ज्वारीच्या लाहया / Jwarichya lahya recipe in marathi
Aajcha bet recipes च्या या लेखामध्ये पौष्टिक अशा ज्वारीच्या लाहया कशा बनवतात ते पाहूया. भारतीय संस्कृती आणि सण यामागे आरोग्यशास्त्र आहे.म्हणूनच प्रत्येक सणाचा नैवेद्य हा ऋतु व आरोग्याच्या दृष्टीने केला जातो.असाच एक विस्मृतीत चाललेला प्रकार म्हणजे ज्वारीच्या लाहया (Jwarichya lahya recipe in marathi) नागपंचमी,दहीहंडी या सणांच्या वेळी बाजारात विकत मिळणार्या लाहया पूर्वी घरीच केल्या जायच्या.हल्लीच्या नवीन पिढीला ज्वारीच्या लाहया आणि नागपंचमी हे समीकरण माहीत असण्याची शक्यता कमी आहे. पूर्वी अगदी बाळगोपाळ आणि वयस्कर मंडळींना आवडणारा हा गावरान मेवा नैवेद्य म्हणून सुद्धा हल्ली कोणाला खायला आवडत नाही. यावर्षी मी सुद्धा या लाहया विकत न आणता घरीच केल्या.त्या निमित्ताने लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.माझी आई या लाहया भरपूर बनवून ठेवायची.चला तर मग अशा या पौष्टिक ज्वारीच्या लाहया कशा बनवतात व त्यांचे फायदे काय आहेत ते पाहूया.
![]() |
ज्वारीच्या लाहया तयार करण्यासाठी लागणारे साहित्य :-
१ वाटी ज्वारी
४ वाट्या पाणी
मीठ
बाजारातून चांगल्या प्रतीची ज्वारी शक्यतो मोठ्या दाण्याची विकत आणावी.ती निवडून घ्या.स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी.एका मोठ्या भांड्यात ४/५ वाट्या पाणी उकळत ठेवा. पाण्याला उकळी आली की, धुतलेली ज्वारी घालून सतत ढवळत रहा.उकळल्याने ज्वारीचा दाणा फुगतो.२/३ मिनिटांनी गॅस बंद करा. व भांडे झाकून ठेवा. साधारण १५ मिनिटांनी वाफवलेली ज्वारी चाळणीवर निथळत ठेवा. नंतर एका स्वच्छ सूती कापडावर ८/९ तासांसाठी फॅनखाली हवेला कडक वाळवून घ्या.उन्हात नाही ठेवली तरी चालेल.
ज्वारीचा ओलावा राहणार नाही याची काळजी घ्या.नाहीतर लाह्या करताना सर्व लाह्या फुलणार नाहीत. लाहया करण्यासाठी पूर्वी मोठी लोखंडी कढई वापरायचे.एका काठीला कपडा बांधून सतत हलवत या लाहया केल्या जायच्या.पण आता फ्राय पॅनमध्ये करू शकता. पॅन चांगला गरम करा.मूठभर दाणे घाला.मध्यम आचेवर पॅन हलवत रहा.२/३ मिनिटांनी लाहया फुलू लागल्या की, पॅनवर झाकण ठेवा. म्हणजे त्या बाहेर उडणार नाहीत. सर्व लाहया एकसारख्या भाजण्यासाठी पॅन हलवत रहा.सर्व तयार झाल्यावर परातीत काढून घ्या.अशा थोड्या थोड्या लाहया करून घ्या.थंड झाल्या की, डब्यात भरून ठेवा.या लाहया गरम असताना छान लागतात.
ज्वारीच्या लाह्या एक सुपरफुड :-
ज्वारीच्या लाह्या हे भर्जीत अन्न आहे. भाजल्यामुळे पाण्याचा अंश निघून जातो. पचायला हलके होते. यांच्या सेवनामुळे कफ व पित्ताचा नाश होतो. ज्वारी ही रुक्ष परंतु पचायला हलकी आहे. पावसाळ्यात हवेत दमटपणा असतो. सर्दी, खोकल्यासारखे आजार होतात. इम्युनिटी खालावते. जंतुसंसर्ग वाढतो. कफ वाढतो. शरीरातील अग्नि मंद होतो. म्हणजेच अपचन होते. म्हणूनच अशावेळी ज्वारीच्या लाह्या खाणे ही कल्पक योजना आहे. श्रावणात उपवास सुद्धा असतात. अशावेळी लंघन केले जाते. म्हणजेच कमी आणि हलका आहार घेतात. वारंवार होणारे आम्लपित्त, ऍसिडिटी, वाढलेले वजन, कोलेस्ट्रोल, शुगर, त्वचा विकार यासाठी ज्वारीच्या लाह्या हे उत्तम सुपर फूड आहे. शरीराची कार्यक्षमता चांगली होण्यासाठी चांगला डाएट प्लॅन आहे.या लाह्या सकाळी, मधल्या वेळेत कधीही कितीही खाऊ शकता. लहान मुलांमध्ये सतत कफदोष वाढत असतो. म्हणून त्यांना आवर्जून खाण्यासाठी द्या. महागडे कॉर्न फ्लेक्स खाण्यापेक्षा पारंपारिक असणारा हा खाऊ हेल्दी आणि चांगला स्वस्त ऑप्शन आहे. जाहिरात बाजी मुळे शरीराला घातक असणारे खाद्यपदार्थ विकत घेतले जातात. परंतु पारंपारिक भारतीय पदार्थांची जाहिरात न झाल्यामुळे ते विस्मृतीत जाऊ लागले आहेत. परंतु हळूहळू लोक पुन्हा या खाद्यसंस्कृतीकडे वळत आहेत.
१)ज्वारीच्या लाह्यांमध्ये प्रथिने, फायबर, खनिजे आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात. हे पचनासाठी उपयुक्त असते आणि वजन कमी करण्यास मदत करते.
२)ज्वारीमध्ये ग्लूटेन नसल्यामुळे ती ग्लूटेन-फ्री आहारासाठी योग्य आहे. तसेच, ज्वारीचे दाणे कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले असल्यामुळे ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगले आहे.
३)लहान मुले,वयस्कर व्यक्ती,गरोदर महिला किंवा कुपोषित मुलांचे पोषण होण्यासाठी शारीरिक ताकत भरून येण्यासाठी या लाहया खाणे फायदेशीर ठरेल.
काही सुगरण टिप्स :-
1. ज्वारी वाफवल्यानंतर ती पूर्णपणे सुकवणे आवश्यक आहे,अन्यथा लाह्या फुलणार नाही.
2. जर तुम्हाला हळद किंवा तिखट नको असेल तर तुम्ही फक्त मीठ घालून पॉपकॉर्न बनवू शकता.
3. जाड बुडाची कढई किंवा पॅन वापरणे महत्त्वाचे आहे. कारण पातळ बुडाच्या कढईत लाह्या फुलताना दाणे करपण्याची शक्यता असते.
ज्वारीचा लाह्या हा पारंपारिकद्धतीने तयार केलेला एक आरोग्यदायी आणि स्वादिष्ट पर्याय आहे. तो सहज तयार होतो आणि तुम्हाला हवे असेल तेव्हा खाण्यासाठी उपलब्ध असतो. त्यामुळे आता याचं महत्त्व लक्षात घेऊन, तुम्हीही तुमच्या घरच्या मंडळींसाठी हा पौष्टिक स्नॅक करून पहा आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणा. रेसिपी आवडली तर नक्कीच बनवून पहा आणि आपल्या मित्र-मैत्रिणीं सोबत शेअर करा.
धन्यवाद 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏

0 टिप्पण्या