टोमॅटो सूप l Tomato Soup Recipe

 टोमॅटो सूप | Tomato Soup Recipe   

     Aajcha bet recipes च्या या लेखामध्ये दाटसर असे टोमॅटो सूप घरीच कसे बनवायचे याची सोपी रेसिपी दिलेली आहे. कडाक्याच्या थंडीमध्ये सतत काहीतरी गरमागरम खाण्याची इच्छा प्रत्येकालाच होते. आणि म्हणून वाफाळता चहा, कॉफी, गाड्यावर मिळणारा वडापाव, भजी आवर्जून खाण्याकडे किंवा पिण्याकडे बहुदा सर्वांचा कल असतो. परंतु यामुळे शरीराचे वजन वाढण्याला नक्कीच वाव मिळतो.किंवा जर गाड्यावर मिळणारे पदार्थ खाल्ले तर आरोग्याच्या तक्रारी डोकं वर काढू लागतात. अशातच जर काहीतरी शरीराला पोषक असे खाल्ले तर जिभेच्या चोचल्याबरोबर आरोग्यही सुदृढ बनते. म्हणूनच आज या लेखामध्ये चविष्ट आणि दाटसर असे टोमॅटो सूप घरीच कसे बनवायचे याची सोपी रेसिपी दिलेली आहे.

   टोमॅटो ही अशी फळभाजी आहे. जिचा वापर प्रत्येक भाजी, आमटी मध्ये केला जातो. किंवा कच्च्या स्वरूपात सुद्धा खाल्ली जाते.अगदी टोमॅटोच्या दरात भाव वाढ झाली तरी टोमॅटोचा स्वयंपाकातील वापर काही कमी होत नाही...लालबुंद असा टोमॅटो वापरून केलेले क्रिमी असे रेस्टॉरंट स्टाईल टोमॅटो सूप पाहिले की, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या जिभेला पाणी सुटतं... हॉटेलमध्ये जेवणा अगोदर टोमॅटो सूप सर्व्ह केले जाते. पचायला हलके असणारे , जिभेची चव वाढवणारे आंबट-गोड चवीचे सूप  Tomato Soup Recipe in Marathi तसेच टोमॅटो सूप पिण्याचे आरोग्यदायी फायदे या लेखात दिलेले आहेत. म्हणून लेख शेवटपर्यंत वाचा.👍🏻



Tomato-Soup-Recipe
 टोमॅटो सूप l Tomato Soup Recipe 


टोमॅटो सूप बनवण्यासाठी लागणारे साहित्य:-

 ५/६ मध्यम आकाराचे टोमॅटो
१ मध्यम आकाराचे गाजर
१ छोटा कांदा
४/५ लसणाच्या पाकळ्या व आलं
बटर किंवा तेल
५/६ काळी मिरी, मोठ्या मसाला वेलचीचे थोडे दाणे(चवीसाठी)
आवडीनुसार साखर ,मीठ व मिरची पावडर
फ्रेश क्रीम किंवा फेटलेली साय

टोमॅटो सूप करण्याची पद्धत :-
  1. सर्वप्रथम लालबुंद असे टोमॅटो घेऊन  स्वच्छ धुऊन घ्या. त्यांचे चौकोनी काप करून घ्यावेत. गाजराचे सुद्धा पातळसर काप कापून घ्या. काळीमिरी ठेचून घ्या. कांदा उभा कापून घ्या.
  2. गॅसवर एका जाडसर बुडाच्या पॅनमध्ये तेल किंवा बटर गरम करावे. त्यात लसणाच्या पाकळ्या घालून मिनिटभर परतावे. नंतर त्यात उभा चिरलेला कांदा घालून तो मऊ होईपर्यंत परतून घ्या. बारीक चिरलेले आले घालून त्यातच गाजराचे काप घाला. दोन-तीन मिनिटं गाजर मऊ होईपर्यंत परता.
  3. टोमॅटोचे तुकडे घालून दोन-तीन मिनिट परतून घ्यावे. ठेचलेली काळी मिरी, मोठ्या वेलचीचे दाणे घालावेत. परतून घेऊन थोडे पाणी घालून झाकण लावून सर्व मिश्रण १० मिनीटे तरी शिजवून घ्या.
  4. शिजवून घेतलेले सर्व मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमधून वाटून घ्यावे. किंवा इलेक्ट्रिक बिटर वापरून चांगले बारीक करावे.
  5. तयार मिश्रण गाळणीने गाळून घ्यावे. म्हणजे टोमॅटोच्या बिया व सालं बाजूला निघतील.आणि स्मूथ असे टोमॅटोचे मिश्रण तयार होईल.
  6. या मिश्रणात गरजेनुसार पाणी घालून त्याला पुन्हा एकदा उकळी आणावी. चवीनुसार मीठ व साखर घालून टोमॅटो सूप चांगले शिजवून घ्यावे. तिखट हवे असल्यास थोडीशी मिरची पावडर सुद्धा घालू शकता. तयार आहे गरमागरम यम्मी असे दाटसर टोमॅटो सूप...
  हे ही वाचा : tomato bhaji recipe

काही सुगरण टिप्स :-
  1. टोमॅटो निवडताना शक्यतो लालबुंद, ताजे, रसरशीत असे टोमॅटो घ्यावेत. मऊ झालेले, शिळे टोमॅटो असतील तर सूपची चव आंबट होईल.
  2. टोमॅटो, गाजर चांगले शिजवून घ्या.नाहीतर त्यांचा कच्चेपणा सूपची चव बिघडवेल.
  3. कांदा व गाजर घातल्यामुळे टोमॅटो सूपला दाटसरपणा येतो.कॉर्नफ्लोर न वापरता सुद्धा दाटसर सूप तयार होते. गाजर सोबत बीट सुद्धा वापरू शकता. त्यामुळे सूपला रंग छान येईल.
  4. काळी मिरी व वेलची मुळे सूपची चव अधिकच वाढते. काळी मिरीचा वापर अवश्य करा. त्यामुळे पचनक्रिया सुधारते. साखर घातल्यामुळे टोमॅटोचा आंबटपणा जाणवत नाही.
  5. सूप चांगले उकळल्यामुळे त्याला दाटसरपणा येतो.
  6. सूप गाळून नक्की घ्यावे.त्यामुळे स्मूथ असे सूप तयार होते. बिया बाजूला निघतात. त्यामुळे त्यांचा कडवटपणा राहत नाही. 

टोमॅटो सूप पिण्याचे काही आरोग्यदायी फायदे :-

  1. टोमॅटो सूप शरीराचे वाढलेले वजन कमी करण्याचा उत्तम पर्याय आहे. यात फायबर व पाणी जास्त असते. त्यामुळे भूक लागत नाही. वजन कमी होण्यास मदत होते.
  2. टोमॅटो मध्ये लायकोपिन हा घटक अधिक प्रमाणात असल्यामुळे कमकुवत हाडे मजबूत होण्यासाठी मदत होते. विटामिन के व कॅल्शियम असल्याने शरीरातील हाडे मजबूत होतात.
  3. A,C,E,K या जीवनसत्त्वांचा भरपूर साठा टोमॅटो मध्ये असतो. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात.
  4. टोमॅटो मध्ये क्रोमियम असल्याने मधुमेही रुग्णांची रक्तातील साखर नियंत्रित राहते.
  5. टोमॅटो मधील पोटॅशियम व कॉपर मुळे मेंदूचा व मज्जासंस्थेचा विकास होतो.
  6. शरीरातील रक्ताची कमतरता भरून येते. त्यामुळे ॲनिमिया टाळता येतो. त्यामध्ये असणारा सेलेनियम या घटकामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो.

शरीरासाठी उत्तम पोषक असणारे हे सूप दिवसभरात केव्हाही पिणे फायदेशीर ठरते. आजारी रुग्णांना सूप पिण्याचा सल्ला डॉक्टर हमखास देतात.

 कमीत कमी साहित्य वापरून केलेले हे हेल्दी सूप तुम्ही सुद्धा जेवणाच्या मधल्या वेळेत किंवा छोटी भूक भागवण्यासाठी नक्की करून पहा.आणि कसे झाले ते कमेंट करून मला नक्की सांगा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या या रेसिपी ब्लॉगला फॉलो करा आणि आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा.... 🙏
धन्यवाद.

श्री स्वामी समर्थ 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या