बहुगुणी लाल माठाची भाजी / Lal Mathachi Bhaji recipe in Marathi


   आजचा बेत रेसिपीजच्या च्या या लेखामध्ये औषधी गुणधर्मांनी युक्त ,रक्तवर्धक अशी  लाल माठाची भाजी अगदी घरगुती व सोप्या  पद्धतीने कशी करायची ते पाहणार आहोत.

    पावसाळा सुरू झाला की, अनेक प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या बाजारात उपलब्ध होतात. बारमाही मिळणाऱ्या मेथी, शेपू, पालक, आंबटचुका, कांद्याची पात या भाज्या तर आपल्याला परिचित आहेत. पण लाल माठ, हिरवा माठ, घोळ, राजगिरा, तांदूळचा अशा अनेक रानभाज्या आजही बर्‍याच जणांना नीटओळखता येत नाहीत. औषधी गुणधर्मांनी युक्त अशा या भाज्या आठवड्यातून किमान एक -दोन वेळा तरी आहारात असायलाच हव्यात. 'सुपर फूड' मानल्या जाणार्‍या या  भाज्या शाकाहारी लोकांसाठी खरोखरच वरदान आहेत. 

चला तर तर मग पौष्टिकआणि चविष्ट अशी  लाल माठाची भाजी कशी करायची ते पाहूया...


लाल माठाची भाजी रेसिपी -पारंपरिक आरोग्यदायी पालेभाजी
घरगुती पद्धतीने तयार केलेली पौष्टिक लाल माठाची भाजी 

लाल माठाची भाजी करण्यासाठी लागणारे साहित्य :-

  • १ जुडी लाल माठ भाजी 
  • ४/५ हिरव्या किंवा लाल सुक्या मिरच्या किंवा आवडीनुसार लाल तिखट 
  • १ मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा 
  • ७/८ लसूण पाकळ्या 
  • १/२ चमचा मोहरी 
  •  पाव चमचा हिंग
  • थोडी हळद 
  • २/३ चमचे जाडसर शेंगदाणा कूट 
  • तेल व मीठ


ही रेसीपी सुद्धा नक्की करून पहा :- डब्यासाठी  टेस्टी व चमचमीत गवारची भाजी / Gavarchi bhaji recipe


लाल माठाची भाजी करण्याची कृती :-

  1. सर्वप्रथम कोवळी लाल माठाची भाजी निवडून घ्या. पानं वेगळी करून नीट झटकून घ्यावीत,जेणेकरून अळी-कीटक निघून जातील.कोवळी देठे असतील तर वापरावीत;जाड देठांची साल काढून बारीक चिरून वेगळ्या भाजीत किंवा कोशिंबीरीत वापरता येतात. दोन-तीन वेळा स्वच्छ पाण्याने भाजी धुवून निथळत ठेवा.आणि नंतर  बारीक चिरून घ्या. 
  2. पालेभाजी करताना शक्यतो लोखंडी कढई वापरावी.कढईत तेल गरम करून मोहरी, हिंगाची खमंग फोडणी द्या.  त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून तांबूस होईपर्यंत परता.
  3. त्यानंतर बारीक चिरलेला किंवा ठेचलेला लसूण, लाल तिखट किंवा हिरव्या मिरच्या घालून चांगलं परतून घ्या.सुक्या लाल मिरच्यांचा वापर केल्यास भाजी अधिक चविष्ट लागते. 
  4. इच्छेनुसार भिजवलेली मूग डाळ किंवा चण्याची डाळ घालू शकता. मात्र डाळ न  घालता सुद्धा ही भाजी उत्तम  लागते. चिमूटभर हळद घालावी म्हणजे भाजीला रंग छान येतो.आता बारीक चिरलेली लाल माठाची भाजी घालून चांगली परतून घ्यावी. 
  5. झाकण ठेवून अगदी पाच मिनिटे  ही भाजी वाफवून घ्या. या भाजीला भरपूर पाणी सुटते. ते संपूर्णपणे आटवून घ्या.शेवटी  जाडसर शेंगदाण्याचा कूट घालून गॅस बंद करा. 
  6. लोखंडी कढईत भाजी केली असेल तर लगेचच ती भाजी दुसऱ्या भांड्यात काढून घ्या. म्हणजे भाजी काळी पडत नाही. 

लाल माठाची भाजी खाण्याचे आरोग्यदायक फायदे :-

  • लाल माठामध्ये  लोह (Iron) मुबलक असल्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.
  •  व्हिटॅमिन A भरपूर प्रमाणात असल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारते आणि डोळ्यांचा कोरडेपणा कमी होतो.
  • Antioxidents आणि व्हिटॅमिन E मुळे त्वचा चमकदार बनते आणि केसगळती चे प्रमाण सुद्धा कमी होते.
  • फायबरयुक्त असल्यामुळे त्याच्या सेवनामुळे पोट साफ होते.आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
  •  यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असल्याने हाडे बळकट होतात आणि दात सुद्धा मजबूत राहतात. 
  • या भाजीचा आहारात उपयोग केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होते. म्हणून डायबिटीस असणाऱ्या रुग्णांनी ही भाजी आवर्जून खावी. 
  •  लाल माठा मध्ये व्हिटॅमिन C, लोह आणि इतर खनिजे भरपूर प्रमाणात असल्यामुळे याच्या सेवनामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
  •  ही भाजी खाल्ली तर शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होऊन हृदयाचे आरोग्य सुधारते.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

१) लाल माठाची भाजी रोज खाऊ शकतो का ?

- हो,लाल माठ ही फायबरयुक्त व लोहयुक्त भाजी असल्याने आठवड्यातून २/३ वेळा जरूर खाऊ शकतो.

२) लाल माठाची भाजी मधुमेही रुग्णांसाठी चांगली आहे का ?

- हो,ही भाजी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

३) लाल माठाची भाजी वजन कमी करण्यासाठी उपयोगी आहे का ?

- हो, ही भाजी कमी कॅलरीची व फायबरयुक्त असल्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. 


अशीच आणखी पालेभाज्यांची रेसिपी पहाण्यासाठी :


    पावसाळ्यात मिळणाऱ्या या रानभाज्या  निसर्गाची अमूल्य देणगी आहेत. त्या शरीराला आवश्यक ऊर्जा देतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत करतात.अशीही गरमागरम लाल माठाची भाजी तांदळाची किंवा ज्वारीची भाकरी सोबत अतिशय चविष्ट लागते. या भाजीला जास्त वेळ लागत नाही. म्हणून अगदी भाकरीच्या गरम तव्यावर सुद्धा अगदी आयत्या वेळी करता येते.

    तुमच्याकडे लाल माठाची  भाजी कोणत्या पद्धतीने केली जाते, हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली तर नक्कीच आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर करा. अशाच घरगुती रेसिपीजसाठी आजचा बेत रेसिपीज ब्लॉगला नक्की फॉलो करा. 
धन्यवाद. 
श्री स्वामी समर्थ 🙏 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या