मुरमुरा लाडू | Murmura Ladoo recipe

मुरमुरा  लाडू | Murmura Ladoo recipe


Murmura-Ladoo-recipe
मुरमुरा  लाडू | Murmura Ladoo recipe

     Aajcha bet recipes च्या आजच्या लेखामध्ये पारंपरिक पद्धतीने मुरमुरा लाडू कसा करायचा याची रेसीपी दिली आहे. आपल्या लहानपणी बऱ्याचदा सर्वांनी मुरमुऱ्याचा लाडू खाल्ला असेल हो ना ! खाऊ म्हणून हातावर मिळणारा मुरमुऱ्याचा लाडू म्हणजे गंमतच असायची. कुरकुरीत आणि पौष्टिक असा लाडू खाल्ला की, पोटच भरायचं. फक्त मुरमुरे आणि गुळ वापरून केलेला हा पौष्टिक आणि पारंपरिक पदार्थ आजकाल विकत सुद्धा मिळू लागला आहे. लहानपणी आई आणि आजी हा पदार्थ हमखास घरीच बनवायच्या. परंतु आजकालच्या धकाधकीच्या जीवनात सर्व काही घरी बनवणे शक्य होत नाही. म्हणून हल्लीची पिढी जास्तीत जास्त जंक फूड खाण्याकडे आकर्षित होत आहे.

     थंडीच्या दिवसात गुळ खाणे अतिशय फायदेशीर असते. आहारतज्ञ सुद्धा साखरे ऐवजी गुळ खाण्याचा सल्ला देतात.त्यामुळे गुळाचा वापर हा आहारात जास्तीत जास्त कसा होईल याकडे काही सुगरण गृहिणी लक्ष देतात. घरातील सर्व मंडळींना मुरमुरा लाडू खायला आवडतो.लहान मुलांना नुसतेच मुरमुरे खाण्यासाठी दिले तर ते अर्धे सांडवलेच जातात. म्हणून एखादा लाडू  जर त्यांना खायला दिला. तर तो संपूर्ण खाल्ला जातो.आणि त्यांचे पोट सुद्धा भरते. म्हणूनच आज मी पारंपारिक अशी  Murmura Ladoo recipe या लेखामध्ये देत आहे. तसेच हे लाडू खाण्याचे फायदेही आहेत याची माहिती सुद्धा लेखाच्या शेवटी दिली आहे.


साहित्य :-

४ वाट्या मुरमुरे
१ वाटी बारीक चिरलेला गुळ
१ चमचा साजूक तूप
पाव वाटी पाणी
आवडीनुसार वेलची पूड

ही रेसीपी सुदधा नक्की करून पहा :- ज्वारीच्या लाहया / Jwarichya lahya recipe in marathi

कृती :-
  1. सर्वप्रथम मुरमुरे चाळून निवडून घ्यावे. एका कढईत मंद आचेवर गरम करून घ्या. म्हणजे मुरमुरे कुरकुरीत होतात.
  2. कढईत चमचाभर तूप घाला. त्यात बारीक केलेला गूळ व पाणी घालून गुळाचा पाक करायला घ्या. मंद आचेवर पाकाला सतत ढवळत राहावे. पाक होऊ लागला की, गुळाचा रंग बदलतो आणि फेस येऊ लागतो. आता एका भांड्यात थोडं पाणी घेऊन थोडा पाक टाकून पहावा. त्याची गोळी होऊ लागली की, पाक झाला असे समजावे.
  3. आता वेळ न घालवता लगेचच गरम केलेले मुरमुरे पाकात घालावे. मिश्रण चांगले ढवळून घ्या. आवडीनुसार वेलची पूड घाला.हे करताना गॅस बंद करा.
  4. गरम असतानाच लाडू वळावेत. हात ओले करून थोडे थोडे मिश्रण हातावर घेऊन मध्यम आकाराचे लाडू वळावेत. मिश्रण थंड झाल्यावर लाडू वळता येत नाहीत. म्हणून भरभर ही कृती करावी.
काही सुगरण टिप्स :-
  1. लाडू बनवताना मुरमुरे  हलकेसे भाजून घ्यावे. म्हणजे त्यांचा कुरकुरीतपणा कायम राहतो.
  2. गुळ हा पिवळा वापरल्यास लाडूचा रंग छान येतो. शक्य असेल तर चुकीचा गुळ वापरावा. त्यामुळे लाडू खमंग होतात.
  3. गरम असतानाच लाडू वळावे. नाहीतर लाडू वळणे शक्य होत नाही.
  4. पाक करताना थोडे पाणी अवश्य घालावे. म्हणजे पाक चांगला होतो.

मुरमुरा लाडू खाण्याचे फायदे :-

  1. हा लाडू गुळापासून बनवतात. गुळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. गुळामध्ये लोह, कॅल्शियम, ब जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते.
  2. जेवणानंतर गुळ खाल्ल्यामुळे पचन क्रिया सुधारते. असं आहार तज्ञ सांगतात. म्हणूनच अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा लाडू खाणे फायदेशीर ठरेल.
  3. ज्यांना वजन कमी करायचं असेल अशांसाठी भूक भागवण्यासाठी मुरमुरे हा उत्तम पर्याय ठरू शकतो. कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट असतात. ज्यामुळे शरीराला आवश्यक असणारी ऊर्जा तयार होते. आणि वजन नियंत्रित राहते.
  4. लहान मुलांची भूक भागवण्यासाठी हा पौष्टिक लाडू म्हणजे चांगला ऑप्शन आहे.

अशाप्रकारे हा पारंपारिक पद्धतीने तयार केलेला  लाडू नक्की बनवा. आणि मला कमेंट मध्ये जरूर कळवा. रेसिपी आवडली तर नक्कीच आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा.
धन्यवाद 🙏

 श्री स्वामी समर्थ 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या