Aajcha Bet Recipes च्या या लेखामध्ये आपण बेकरीमध्ये मिळणारा Eggless Rich Plum Cake घरी कसा करायचा याची सविस्तर व सोपी कृती पाहणार आहोत. अंडी न वापरता तयार होणारा हा प्लम केक अतिशय सॉफ्ट, ओलसर आणि ड्रायफ्रुट्सने भरलेला असतो.
नवीन वर्ष, नाताळ, वाढदिवस किंवा कोणतेही खास सेलिब्रेशन असो – केकशिवाय आनंद अपुरा वाटतो. आजकाल क्रीम केकसोबतच बिना क्रीम केक देखील मोठ्या प्रमाणात पसंत केले जातात. त्यातच Eggless Plum Cake ला विशेष मागणी असते. या रेसिपीमध्ये आपण घरच्या घरी सहज मिळणाऱ्या साहित्यातून बेकरी स्टाइल प्लम केक बनवणार आहोत.हा केक अंडी न वापरता देखील खूपच रिच, मऊ आणि चविष्ट बनतो. त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात या खास केकने नक्की करून पहा.
प्लम केक तयार करण्यासाठी लागणारे साहित्य:-
सुकामेवा भिजवण्यासाठी साहित्य :-
५० ग्रॅम साखर (पाव वाटी)
१/३ वाटी पाणी
१८० मिली संत्र्याचा ज्यूस(१ वाटी)
१५० ग्रॅम मिक्स ड्रायफ्रूट्स आवडीनुसार(काजू-बदाम चे तुकडे, रंगीत टुटी फ्रुटी, चेरीचे तुकडे, काळे मनुके, पिवळे मनुके)
केक बॅटरसाठी साहित्य :-
१/२ वाटी पिठीसाखर
६० मिली तेल (५ मोठे चमचे)
१ चमचा व्हॅनिला इसेन्स
२ चमचे दही
१/२ चमचा बेकिंग पावडर
१/२ चमचा बेकिंग सोडा
१/२ चमचा सुंठ पावडर
१/२ चमचा दालचिनी पावडर
पाव चमचा लवंग पावडर
पाव चमचा जायफळ पावडर
२०० ग्रॅम मैदा
२५ ग्रॅम कोको पावडर (२ मोठे चमचे)
Eggless Plum Cake करण्याची कृती :- (Step by Step)
- सर्वप्रथम आपण कॅरॅमल सिरप करून घेऊ. त्यासाठी एका पसरट नॉनस्टिक भांड्यात पाव वाटी साखर घालून मंद आचेवर गॅसवर ठेवा. साखर वितळू लागते. ही प्रोसेस चालू असताना चमच्याने ढवळू नये. नाहीतर साखरेचे कॅरॅमिलायझेशन नीट होत नाही. साखर पूर्णपणे विरघळली की, साखरेचे चॉकलेटी रंगाचे पातळ असे मिश्रण तयार होते. त्यामध्ये १/३ वाटी पाणी घालून मंद गॅसवर व्यवस्थित मिश्रण उकळून घ्या. कॅरॅमल सिरप तयार आहे.
- या सिरपमध्ये बाजारात मिळणारा संत्र्याचा ज्यूस (१८० मिलीचे टेट्रा पॅक) घालून व्यवस्थित ढवळून घ्या. या मिश्रणात ड्रायफ्रूट चे बारीक केलेले तुकडे घालून मिश्रणाला उकळी आणा. यावेळी १/२ वाटी पिठीसाखर घालून सर्व मिश्रण ५ मिनीटे तरी शिजवा. त्यात ६० मिली कोणतेही उग्र वास नसणारे साधे तेल( सूर्यफूल किंवा सोयाबीन) घालून मिश्रणाला उकळी आणावी. दाटसर असे ड्रायफ्रूट्सचे मिश्रण तयार होईल. हे मिश्रण थंड करून घ्या.
- थंड झाल्यावर त्यात व्हॅनिला इसेन्स आणि दोन चमचे दही घाला. व बाजूला ठेवून द्या.
- आता केक साठी लागणारे सर्व कोरडे पदार्थ एकत्र करून चाळून घेऊ. त्यासाठी मैदा, बेकिंग पावडर,बेकिंग सोडा, कोको पावडर, वर दिलेल्या सर्व मसाला पावडर (एखादी पावडर जर घरात नसेल तर काही हरकत नाही) एकत्रितपणे व्यवस्थित चाळून घ्या.
- केक करण्यासाठी कुकरचा वापर करणार असाल तर कुकरमध्ये एक स्टॅन्ड ठेवून झाकणाची शिट्टी काढून दहा मिनिटांसाठी कुकर गरम करून घ्या. कुकरच्या डब्याला तेलाने ग्रीसिंग करून मैदयाने व्यवस्थित डस्टिंग करून घ्यावे.
- चाळून घेतलेले सर्व कोरडे मिश्रण थंड केलेल्या ड्रायफ्रूटच्या मिश्रणात घालून व्यवस्थित एकजीव करावे. मिश्रण ओतता येईल इतके पातळसर असावे. गरज असल्यास थोडे पाणी घालू शकता. फार पातळ करू नये.
- केकच्या भांड्यात मिश्रण ओतून घ्यावे. वरून रंगीत टुटी फ्रुटी, सुक्या मेव्याचे काप घालून केकला सजवावे. हलकेसे डब्याला टॅप करून कुकरमध्ये डबा अलगद ठेवून द्यावा. कुकरचे झाकण लावून केक ४५ मिनिटांसाठी बेक करून घ्या. साधारण तीस मिनिटानंतर केक झाला आहे का हे चेक करू शकता. त्यासाठी एक टूथपिक केकच्या मधोमध घालून केकचे मिश्रण जर टूथपिकला चिकटले नाही तर केक झाला आहे असे समजावे. गॅस बंद करून केक थंड करून घ्यावा. हव्या त्या आकारात कापून तुकडे करावे.
- हा केक हवाबंद डब्यात ठेवून ८/१० दिवस सुद्धा फ्रिजमध्ये ठेवून टिकतो. शिळा झाल्यावर याची चव आणखीनच वाढते.
हे हि वाचा : Eggless carrot cake
काही सुगरण टिप्स :-
- या केक मध्ये आवडीनुसार कोणताही सुकामेवा घालू शकतो.
- प्रामुख्याने हा केक करताना रम किंवा वाईन मध्ये सुकामेवा महिनाभर भिजवून मग केक साठी वापरला जातो. परंतु त्या ऐवजी कोणताही फळाचा ज्यूस किंवा संत्र्याचा ज्यूस वापरून सुद्धा अप्रतिम असा प्लम केक बनवता येतो.
- इथं मी सुकामेवा न भिजवता इन्स्टंट अशा पद्धतीने केक केला आहे. सुकामेवा २ दिवस अगोदर संत्र्याच्या रसामध्ये भिजवून ठेवल्यास छान चवीचा आंबट गोड केक तयार होतो.सुकामेवा भिजवल्यामुळे केक अधिक मऊ व चविष्ट बनतो।
- ड्रायफ्रूट चे प्रमाण जास्त असल्याने हा केक जास्त फुगत नाही परंतु त्याची चव तोंडात रेंगाळणारी अशी होते. स्पाइस पावडर वापरल्यामुळे केकची चव भन्नाट लागते.
- विकतचा संत्र्याचा ज्यूस वापरायचा नसेल तर दोन संत्र्याचा रस काढून त्यात थोडे पाणी घालून उकळून घ्यावे. थंड करून मग केकसाठी वापरावा. म्हणजे केक जर जास्त दिवस ठेवायचा असेल तर तो खराब होत नाही.
- ओव्हन नसेल तर कुकरमध्ये देखील हा केक बनवू शकता.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
1) अंडी न वापरता प्लम केक मऊ कसा राहतो ?
- योग्य प्रमाणात दही,तेल आणि योग्य तापमानावर बेक केल्यामुळे केक मऊ आणि स्पंजी राहतो.
2) एगलेस प्लम केक किती दिवस टिकतो ?
- हवाबंद डब्यात २/३ दिवस टिकतो.फ्रिजमध्ये ८/१० दिवस टिकतो.
३) ओव्हन नसल्यास प्लम केक कसा करावा?
- ओव्हन नसेल तर कुकरमध्ये स्टँड ठेवून हा केक सहज करता येतो.
ही रेसीपी सुद्धा नक्की करून पहा - मावा केक
अशा प्रकारे बेकरीत मिळणारा Eggless Plum Cake घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार करता येतो. ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल अशी मला खात्री आहे. रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा आणि आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा.
नवनवीन पारंपारिक आणि सोप्या रेसिपीसाठी Aajcha Bet Recipes ब्लॉगला फॉलो करा आणि कमेंट करून तुमचा अभिप्राय नक्की कळवा.
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 🙏
श्री स्वामी समर्थ

3 टिप्पण्या
खूप छान ताई😊
उत्तर द्याहटवाधन्यवाद ताई
हटवामस्तच
उत्तर द्याहटवा