आजचा बेत रेसिपी च्या या लेखामध्ये आज आपण मराठवाडा स्पेशल पारंपारिक अशी उंबर हंडी म्हणजेच मोदकाची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत. अहिल्यानगर मध्ये एका ढाब्यावर मी ही डिश पाहिली होती.नाव जरा हटके असले तरी भाजी एकदम झणझणीत अशी आहे.
नुकतीच दिवाळी संपली. रोज रोज फराळाचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल... किंवा घरात कोणतीच भाजी शिल्लक नसेल तर नक्की ही पारंपारिक पद्धतीची उंबरहंडी नक्की करून पहा. काही भागात याला मोदकाची आमटी असे सुद्धा म्हणतात. महाराष्ट्रातील मराठवाड्यातील किंवा विदर्भातील ग्रामीण भागात केली जाणारी ही भाजी शहरातील खवय्यांना नक्कीच आवडेल. वेगळ्या चवीची आणि नॉनव्हेजलाही मागे सारणारी ही भाजी घरातील अगदी कमीत कमी साहित्यात सुद्धा बनवता येते. चला तर मग रेसिपी कशी करायची ते पाहूया...
![]() |
| मराठवाड्याची खास उंबरहंडी -मसालेदार आणि पारंपारिक ग्रेव्ही |
उंबरहंडी कशी करायची याची स्टेप बाय स्टेप कृती पाहूया.
सारणासाठी साहित्य:-
आवरणासाठी साहित्य:-
१ वाटी बेसन पीठमीठ
२ चमचे कच्चे तेल
ग्रेव्हीसाठी साहित्य:-
कृती:-
- उंबर बनवण्यासाठी आधी पीठ मळून घेऊ. परातीत बेसन पीठ, मीठ, चिमूटभर सोडा आणि २ चमचे कच्च तेल घालून घट्टसर पीठ मळून घ्या. हाताला थोडं तेल लावून पीठ छान मळून घ्या. दहा मिनिटांसाठी पीठ झाकून ठेवा. तोपर्यंत सारणाची तयारी करू.
- सारणासाठी शेंगदाणे, काजू, तीळ सम प्रमाणात घेऊन जाड बुडाच्या कढईत खमंग भाजून घ्यावे. थंड करायला बाजूला ठेवावे. नंतर मिक्सरवर जाडसर असं कोरडच वाटून घ्या. त्यामध्ये थोडी हळद आणि चवीनुसार मीठ घालून सारण तयार करा.
- उंबरहंडी चा रस्सा / ग्रेव्हीसाठी खमंग असे वाटण तयार करू. त्यासाठी दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून लालसर असे तेलात भाजून घ्यावेत.३/४ हिरव्या मिरच्या, धने सुद्धा त्यात भाजून घ्यावे.ते मिश्रण एका ताटात काढून खोबऱ्याचा कीस खमंग लालसर असा भाजून घ्यावा. हे साहित्य थंड झाल्यावर लसुण, आले आणि कोथिंबीर घालून मिक्सरवर बारीक असं वाटण तयार करून घ्या.
- भिजलेल्या पिठाचा गोळा छान मळून घ्या. त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यावेत. त्याची छान मध्यम आकाराची पारी लाटून किंवा हाताने बनवून त्यामध्ये तयार केलेले कोरडे सारण भरून मोदकाप्रमाणे आकार देऊन त्याचे छोटे छोटे उंबर बनवून घ्या. मोदकाचा आकार खूप मोठा नसावा.
- तयार मोदक चाळणीवर ठेवून वाफवून घ्यावे. किंवा तेलामध्ये हलकेसे तळून घेतले तरी चालतात. जास्त लालसर तळू नयेत. त्यामुळे ग्रेव्हीमध्ये शिजण्यासाठी वेळ लागेल.
- ग्रेव्ही करण्यासाठी जाड बुडाच्या कढईत तेल घालून घ्या. त्यामध्ये जिरे, कढीपत्ता याची खमंग फोडणी करावी. फोडणीत तयार केलेले ओले वाटण घालून छान परतून घ्या. मिश्रणाला तेल सुटू लागले की, हळद, मिरची पावडर, काळा मसाला / कांदा मसाला घालून पुन्हा एकदा छान परतून घ्या. रस्सा करण्यासाठी लागेल तेवढे गरम पाणी घालून मिश्रणाला छान उकळी येऊ द्या.
- रस्सा छान उकळल्यानंतर त्यामध्ये तळलेले/ वाफवलेले उंबर/मोदक सोडावेत. झाकण ठेवून उंबर शिजेपर्यंत भाजी उकळा.उंबर शिजले की, ते ग्रेव्हीवर तरंगू लागतात. म्हणजेच आपली उंबरहंडी खाण्यासाठी तयार आहे असं समजा.
- गरमागरम अशी उंबरहंडी ज्वारी किंवा बाजरी च्या भाकरी सोबत कुस्करून खाल्ली तर छान लागते.सोबत कांदा, लिंबू पण सर्व्ह करा.
काही सुगरण टिप्स :-
- यामध्ये असणारे सारण तुम्ही आवडीनुसार बनवू शकता.काजू आवडत नसतील तर खसखस आणि खोबरे सुद्धा वापरता येईल.
- पीठ मळताना घट्ट असावे.सारण भरताना मोदक फुटणार नाही याची काळजी घ्यावी.
- उंबर तळले तर भाजीला छान चव येते.फक्त हलक्या रंगावर तळावेत.वाफवून पण छान भाजी होते.तसेच टाकणार असाल तर उकळत्या ग्रेव्ही मद्धे अलगद सोडा.
- कांदे छान भाजून घ्या.म्हणजे रस्सा चवदार बनतो.
झणझणीत अशी उंबर हडी किंवा मोदकाची आमटी नक्की करून पहा. आणि आवडल्यास आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा. तुमच्याकडे ही भाजी करतात का? आणि त्याला कोणत्या नावाने ओळखले जाते हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा...
धन्यवाद.
श्री स्वामी समर्थ

0 टिप्पण्या