आजचा बेत रेसिपीच्या या लेखामध्ये आपण घरीच चक्का बनवून पारंपारिक पद्धतीने श्रीखंड कसे बनवायचे ते सविस्तर पाहणार आहोत.Shrikhand Recipe in Marathi ही महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय आणि सणासुदीला हमखास केली जाणारी गोड रेसिपी आहे.
मराठी नववर्षाची सुरुवात चैत्र महिन्यापासून होते आणि या महिन्यात येणारा पहिला सण म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडव्याला गुढी उभारून, गोडाधोडाचे जेवण करून हा सण आनंदाने साजरा केला जातो. फार पूर्वीपासून गुढीपाडवा आणि श्रीखंड-पुरी / पुरणपोळी हे अतूट समीकरण मानले जाते.आजकाल वेळेअभावी अनेकजण रेडीमेड श्रीखंड किंवा चक्का वापरतात. पण पारंपारिक पद्धतीने दुधापासून दही, दह्यापासून चक्का आणि चक्क्यापासून श्रीखंड बनवले तर त्याची चव आणि सुगंध खूपच अप्रतिम लागतो.
हीच पारंपारिक आणि सोपी Maharashtrian Style Shrikhand Recipe आज आपण पाहणार आहोत.

घरच्या घरी बनवलेले पारंपरिक श्रीखंड -सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी
चक्क्यासाठी दही कसे लावावे

साहित्य :-
- १ लीटर म्हशीचे ताजे फुल क्रीम दूध
- २ चमचे घट्ट दही (विरजणासाठी)
कृती :-
- एका पातेल्यात दूध घेऊन चांगली उकळी येईपर्यंत गरम करा.
- दूध फेसाळ होईपर्यंत फेटून घ्या व कोमट होईपर्यंत थंड होऊ द्या.
- दूध जास्त गरम नसावे, अन्यथा दही नीट जमत नाही.
- कोमट दूध पसरट भांड्यात ओतून त्यात विरजण घालून नीट मिसळा.
- झाकण लावून ७–८ तास झाकून ठेवा.
- दही घट्ट जमल्यानंतर ते वापरण्यास तयार होते.
दह्यापासून चक्का कसा तयार करायचा
साहित्य :-
- १ लिटर घरगुती घट्ट दही
- सुती कापड / रुमाल
कृती :-
- गाळणीवर सुती कापड पसरवून त्यावर दही ओता.
- कापडाच्या चारही बाजू उचलून दह्यातील पाणी दाबून काढा.
- गाठ बांधून वजन ठेवून किंवा नळाला बांधून ठेवा.
- ७–८ तासांत घट्ट चक्का तयार होतो.
- १ लिटर दह्यापासून साधारण ४०० ग्रॅम चक्का मिळतो.
चक्क्यापासून श्रीखंड कसे बनवायचे
साहित्य :-
- ४०० ग्रॅम घरगुती चक्का
- १५० ते ३०० ग्रॅम पिठीसाखर (आवडीनुसार)
- १ चमचा वेलची-जायफळ पूड
- २ चमचे कोमट दुधात भिजवलेले केशर
- बदाम-पिस्त्याचे काप (आवडीनुसार)
कृती :-
- एका भांड्यात चक्का घेऊन चांगला फेटून घ्या.
- पिठीसाखर घालून मिश्रण एकजीव करा.
- वेलची-जायफळ पूड आणि केशरयुक्त दूध घाला.
- श्रीखंड खूप घट्ट वाटल्यास थोडे दूध मिसळा.
- बदाम-पिस्त्याचे काप घालून श्रीखंड फ्रीजमध्ये थंड करा.
- तयार श्रीखंड गरमागरम पुरीसोबत सर्व्ह करा.
श्रीखंड बनवताना उपयुक्त टिप्स :-
- घट्ट दही वापरल्यास श्रीखंड मऊ लागते,
- घरगुती चक्का आंबट नसतो, त्यामुळे साखर कमी लागते.
- केशरामुळे श्रीखंडाला सुंदर रंग आणि स्वाद येतो.
0 टिप्पण्या