Eggless Mawa Cake recipe

 Eggless Mawa Cake recipe

    Aajcha bet recipes च्या या लेखामध्ये शिल्लक राहिलेल्या मावा ,पेढे किवा बर्फीपासून इराणी कॅफे /पार्सी बेकरी मध्ये मिळतो तसा मावा केक अंडी न वापरता कसा करायचा याची रेसीपी दिली आहे. 

    नुकताच गणेशोत्सव साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने बरीचशी पाहुणे मंडळी दर्शनासाठी घरी येतात. येताना प्रसादासाठी म्हणून मोदक,पेढे, बर्फी असे अनेक मिठाईचे प्रकार आणतात. परंतु रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळा येतो. मग फ्रीजमध्ये या वस्तू साठवून राहतात. आणि तयार होते अशी भन्नाट रेसिपी... अशाच शिल्लक राहिलेल्या मिठाई पासून मला सुचलेला नवीन आणि कमी गोड असा पदार्थ म्हणजे बेकरी स्टाईल बिना अंड्याचा मावा केक. चला तर मग ही केकची रेसिपी अगदी कमीत कमी साहित्य वापरून कुकरमध्ये सोप्या पद्धतीने कशी करायची ते पाहूया..


Eggless-Mawa-Cake-recipe
Eggless-Mawa-Cake-recipe 

मावा केक साठी लागणारे साहित्य :-

२०० ग्रॅम पेढे / उरलेली खव्याची मिठाई

१ वाटी दूध

दीड वाटी मैदा (२०० ग्रॅम)

पाव वाटी पिठीसाखर (५० ग्रॅम)

पाव वाटी तेल (५० मिली)

१ चमचा बेकिंग पावडर

१/२ चमचा बेकिंग सोडा

ड्रायफ्रूट चे काप आवडीनुसार

१/२ चमचा वेलची पावडर

१ चमचा विनेगर

ही रेसीपी सुद्धा नक्की करून पहा :- प्लम केक | Eggless Plum Cake recipe 

मावा केक करण्याची कृती :-

  1.  सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यात शिल्लक पेढे किंवा मिठाई कुस्करून घाला.
  2.  त्यात अर्धी वाटी दूध घालून मिक्सरमध्ये फिरवून एकजीव करून घ्या. दाटसर असे मिश्रण तयार होईल.
  3.  एका बाऊलमध्ये दूध व पेढ्यांचे हे पातळसर मिश्रण काढून घ्या. त्यात पाव वाटी तेल घालून मिश्रण एकजीव करा. नेहमीच्या केकमध्ये व्हॅनिला इसेन्स घातला जातो. परंतु यामध्ये वेलची पावडर घालणार आहोत. यामुळे केकची चव खूपच छान लागते.
  4. आता कोरडे मिश्रण तयार करून घेऊ. त्यासाठी दीड वाटी मैदा चाळणीवर घाला. त्यात पाव वाटी पिठीसाखर, एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून मिश्रण तीन चार वेळा मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यावे. असं केल्याने बेकिंग पावडर सर्व मिश्रणात मिक्स होते. आणि जाळीदार असा केक तयार होतो.
  5.  हे कोरडे मिश्रण हळूहळू ओल्या मिश्रणात घालून एकजीव करून घ्यायचे आहे. आवश्यक वाटल्यास उरलेले अर्धी वाटी दूध मिश्रणात घालून केकचे बॅटर तयार करून घ्यायचे आहे. स्पॅच्युलाच्या साह्याने व्यवस्थित मिश्रण एकजीव करून घ्या.
  6. केकसाठी आधीच भांडे तयार करून घ्या. बटर पेपर नसेल तर त्यासाठी भांड्याला तेलाचा हात लावून त्यावर मैदा भुरभुरून घ्या. एकीकडे कुकर मध्ये स्टॅन्ड ठेवून मध्यम गॅसवर झाकणाला शिट्टी न लावता कुकर गरम करायला ठेवा. ही सर्व तयारी आधीच करून ठेवा. व बॅटर तयार करा. तयार मिश्रण भांड्यात ओता. सजावटीसाठी वरून ड्रायफ्रूट चे काप घाला.लगेचच डबा गरम कुकर मध्ये ठेवून झाकण लावून ३० मिनिटासाठी केक बेक करून घ्या.
  7. तीस मिनिटानंतर कुकरचे झाकण उघडून पहा. मधोमध एक टूथपिक किंवा सुरी घालून केक व्यवस्थित शिजला आहे की नाही हे तपासा. सुरीला केकचे मिश्रण चिकटले असेल तर आणखी थोडा वेळ पाच मिनिटे तरी केक तसाच शिजवून घ्या. हे सर्व करताना गॅसची आच मंद असावी.
  8. केक बेक झाल्यानंतर गॅस बंद करून पाच मिनिटानंतर केकचे भांडे बाहेर काढून ठेवा. साधारण पंधरा-वीस मिनिटानंतर केक थंड होऊ लागला की, केक भांड्यातून अलगद बाजूला काढून थंड करून घ्या. तयार आहे बेकरी स्टाईल मावा केक. 

    हा केक कमी गोड असल्याने घरातील सर्वच जण खाऊ शकतात. चहा सोबत खाण्यासाठी सुद्धा योग्य पर्याय आहे. या केकमध्ये वेलची चा फ्लेवर खूपच छान लागतो. उरलेल्या मिठाई पासून असा केक केला तर नक्कीच घरातील सर्वांकडून कौतुक केले जाईल.

काही सुगरण टिप्स :-

  • उरलेले पेढे किंवा मिठाई नसली तर खवा किंवा मावा सुद्धा वापरू शकतो. किंवा मिल्क पावडर वापरून सुद्धा हा केक बनवता येतो.
  •  मिठाई गोड असल्यामुळे साखरेचा वापर जास्त करू नये. मिठाईच्या गोडपणावर ते ठरवा.
  • वेलची पूड व ड्रायफ्रूट चा वापर केल्याने अतिशय टेस्टी आणि शाही चव या केकला येते.
  •  हा केक अगदी पाच-सहा दिवस सुद्धा टिकतो. फ्रिजमध्ये घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवून खाऊ शकतो. पण  हा एवढा टेस्टी होतो की, शिल्लकच राहत नाही.

    चला तर मग अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी या ब्लॉगला नक्की फॉलो करा. त्यासाठी शेवटी दिलेला follow या ऑप्शन वर क्लिक करा. रेसिपी बनवून पहा आणि आपल्या मैत्रिणी सोबत नक्की शेअर करा.

धन्यवाद 🙏

श्री स्वामी समर्थ











टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या