गुलाबजाम रेसिपी मराठी | Gulabjamun recipe
'आजचा बेत' Aajcha bet च्या या लेखामध्ये आज सर्वांच्या आवडीचा गोड पदार्थ म्हणजेच पाकात मुरलेले रसरशीत असे पारंपारिक पद्धतीने बनवलेले खव्याचे गुलाबजाम रेसिपी मराठी घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसे तयार करायचे याची सोपी कृती मी देत आहे.
लग्न,वाढदिवस,वास्तुशांती,मुंज,पार्टी... असा कुठलाही आनंदाचा क्षण असो आणि त्याच्या मेन्यूध्ये गुलाबजामला मानाचे स्थान असतेच असते.. दुसरा कोणताही गोडाचा पदार्थ असला तरीही गुलाबजामचा घास भरवल्याशिवाय कार्यक्रमाला मजाच नाही.काहीवेळा तर गुलाबजाम खाण्याची चढाओढ सुद्धा लागते..
आपल्याकडे चितळे बंधू, काका हलवाई अशा मोठ मोठ्या हलवायांकडचे गुलाबजाम फार प्रसिद्ध आहेत.बऱ्याचदा सणासुदीच्या काळात किंवा पाहुणे घरी आले की,हे विकतचे गुलाबजाम घरी आणले जातात.आजकाल बाजारात गुलाबजामचे प्रिमिक्स सुद्धा विकत मिळते. त्यापासून अगदी झटपट गुलाबजाम केले जातात. रव्याचे,ब्रेडचे,पनीरचे अशा वेगवेगळ्या प्रकारचे गुलाबजाम सुद्धा बनवले जातात.परंतु खव्याचे गुलाबजाम अप्रतिम चवीचे लागतात.पारंपारिक पद्धतीने खव्याचे गुलाबजाम करणे प्रत्येकाला जमत नाही.त्यात मैद्याचे प्रमाण कमी अधिक झाले किंवा खायचा सोडा किंवा बेकिंग पावडरचे प्रमाण जरा जरी चुकले तरी सर्व मेहनत फुकट जाते.गुलाबजाम तळताना घ्यायची योग्य काळजी आणि योग्य प्रमाणात सर्व जिन्नस वापरून चविष्ट आणि रसरशीत गुलाबजाम कसे करायचे Khoya Gulabjamun recipe या लेखांमध्ये दिलेली आहे.
गुलाबजाम बनवण्यासाठी लागणारे साहित्य:-
- बाजारातून ताजा खवा विकत आणावा. मिळाल्यास गुलाबजाम साठी खास विशिष्ट प्रकारचा खवा बाजारात मिळतो.तो रवाळ असा असतो.खवा परातीत घेऊन छान मळून घ्यावा. त्यातील गाठी मोडण्यासाठी पुरणाच्या जाळीवर गाळून घेतला तरी चालेल.पाच दहा मिनिटे तरी तो छान मळून घ्या.म्हणजे मऊसूत असा गोळा तयार होईल.त्यात दिलेल्या प्रमाणात मैदा थोडा थोडा घालून मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यावे.चवीसाठी थोडीशी वेलची पूड व किंचित मीठ घालावे.खवा पातळ नसेल तर मैद्याचे प्रमाण कमी लागते.म्हणजेच गरजेनुसार मैदा मिसळावा.
- तयार गोळा दहा पंधरा मिनिटांसाठी झाकून ठेवावा.एकीकडे पाक तयार करण्यासाठी पातेल्यात दीड वाटी साखर आणि त्याच्या निम्मे म्हणजेच पाऊण वाटी साखर घालून पाक तयार करायला ठेवा.पाक जास्त गोड आवडत नसेल तर साखरेच्या बरोबरीने पाणी घेऊन पाक तयार करा.साखर विरघळली की,दोन-तीन मिनिटं सतत ढवळत राहावे.गुलाबजाम साठी लागणारा पाक हा गोळीबंद किंवा एकतारी नसतो.पाक बोटांवर घेतल्यावर साधारण चिकटपणा जाणवू लागल्यास पाक तयार झाला असे समजावे.
- या पाकात वेलची पूड.केशर आणि आवडत असल्यास रोज इसेन्स घालावे.पाक झाकून ठेवावा.
- तयार पीठ पुन्हा एकदा छान मळून घ्यावे. एकसारखे छोटे छोटे गोळे करून घ्यावेत.दोन्ही हातांच्या तळव्यावर पीठ घेऊन छान रगडून दाब देऊन गोळे करून घ्यावेत.गोळ्यांना अजिबात चीर पडणार नाही याची काळजी घ्यावी.नाहीतर तेलात टाकल्यावर गुलाबजाम फुटतात.
- गुलाबजाम तळण्यासाठी कढईत तेल तापायला ठेवा.तळण्यासाठी शक्यतो खोलगट कढईचाच वापर करा.पसरट भांडे असल्यास तळाला गुलाबजाम चिकटतात.तेल जास्त तापवू नये.तेलात गुलाबजाम सोडल्यावर लगेच वर तरंगला तर तेल जास्त तापले असे समजावे. गोळा तळाला जाऊन बुडबुडे येऊन काही सेकंदांनी वर आला पाहिजे.म्हणजे योग्य प्रमाणात तेलाचे तापमान आहे असे समजावे. अशा तेलात गुलाबजाम थोडे थोडे सोडून दोन-तीन मिनिटं तरी झारा न लावता बाजूने तेल उडवत सर्व बाजूंनी एकसारखे गोळे सोनेरी रंगावर तळून घ्यावे.गॅसची आच मध्यम असावी. म्हणजे गुलाबजाम व्यवस्थित आतपर्यंत तळले जातात. गुलाबजामची एक बॅच तळून झाली की, हलक्या गरम पाकात घालावेत.पुन्हा दुसरी बॅच अशा पद्धतीने तळून पुन्हा तीच प्रोसेस करावी.
- गुलाबजाम पाकात टाकल्यावर वरून गरम केलेले एक दोन चमचे तूप घातल्यास तुपाची चव येते व अगदी तुपात तळलेले गुलाबजाम आहेत असं वाटतं.ही छोटीशी टीप आहे. नक्की करून पहा..👍🏻
- गुलाबजाम पाच-सहा तास किंवा रात्रभर मुरवत ठेवावे.म्हणजे पाक आतपर्यंत मुरला जातो.दुसऱ्या दिवशी गुलाबजाम खायचे असतील तर आदल्या दिवशीच तयार करून ठेवावेत.गुलाबजाम हे आठवडाभर फ्रिज शिवाय राहतात.फ्रिज मध्ये ठेवल्यास महिनाभर तरी टिकतात.
काही सुगरण टिप्स :-
- खवा शक्यतो ताजा वापरावा.गुलाबजाम साठी स्पेशल खवा मिळतो.तो मिळाला तर उत्तमच.
- खव्याच्या घट्टपणावर मैद्याचे प्रमाण ठरवावे. मैदा नको असल्यास रवा किंवा गव्हाचे पीठ सुद्धा वापरू शकता.परंतु हे गुलाबजाम मुरण्यासाठी वेळ थोडा अधिक लागतो.मैद्याचे प्रमाण अधिक झाल्यास गुलाबजाम कडक होतात.आणि कमी झाले तर मऊ पडतात किंवा तेलात फुटतात.
- तळताना तेल जास्त गरम नसावे.गुलाबजामचा रंग डार्क होतो.पण आतून कच्चा असलेला गुलाबजाम पाकात मुरत नाही.म्हणून तेलाचे तापमान महत्त्वाचे आहे.
- साखरेचा पाक जास्त घट्ट असू नये. नाहीतर गुलाबजाम पाकात मुरत नाहीत.किंवा पाण्यासारखा पातळ सुद्धा पाक असल्यास गुलाबजाम विरघळतात.
- तळण्यासाठी लागणारे तेल हे उग्र वासाचे नसावे.शक्यतो सूर्यफूल,सोयाबीन या तेलामध्ये गुलाबजाम तळावेत.आवडत असल्यास तुपाचा वापर केला तरी चालेल.
- पिठामध्ये बेकिंग पावडर किंवा सोडा वापरायचा असल्यास अगदी किंचित वापरावा. जास्त झाला तर गुलाबजाम फुटतात.नाही वापरला तरी चालते.
- खायला घेताना ड्रायफ्रूटचे काप सुद्धा घालू शकता.
अशा पद्धतीने तयार केलेले गुलाबजाम घरातील सर्वांनाच आवडतील आणि मार्केट सारखे गुलाबजाम घरच्या घरी केल्याचा आनंद मिळेल. वर दिलेल्या सर्व टिप्सचा वापर करून गुलाबजाम नक्की करून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा.
गुलाबजामचा पाक उरल्यास त्यात रवा भाजून घालून छान रवा तयार होतो. तुम्ही या पाकाचे काय करता? ते मला कमेंट करून नक्की सांगा ...👍🏻 अशाच रेसिपी पाहण्यासाठी माझ्या आजचा बेत या रेसिपी ब्लॉगला नक्की फॉलो करा आणि त्यासाठी शेवटी दिलेल्या Follow या ऑप्शन वर क्लिक करा.. धन्यवाद 👍🏻🙏

0 टिप्पण्या