिश्रण मिसळून घ्या.नंतर हाताचा वापर करून मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यावे.म्हणजे तेल सर्व पिठाला लागले जाईल.थोडे थोडे पाणी घालून घट्टसर पीठ भिजवून घ्या.थोडं तेल लावून पीठ अर्ध्या तासासाठी झाकून ठेवावे.
सांबार वडीचे सारण तयार करणे -
आता वडीसाठी लागणारे सारण बनवून घेऊ. त्यासाठी कोथिंबीर निवडून,स्वच्छ धुऊन निथळून घ्यावी.कापडावर पसरवून फॅन खाली २/३ तासांसाठी सुकवून घ्यावी.नंतर बारीक चिरून घ्यावी.ही स्टेप खूप महत्वाची आहे.त्यामुळे वडी ओलसर होत नाही.
एका पसरट पॅनमध्ये १ चमचा तेल घालून घ्या.जास्त तेल वापरू नये.नाहीतर सारण तेलकट होईल.त्यात जिरे, लसूण पेस्ट, बडीशेप, हिंग घालून व्यवस्थित परतून घ्या. मंद आचेवर छान परतून घ्यावे.खसखस, सुके खोबरे किसलेले घालून एक- दोन मिनिटांसाठी परतून घ्या.मीठ, जिरे पूड,धने पूड, मिरची पावडर, हळद,आमचूर पावडर, साखर घालून मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यावे.पाव कप भाजलेल्या दाण्यांचा जाडसर कूट घालून पुन्हा एकदा परतून घ्या. सुकवून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून दोन-तीन मिनिटे परतून घ्या.कोथिंबीर मऊ झाली की, गॅस लगेच बंद करा.कोथिंबीर जास्त शिजवू नये. सांबारवडीचे सारण तयार आहे.हे सारण थंड करण्यासाठी ठेवा.
सांबार वडी तयार करणे -
पिठाचा गोळा पुन्हा एकदा छान मळून घ्या. या पिठामध्ये तेल घातल्यामुळे छान नॉनस्टिकी असा गोळा तयार होतो.म्हणजेच लाटताना पीठाचा वापर न करता पारी लाटता येते. छोटे छोटे गोळे करून घ्यावेत.एक गोळा घेऊन अंडाकृती आकाराची पारी लाटून घ्यावी.पुरीपेक्षा थोड्या मोठ्या आकारात पोळीच्या जाडीची पारी असावी.त्यावर मधोमध सारण घाला.एका बाजूने कडा उचलून घडी घालावी.हलकेसे दाबून दुसऱ्या बाजूला कडेला बोटाने थोडेसे पाणी लावावे. व ती बाजू सुद्धा मधोमध घेऊन हलकेसे दाबावी. उरलेल्या दोन बाजूंना सुद्धा पाण्याचा हात लावून मधोमध घेऊन पॉकेट सारखा आकार होईल अशा पद्धतीने हलकेसे दाबून वडी तयार करून घ्यावी.तेलात सारण सुटणार नाही याची काळजी घ्यावी.अशा पद्धतीने सर्व वड्या करून घ्या. वड्या करून झाल्या की, त्यावर ओलसर कपडा घालून घ्या.म्हणजे तळेपर्यंत आवरण कडक होणार नाही.
तळणे -
कढईत तेल कडकडीत गरम करून घ्या. मध्यम आचेवर सांबार वडी छान गुलाबी रंगावर खरपूस तळून घ्यावी.सर्व वड्या खरपूस अशा तळून घ्या
सर्व्हिंग सूचना -
खायला देताना सांबार वडी फोडणीच्या ताकासोबत गरमागरम वाढावी.(या फोडणीच्या ताकाची रेसिपी सुद्धा या आधी आलू बोंडा या रेसिपीच्या लेखामध्ये दिलेली आहे.हा लेख सुद्धा आवर्जून नक्की वाचा.)
काही सुगरण टिप्स -
- कोथिंबीर पूर्ण सुकवून घेणे महत्वाचे आहे.
- सारण खूप तेलकट नसावे.
- वड्या करताना कडा नीट बंद करून घ्या,
- वड्या मध्यम आचेवरच तळा.
हे ही वाचा :- आलूबोंडा रेसिपी
अशाप्रकारे विदर्भातील प्रसिद्ध अशी डिश सांबार वडी एकदा नक्की बनवून पहा.आणि आवडली तर आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा..खमंग आणि कुरकुरीत अशी ही वडी घरातील छोट्या समारंभासाठी,पार्टीसाठी अगदी उत्तम असा स्नॅक्स साठी पर्याय ठरू शकतो.विदर्भातील अशाच पारंपारिक रेसिपी या रेसिपी ब्लॉगवर आहेत.त्या पाहण्यासाठी माझ्या आजचा बेत या रेसिपी ब्लॉगला नक्की फॉलो करा आणि त्यासाठी शेवटी दिलेल्या Follow ऑप्शन वर क्लिक करा.👍🏻🙏
धन्यवाद 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏

0 टिप्पण्या