पारंपारिक कोकणी दडपे पोहे / Dadpe Pohe recipe in Marathi


    आज काय नाश्ता करायचा असा प्रश्न पडला की पटकन डोळ्यासमोर येतात ते म्हणजे पोहे. महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीत पोह्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. लग्न ठरवताना होणारा कांदे पोह्यांचा कार्यक्रम असो किंवा रोजचा हलका नाश्ता – पोहे प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी आलेलेच असतात.
    आपल्याकडे पोह्यांचे अनेक प्रकार केले जातात – कांदे पोहे, बटाटे पोहे, मटार पोहे, हेल्दी भाज्यांचे पोहे किंवा नाश्ता सेंटर स्टाईल शेव-पोहे. विदर्भात तर पोह्यांवर तर्री घालूनही खाल्ले जातात. पण कोकणात नारळ भरपूर मिळत असल्यामुळे तिथे बनवले जाणारे खास “दडपे पोहे” हे थोडे वेगळे आणि खूपच चविष्ट लागतात.
    आज Aajcha Bet Recipes च्या या लेखामध्ये आपण पाण्याचा अजिबात वापर न करता, ओल्या नारळाच्या चव आणि नारळाच्या पाण्यावर तयार होणारी पारंपारिक दडपे पोहे रेसिपी पाहणार आहोत. ही रेसिपी झटपट तयार होते, हलकी आहे आणि सकाळचा नाश्ता किंवा संध्याकाळची भूक भागवण्यासाठी उत्तम पर्याय आहे. चला तर मग पाहूया Dadpe Pohe Recipe in Marathi.



पारंपारिक दडपे पोहे रेसिपी
ओल्या नारळापासून बनवलेले पारंपारिक कोकणी दडपे पोहे 

दडपे पोहे करण्यासाठी लागणारे साहित्य:-

  • २ वाट्या पातळ पोहे
  • १ बारीक चिरलेला कांदा
  • १/२ वाटी खोवलेला ओला नारळ 
  • आवश्यकतेनुसार नारळाचे पाणी
  • १/२ लिंबाचा रस
  • ३/४ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  • कढीपत्त्याची पाने
  • १ चमचा मोहरी
  • १ चमचा जिरे
  • पाव वाटी  शेंगदाणे
  • २ चमचे फुटाण्याची डाळ
  • चिमूटभर हिंग
  • १/२ चमचा हळद
  • साखर व मीठ चवीनुसार
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • फोडणीसाठी तेल

ही रेसीपी सुद्धा नक्की करून पहा :- उकडपेंडी | Ukadpendi 

दडपे पोहे कृती :- (Step by Step Dadpe Pohe Recipe)

  1. दडपे पोहे करताना दिवाळीच्या चिवड्यासाठी वापरले जाणारे पातळ पोहे निवडा. पोहे स्वच्छ करून एका मोठ्या परातीत घ्या.
  2. त्यावर खोवलेला ओला नारळ घाला. थोडेसे नारळाचे पाणी, लिंबाचा रस, मीठ आणि साखर घालून पोहे हाताने हलकेच मिसळून घ्या.
  3. हे मिश्रण झाकण ठेवून १० मिनिटे बाजूला ठेवा, जेणेकरून पोहे छान मऊ होतील.
  4. कढईत तेल गरम करून त्यात शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. त्यानंतर फुटाण्याची डाळ घालून हलकी तांबूस झाल्यावर काढून ठेवा.
  5. त्याच तेलात मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या घालून खमंग फोडणी करा.
  6. गॅस बंद करून त्या गरम तेलात हळद आणि बारीक चिरलेला कांदा घाला. तेलाच्या उष्णतेमुळे कांदा मऊ होईल आणि कच्चेपणा निघून जाईल.
  7. ही फोडणी, शेंगदाणे आणि फुटाण्याची डाळ भिजवलेल्या पोह्यांवर घालून सर्व मिश्रण अलगद मिसळून घ्या.
  8. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पारंपारिक दडपे पोहे खाण्यासाठी तयार आहेत.

काही सुगरण टिप्स :-

  • दडपे पोहे करताना जाड पोहे वापरू नका, अन्यथा पोहे चिवट होऊ शकतात.
  • पोहे भिजवताना पाण्याऐवजी नारळाचा चव आणि नारळाचे पाणी वापरल्यामुळे खास कोकणी चव येते.
  • कांदा कच्चा नको असेल तर फोडणीच्या गरम तेलात गॅस बंद करून घालावा.
  • कोथिंबीर आणि कढीपत्ता जास्त प्रमाणात वापरल्यास दडपे पोहे अधिक चविष्ट लागतात.
  • वरून बारीक शेव किंवा भाजलेला उडदाचा पापड कुस्करून घातला तरी छान लागतो

Dadpe Pohe Recipe (FAQ) नेहमी विचारले जाणारे प्रश्न -

१) दडपे पोहे डब्यासाठी चालतील का?

-  हो, दडपे पोहे डब्यासाठी चालतात. मात्र फार वेळ ठेवल्यास ते थोडे मऊ होतात.

२) दडपे पोहे किती वेळात तयार होतात?

-  ही रेसिपी साधारण १५–२० मिनिटांत तयार होते.

३) पातळ पोहे नसेल तर काय करावे?

-  दडपे पोह्यांसाठी पातळ पोहेच योग्य असतात. जाड पोहे वापरल्यास चव बदलू शकते.

आमची ओल्या नारळापासून बनवलेली नारळाची बर्फी ही गोड रेसिपी सुद्धा नक्की पहा.


अशा प्रकारे तयार होणारे दडपे पोहे हे कमी कॅलरीचे, हलके-फुलके पण पोटभरीचे आणि चविष्ट असतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा.
धन्यवाद 🙏

श्री स्वामी समर्थ


 



    







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या