Kadhi Gole recipe / कढी गोळे
Aajcha bet recipes च्या "ओळख विदर्भातील पदार्थांची" या लेखमालेत आज विदर्भात बनवली जाणारी पारंपारिक कढी गोळ्यांची रेसिपी सोप्या पद्धतीने कशी करायची याची सोपी कृती पाहूया.
बऱ्याचदा रोजच्या स्वयंपाकासाठी भाजी पोळी बनवण्याचा कंटाळा येतो,किंवा दुपारच्या जेवणात काहीतरी हेल्दी आणि पोटभरीचा मेन्यू काय बनवायचं असा प्रश्न बऱ्याच माझ्या मैत्रिणींना पडतो.अशावेळी बऱ्याच घरात पारंपारिक पद्धतीने बनवलेली कढी आणि गरमागरम भात किंवा मुगाच्या डाळीची खिचडी आणि कढी सोबत उडदाचा पापड, लोणचे..😋😋 असा साधा पण पौष्टिक बेत केला जातो. बऱ्याचदा कढी सोबत भजी किंवा पकोडे केले जातात.विदर्भामध्ये बेसनाची भजी न करता तूरडाळ किंवा चणाडाळ भिजवून त्यापासून गोळे करून ते उकळत्या ताकाच्या कढीत सोडले जातात. आपल्या महाराष्ट्रात दर दोन कोसावर भाषा बदलते तसेच एखादा पदार्थ बनवण्याची पद्धत सुद्धा वेगळी असते.पदार्थ तोच असतो पण त्यात वापरले जाणारे काही घटक भागापरत्वे वेगळे असतात.असाच एक पदार्थ म्हणजे कढी गोळे..
विदर्भात कढी गोळे बनवताना चणाडाळ, तुरीची डाळ, किंवा हिवाळ्यामध्ये मिळणाऱ्या तुरीच्या हिरव्या दाण्यांचा सुद्धा वापर केला जातो. अत्यंत पौष्टिक अशी ही रेसिपी आहे.कढी गोळे तुम्ही कुठल्याही ऋतूमध्ये बनवू शकता.चला तर मग कढी गोळ्यांची सोपी कृती पाहूया.ही रेसिपी मी ओल्या तुरीच्या दाण्यांपासून बनवली आहे. तुरीच्या शेंगा मिळाल्या नाहीत तर त्याऐवजी चनाडाळ आणि तूरडाळ सम प्रमाणात वापरू शकता..चला तर मग
Kadhi Gole recipe पाहूया.
कढी गोळे बनवण्यासाठी लागणारे साहित्य :-
- सर्वप्रथम थोड्या तेलात जिरे, मिरच्या,लसूण, आल्याचे काप, कढीपत्त्याची पाने आणि तुरीचे दाणे घालून ३/४ मिनिटांसाठी परतून घ्या. जास्त वेळ परतू नये. नाहीतर गोळे कडक होतात.थोडी कोथिंबीर, धणेपूड घालून मिश्रण व्यवस्थित परतून घ्यावे.मिश्रण थंड झाले की, थोडे मीठ घालून मिक्सरवर वाटून घ्यावे.फार बारीक वाटू नये.किंवा पाण्याचा वापर सुद्धा करू नये. दाण्याची ही पेस्ट एका भांड्यात घेऊन त्यात एक- दोन चमचे बेसन घालून मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यावे.गोळे होतील इतपत बेसन पीठ घाला.नाहीतर गोळे कडक होतात. हे मिश्रण बाजूला ठेवून द्यावे.चना डाळ किंवा तूरडाळ वापरून गोळे बनवताना डाळी भिजवून मग त्याची पेस्ट करावी.अशी डाळ गोळे बनवण्यासाठी वापरावी.
- आता कढी करण्यासाठी एका पातेल्यात २ वाट्या ताक घेऊन त्यात १ चमचा बेसन पीठ घालून मिश्रण व्यवस्थित फेटावे.ताक नसेल तर १ वाटी दही व १ वाटी पाणी फेटून वापरावे.
- कढी करण्यासाठी एका भांड्यात २ चमचे तेल/तूप घालून त्यात मोहरी, जिरे, आले लसूण पेस्ट, कढीपत्त्याची पाने, हिंग घालून फोडणी करावी.हळद व धणे पूड घालून परतून घ्यावे. फेटलेल्या ताकाचे मिश्रण घालून घ्या.मिश्रण सतत ढवळत उकळी येईपर्यंत कढी शिजवा. गरजेनुसार पाणी वाढवू शकता.कारण गोळे शिजण्यासाठी कढी पातळ असली तरी चालते.
- उकळत्या कढीत तुरीच्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे हाताला तेल लावून करून सोडावेत.कढी चांगली उकळल्यावरच गोळे घालावेत.म्हणजे गोळे कढीत सोडल्यावर फुटणार नाहीत.१०/१२ मिनिटे तरी कढी छान उकळून घ्यावी.गोळे शिजले की वर येऊ लागतात.म्हणजे कढी तयार आहे असे समजावे.चवीनुसार मीठ घालावे.
- खायला घेताना तयार कढीला पुन्हा एकदा फोडणी करावी. त्यासाठी एक चमचा तेलात कढीपत्ता, लाल मिरच्या, मिरची पावडर घालून खमंग फोडणी करून घ्या.व ही फोडणी कढीवर घालावी.वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून खाण्यासाठी घ्यावी.ही कढी भात किंवा पोळी सोबत छान लागते.
कढी खाण्याचे फायदे :-
- उन्हाळ्यात भूक मंदावते.बऱ्याचदा काही खाण्याची इच्छा नसेल तेव्हा कढी पिणे चांगले. त्यामुळे भूक चांगली लागते.
- बऱ्याचदा गॅसेसचा त्रास होतो.अशावेळी कढी खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते.
- मायग्रेनचा त्रास किंवा डोकेदुखी असेल तेव्हा जेवणामध्ये कढीचा वापर करू शकता.
- ताकाच्या कढीचा आहारात समावेश केल्यास त्वचा व केसांचे आरोग्य सुधारते.
- लोह व प्रोटीन असल्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते.
- गरोदर स्त्रियांनी आहारात घेतल्यास फोलिएट,लोह,बी ६ जीवनसत्व या घटकांचे प्रमाण वाढते.त्यामुळे बाळाच्या वाढीसाठी फायदा होतो.
- भातासोबत कढी खाल्ल्याने अमिनो ऍसिड ची निर्मिती होते.म्हणून आयुर्वेदानुसार कढी भात खाणे फायदेशीर ठरते.
- डाएट करणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय आहे.
ही रेसीपी सुद्धा करून पहा :- सांबार वडी
विदर्भ पद्धतीने बनवलेले Kadhi Gole recipe नक्की करून पहा.दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात करण्यासाठी उत्तम पौष्टिक असा पर्याय आहे. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या आजचा बेत या रेसिपी ब्लॉगला नक्की फॉलो करा.🙏 त्यासाठी शेवटी दिलेल्या Follow या ऑप्शनवर क्लिक करा 👍🏻

0 टिप्पण्या