केशरभात / Kesari bhaat recipe in marathi
Aajcha bet recipes च्या या लेखामध्ये पारंपरिक असा गोड पदार्थ जो शाही लग्नसमारंभातील विशेष थाळीत आवर्जून वाढला जातो.परंतु आजकाल विस्मरणात गेलेला असा हा केशरभात कसा करायचा याची रेसीपी देत आहे.केशर भात हा महाराष्ट्रीयन पारंपारिक गोड पदार्थ आहे, जो विशेषतः सण, उत्सव आणि शुभ प्रसंगी आवर्जून केला जातो. हा भात श्रीखंड किंवा पुरणपोळीच्या स्वयंपाकासोबत केलाच जातो.केशर भात म्हणजे सुगंधी तांदळाचा भात जो साखर, केशर,सुकामेवा,वापरून बनवतात.हा पदार्थ खूप जुना आहे आणि महाराष्ट्रीयन संस्कृतीत विशेष स्थान मिळवलेला आहे.महाराष्ट्रातील अनेक सणांमध्ये, विशेषतः गणेश चतुर्थी, दत्त जयंतीनिमित्त प्रसादासाठी म्हणून बनवला जातो.याच्या सुगंधाने आणि स्वादाने प्रत्येकाच्या मनात गोड आठवणी तयार होतात.पूर्वी फक्त शाही राजघराण्यात पंक्तीला वाढला जाणारा हा पदार्थ आजकाल मात्र काही विशेष प्रसंगीच करतात. केशराच्या सुगंधाने आणि त्याच्या सुंदर रंगाने हा भात केवळ डोळ्यांना आनंद देतोच, पण तोंडाला पाणी सुटेल अशी चवही देतो.चला तर मग हा चविष्ट Kesari bhaat recipe in marathi केशरभात कसा करायचा ते पाहूया..
![]() |
| केशरभात / Kesari bhaat recipe in marathi |
पारंपारिक महाराष्ट्रीयन केशरभात कसा बनवायचा?
- केसरी भातासाठी कोणताही जुना तांदूळ वापरू शकता. इथं मी बासमती तांदूळ वापरला आहे. तांदूळ स्वच्छ निवडून, धुऊन घ्या. अर्धा तास भिजवून तसाच ठेवा. म्हणजे अतिरिक्त स्टार्च निघून जाईल. व भात मोकळा होईल.
- एका पातेल्यात दोन वाट्या पाणी घालून ते गरम करून घ्या. किंवा एक कप पाणी आणि एक दूध असं प्रमाण घेऊन ते गरम करायला ठेवा. दुधामुळे भाताला छान चव येते. परंतु ते आवडीनुसार ठरवा.
- दुसऱ्या गॅसवर एका जाड बुडाच्या पातेल्यात दोन-तीन चमचे साजूक तूप घाला. तूप गरम झाले की, दोन-तीन लवंगा, छोटा दालचिनीचा तुकडा घालून परता. त्यामध्ये धुवून घेतलेला तांदूळ घालून तीन-चार मिनिटे व्यवस्थित तांदूळ परतून घ्या. असं केल्याने भात मोकळा होतो.
- यामध्ये गरम केलेले पाणी/ दूध पाण्याचे मिश्रण घालून व्यवस्थित ढवळून घ्या. थोडंसं मीठ, केशराच्या काड्या, सुकामेवा घालून पुन्हा एकदा ढवळून मिश्रणाला चांगली उकळी आली की, झाकून ठेवावे. पाच मिनिटानंतर भात शिजल्यावर त्यात साखर घालून पुन्हा एकदा मिश्रण व्यवस्थित परतून घ्यावे. साखरेला पाणी सुटल्या नंतर पुन्हा झाकण ठेवून भाताला एक वाफ काढावी. भाताला केशरी रंग येण्यासाठी आवडीनुसार खायचा रंग सुद्धा घालू शकता. वरून वेलची पूड घालावी. व व्यवस्थित ढवळून झाकण ठेवून गॅस बंद करावा.
काही सुगरण टिप्स :-
- या भातासाठी शक्यतो जुना आणि सुगंधी तांदूळ घ्या. भाताची चव छान लागते.
- तांदूळ तुपात परतल्यामुळे भात मोकळा होतो. शक्यतो त्यावर गरम केलेले पाणी घाला. नाहीतर थंड पाणी घातले तर भाताचा गिचका होतो.
- भात शिजल्यानंतरच साखर घालावी. आधी घातली तर भात लवकर शिजत नाही. साखर घातल्यानंतर अलगद भात ढवळून घ्या.
- केशर घातल्याने रंग आणि चव वाढते.
- दालचिनी आवडत नसल्यास नाही घातली तरी चालेल. वेलची पूड ऐवजी दोन-तीन वेलची सोलून लवंगांसोबत घालू शकता. रंग आवडत नसल्यास थोडीशी हळद सुद्धा वापरू शकता.
असा हा गोड केशरी भात नैवेद्याच्या थाळीची शोभा तर वाढवतो पण अगदी कमी वेळेत झटपट सुद्धा होतो.नक्कीच हा पारंपारिक पदार्थ या गणेशोत्सवात येणाऱ्या पाहुणे मंडळींना जेवणात करून वाढा. आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा.नेहमी नेहमी तेच तेच गोड पदार्थ करण्याऐवजी नवीन आणि पारंपरिक पदार्थ करून बाप्पाला खाऊ घाला...

0 टिप्पण्या